ह्या वर्षा विशेषांकाच्या वाचनाकरता येणार्‍या वाचकांचे स्वागत आहे.

संपादकीय

24 प्रतिक्रिया
नमस्कार मंडळी. शब्दगाऽऽरवा आणि हास्यगाऽऽरवा  नंतर आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत.....
 पावसाळी विशेषांक ऋतू हिरवा !

आम्ही ह्याला ’पावसाळी विशेषांक का म्हणतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच...तसंच ह्यात सगळं पावसाळ्यासंबंधीचंच वाचायला मिळेल अशीही अपेक्षा असेल...थोडेफार ते बरोबरही आहे. त्या अनुषंगाने काही लेखन पावसाशी संबंधित असेलच, पण आम्ही खरं तर ह्या अंकासाठी विषयाचं असं बंधन ठेवलेलं नसल्यामुळे इतरही विषयांवरचे लेखन आपण इथे वाचू शकाल.. आता तुम्ही म्हणाल की मग पावसाळी विशेषांक  असं आम्ही का म्हणतोय?
तर, त्याचं उत्तर अगदी सोपं आहे....पावसाळ्यात काढतोय म्हणून पावसाळी विशेषांक.  :)

ह्या अंकात आपल्याला विविध साहित्य प्रकार वाचायला मिळणार आहेत...ललित लेखन,कथा,कविता,पाककृती,प्रवासवर्णन इत्यादि. ह्या अंकात आम्ही महाजालावरील काही नामवंतांबरोबरच नवोदितांचाही समावेश केलेला आहे. त्यांची नावे? अहो सांगतो ना.....
कांचन कराई, सुधीर कांदळकर, महेंद्र कुलकर्णी, क्रांति साडेकर, श्रेया रत्नपारखी, प्राजु(प्राजक्ता पटवर्धन), जयंत कुलकर्णी, जयबालाताई परूळेकर, नरेंद्र प्रभू, नरेंद्र गोळे, तुषार जोशी, मनीषा भिडे, विनायक रानडे, नीता रानडे, हेरंब ओक, विद्याधर भिसे, मदनबाण, मीनल गद्रे, अपर्णा लळिंगकर, देवेंद्र चुरी, जीवनिका कोष्टी, रेश्मा गाडेकर, ओंकार भारद्वाज, सुहास झेले इत्यादि मंडळी आहेत ह्या अंकात.

आता तुमचे काम इतकेच...अंक वाचायचा आणि आपले अमूल्य मत नोंदवायचे... अंक आवडला म्हणून!
काय म्हणता?  आवडला, तरच मत नोंदवायचे? आणि समजा नाही आवडला तर?
तरीही, हो,हो! अगदी अंक नाही आवडला तरीही जरूर नोंदवा! आपल्या अभिप्रायामुळेच तर आम्हाला कळू शकेल...आम्ही आमच्या प्रयत्नात कितपत सफल झालोय ते.

काय? मग वाचणार ना? मग करा सुरुवात!

विशेष उल्लेखनीय बाब: ह्या अंकाची तांत्रिक मांडणी (टेम्प्लेट इत्यादि) श्रेया रत्नपारखी हिने केलेय. पावसाळी अंकाला अनुकूल अशी बहारदार मांडणी आणि सजावट केल्याबद्दल तिचे खास अभिनंदन!!!

आपल्या ह्या अंकाचे जे छानसे मानचिन्ह उजवीकडे दिसत आहे ते कांचन कराई हिने अतिशय थोड्या वेळात करून दिलंय...त्याबद्दल तिचेही खास अभिनंदन.


कळावे
आपला स्नेहांकित
प्रमोद देव

भूर भूर पाऊस

12 प्रतिक्रिया
भूर भूर पाऊस

मी अंगणात

पाऊस माझ्या मनात

घरात जायची इच्छाच होत नाही

पावसाच्या हळव्या स्पर्शात

स्वत:च हरवून जावं

हळू हळू भिजत राहावं

पाऊस पडत राहावा

आठवणी तशाच

भूर भूर मनाच्या अंगणात

मिटल्या पापण्यांनी

उष्णं श्वासांनी

धुंद शहारत

मीही भिजावं मनातल्या मनात

भूर भूर पाऊस

मी अंगणात

पाऊस माझ्या मनात


कवि: तुषार जोशी,नागपूर
http://tusharnagpur.blogspot.com/

इंदूबेननूं खाकरा...

19 प्रतिक्रिया
हमदाबादला गेलो की कितीही घाई असली तरीही इंदूबेनच्या दुकानात गेल्याशिवाय रहात नाही. गुजराथी लोकं तसेही खूपच खाऊ टाइपचे. त्यामूळे गुजराथमधे गेलं की व्हेज खाण्याची चंगळ असतेच. अहमदाबादला गेलो की नेहेमी हॉटेल चेम्बर्स मधे उतरतो ( लॉ गार्डन जवळचं) . तिथुन आश्रमरोडला असलेल्या आमच्या ऑफिसकडे जातांना चार पाच दुकानं लक्ष वेधून घेतात- एक हांडवो, दुसरं खींचू आणि दोन तिन खाकर्‍याची दुकानं, त्यामधले एक म्हणजे ’इंदूबेननू खाकरा’. हे दुकान इथे गेली पन्नास वर्षापासून आहे असे लोकं सांगतात. मी स्वतःच तर गेली वीस पेक्षा जास्त वर्ष झालीत पण ह्या दुकानातून खाकरा आणल्याशिवाय परत मुंबईला कधीच जात नाही. इंदूबेननू खाकरा, डबल डायमंडनूं सिंग हे मस्ट आहे अहमदाबादला.

परवा अहमदाबादला असतांना या दुकानात नेहेमीप्रमाणे गेलो होतो, आणि तिथे जावून रांगेत उभा राहिलो. हो, जसे पुण्याचे चितळे बंधु होते (काही वर्षापुर्वी )की जिथे लोकं रांगा लावून सामान विकत घ्यायचे, तशीच परिस्थिती इथली पण असते. इथे जवळपास पन्नास प्रकारचे खाकरे मिळतात. त्यातल्या त्यात मुलांना सगळ्यात जास्त आवडणारे पाणीपुरी, पावभाजी, बिस्किट खाकरा आणि जिरा हे प्रकार मी नेहेमी घेउन जातो घरी. पाणीपुरी खाकर्‍याला अगदी थेट पाणीपुरीची चव येते. त्या शिवाय  इथे मिळणारा बाजरीचा आणि मेथीचा खाकरा मला विशेष आवडतो.
सहज भिंतीकडे नजर गेली तर तिथे एक अवॉर्ड लावलेलं दिसलं. अरे? हे काय? मागल्या वेळेस तर नव्हतं असं काही. ते अवार्ड होतं टाइम फुड अवार्ड! दुकानदाराला विचारलं कधी मिळालं हे? तर म्हणाला, की नुकतंच म्हणजे पंधरावीस दिवसापुर्वीच मिळालंय हे अवार्ड! अहमदाबादी लोकं म्हणजे ’चवाण ’प्रीय, आणि त्यामूळे २०१० चं बेस्ट फरसाण अवॉर्ड जे या दुकानाला मिळालेले आहे त्या दुकानात फरसाण नक्कीच चांगलंच मिळत असणार. .

त्या काउंटरवच्या माणसाशी गप्पा मारायच्या होत्या, पण त्याला गर्दी मधे फक्त हिशेब करणे आणि माल देणे या शिवाय काही करायला वेळच नव्हता. तरी पण थोड्या गप्पा मारल्या, तर म्हणे की खुप वर्षापुर्वी एक घरगुती व्यवसाय म्हणून इंदूबेन यांनी सुरु केलेला हा व्यवसाय सचोटी, आणि स्वच्छता या जोरावर इतका मोठा झालाय. आज त्यांची मुलं हाच व्यवसाय सांभाळताहेत. म्हणाला, जूनीच रेसिपी, आणि स्वच्छता ह्या गोष्टी अजुनही पालन केल्या जातात ( अर्थात, टाइम्स ने अवॉर्ड दिलं, तेंव्हा ते ओघा ओघाने आलेच) .आणि म्हणूनच कुठलाही अहमदाबादी माणूस बाहेर जातांना इथे आल्याशिवाय जात नाही. इथुन अमेरिकेत पण खाकरा पाठवतो म्हणाला तो दुकानदार.

जुन्या दुकाना शेजारी एक नवीनच दुकान पण आता सुरु केलंय.खाकर्‍या व्यतिरिक्त इथे अजून बरंच काही फरसाण वगैरे पण मिळतं, ते मात्र कधीच घेउन पाहिलेले नाही. एक दिड किलो खाकरा मात्र आवर्जुन नेतो मुंबईला परत जातांना. वाजवी दर, आणि उत्कृष्ट क्वॉलीटी यांची खात्री म्हणजे हे दुकान. अहमदाबादला गेलात तर अवश्य भेट द्या..


लेखक: महेंद्र कुलकर्णी

पूर्वगंध

17 प्रतिक्रिया
 पावसाची लक्षणे आहेत. बाहेरचे ताट आत आणून ठेवायला हवे' शक्य तितक्या लवकर अंगणात जात प्रमिलाबाई मनाशी पुटपुटत होत्या. खरं तर ही कामं उन्हाळ्यातली.. आज पंधरवडा उलटेल पाऊस सुरु होवून! तसं बाकी वाळवण, कुरडया, पापड सगळं करुन ठेवलंय.. पण सगळच कसं जमणार? अंगणातला ऐवज स्वयंपाकघरात नेवून ठेवेपर्यंतही त्यांची दमछाक झाली. तसं व्हायच काही कारण नव्हतं, हे अंतर तरी कितीसे होते? अंगण म्हणायचे खरे, पण तो होता काही फरशांचा छोटा आयतच! कोपर्‍यात रांगणार्‍या मुलाप्रमाणे दिसणारा छोटा तुळशीकट्टा.. प्रमिलाबाईंनी 'अंगणातून' काही आणायला सांगितले, की वसंतराव जोरात हसत असत.. पण प्रमिलाबाईंना ही जागा प्रिय होती. संध्याकाळच्या गप्पांसाठी दोन चार बायका दाटीवाटीने बसण्याइतकी जागा तरी नक्कीच होती. छोटा सोपा आणि त्याला लागूनच स्वयंपाकघर.. त्यांच कृष्णकुंज मोठ्ठं नसलं, तरी आरामदायक आणि खूप खूप प्रेमळ होतं. पुन्हा परतून दारात येताना त्यांना समोरुन सर्रकन दोन गाड्या पुढच्या आळीत जाताना दिसल्या. इथे कुणाकडे थांबणार त्या? आणि थांबल्या असल्याच, तर कळल्याशिवाय का रहाणार आहे? शेजारच्या मंदाचा विचार मनात येवून त्या हसल्या.. येईल ती इतक्यातच बातम्यांची पोतडी घेऊन!
चहाची वेळ झाली होती, नवरा घरी नव्हता तरी त्यांनी दोन कप चहा टाकला. तेही बरचं झालं म्हणा, कारण लगोलग मंदा जणू दवंडी पिटतच आली.

"काकू, ऐकलं का, आपल्या गल्लीत गाडीवाले पाहुणे आलेत"
आपले विश्वसनीय वार्तापत्र वेळेत आले तर! त्या परत हसल्या.
"अगं, आत तर येशिल? ये बाई, चहा पी थोडा"
"अय्या, करुन ठेवला होतात? ठ्यँक्यू हं काकू.. "
मंदा सुर्रसुर्र करुन चहा पित मोठाच विलंब लावत आहे असे प्रमिलाबाईंना वाटू लागले.
"कुणाकडे पाहुणे आलेत म्हणालीस?"
"अहो पाहुणे कुठले? ते तर त्यांच्याच घरी आलेत! इनामदारांची नातवंडे आली आहेत. बर्‍याच वर्षांनी भारतात, त्यांच मूळचं घरं पहायला आले आहेत. इतकी वर्षे बंद असलेलं घर तरी उघडलं जाईल! नाहीतर या आडगावात काय आहे?"
"वहिनी आणि त्यांचा मुलगा पण आलाय का? "
" त्या खूप आजारी असल्याच ऐकलं होतं, त्या नाही आल्या आणि मुलगा तरी कशाला येतोय? बाकी, इथे चक्र उलटेच आहे, सूनेलाच या घरचा ओढा ज्यास्त! आता या काळात मुलगा काय मुलगी काय एकच हो, दोघेही शिकतात, दूर जातात. तुमची एकुलती मुलगी नाही का गेली गुजरातमधे..."

तिचे पुढचे शब्द प्रमिलाबाईंना ऎकून येईनासे झाले. दुरवरचे उडत जाणारे पक्षी पहावेत तश्या त्या शब्दांकडे पहात राहिल्या. डोळ्यांसमोर फक्त इनामदारांचे घर पिंगा घालू लागले. काकूंकडून फारसा प्रतिसाद नाहिसे पाहून मंदाने कंटाळून काढता पाय घेतला. संध्याकाळ गडद होत गेली तशा प्रमिलाबाईंच्या मनात आठवणी गर्दी करु लागल्या. ते घर, प्रशस्त, ऐटबाज, श्रीमंती थाटाच्या मोठ्ठ्या दरवाज्याचं घर! आजूबाजूच्या वस्तीशी तुलना करता महालच म्हणायला हवा. आपण लग्न करुन आलो, तेव्हा त्यांच्या घरासमोरुन जाताना अनामिक ठेच लागून बिचकल्यासारखं व्हायचं.. आणि काही महिन्यातच त्या घरचं एका पूजेचं आमंत्रण मिळालं, सगळी गल्ली जाणारच होती, आपण मात्र उगाचच नर्व्हस होत होतो.
"अगं प्रमिला, माणसंच राहतात तिथे.. घाबरतेस काय?"

घाबरण्याचा प्रश्न नव्हता. पण बेगडी आणि खोट्या अहंकारी वातावरणात आपला जीव कसानुसा होते हे अमान्य करण्यात तरी काय अर्थ होता?
ह्याच मंदाच्या सासूबाईंच्या मागोमाग गेलो होतो आपण. गुलाबाचा वास बाहेरच्या दारापर्यंत येत होता. तर्‍हेतर्‍हेच्या फुलांच्या माळांनी आणि सुगंधानी घर भरुन गेलेलं! सुगंधाचा एक अतिशय तलम पडदाच जणू या घराच्या आणि बाहेरच्या जगाच्या मधे उभा होता. भल्या थोरल्या अंगणात कडेला कितीतरी नाजूक फुलझाडे, मधेच छोटी कारंजी मुद्दाम मागवलेले रंगित पक्षी अर्थात पिंजर्‍यातले..
"प्रमे चल ना पुढे, अशी मागेच थांबू नको.."

मंदाच्या सासूने आपल्याला पुढे दामटलेले होते. हॉलमध्ये पाय ठेवताना पांढर्‍या फरशीऐवजी चुकून आपण कुठल्याश्या उथळ श्वेतरंगी पाण्यातच पाय ठेवला की काय अशी त्यांना शंका आली. चांदीच्या चौरंगावर बाळभटांनी काय सुरेख पूजा बांधली होती. चारी बाजूंनी आजूबाजूच्या बायकांची गर्दी जाणवत होती. जरीच्या पदराच्या टोकाला अवघडून बसलेले नाणे गाठ सुटताच झगझगून उठले. समोरच्या थाळीत शंभरांच्या नोटांच्या भाऊगर्दीत नाणे टाकून कुंकवाच्या हातांनी नमस्कार करुन मागे वळाल्या तेव्हाच 'ती' दिसली होती.
"अग्गोबाई, काकू उशीर केलात! बाकी नव्या नवरीला घेऊन आलात ते बरे केलेत हो.."
"हो ना, हिचं नाव प्रमिला, आणि या इनामदार वहिनी. नमस्कार कर गं.."
नमस्कार करताना वाकलेल्या खांद्यांना वहिनींनी बरचेवर उचलले. तेव्हाच प्रमिलाबाईंना जाणवले हा नखरेल किंवा खोटा स्पर्श नाही. कौतुकाने वहिनींच्या नथीतले पाणीदार मोतीही मंद हेलकावे घेत होते.
"माहेर गं कुठलं तुझं?"

"नांदगाव, इथलंच जवळचं"

"अय्या हो? माझंही तेच!"
काळ्याभोर डोळ्यांतल्या बाहुल्या आणखीनच मोठ्या झाल्या. त्यांच्या पदरावरच्या एका मोराने शेजारच्या मोराकडे हसून पाहिल्यासारखे तिला वाटले.
"येत जा गं प्रमिला, आपण बोलू नंतर"
नाजूक किणकिणता निरोप घेऊन त्या कुठेतरी सुगंधाच्या पडद्याआड गेल्या होत्या. ही पहिली भेट विसरणार कशी?

भूतकाळातल्या लाटा अशा एकावर एक आदळतच राहिल्या असत्या, एवढ्यात दार वाजले. आत येत वसंतरावांनी विचारले, "अस्सा विचार करीत बसलीस ते? बरं नाही का वाटत?"
"नाही हो, पलिकडे इनामदारांकडे कुणीसे आले आहे"
"हं"
त्यांचा 'हं' म्हणजे संवाद संपल्याची खूण होती. रात्रीची वेळ तर आठवणींची आवडती वेळ! अंथरुणावर पडल्या पडल्या प्रमिलाबाईंचे मन पुन्हा जुन्या फुलांचा वास घेऊ का? म्हणून विचारत होते. दुसर्‍यांदा कधी गेलो होतो आपण? आठवत नाही, एक दोनदा गेलो आणि जातच राहिलो. कशी घट्ट वीण बसून गेली होती दोघींच्यात. आजूबाजूच्या बायका चिडवायच्या एकाच गावच माहेर आहे म्हणून एवढ मेतकूट! पण इतकच कारण नव्हतं. वयाने मोठ्या म्हणून वहिनी म्हणायचं, पण माझी सखीच होती ती! त्या घरातलं घुसमटलेपण, बोच सगळं मोकळ केलं होत तिने! त्यांच्या लग्नातला भर्जरी शालू एके दिवशी हातात ठेवला होता तेव्हा खुळ्यासारखे बघतच राहिलो होतो आपण! हिरवागार श्रीमंती शालू! उत्कृष्ट रेशमी कापड, सुरेख नाजूक नक्षी.. तडफदार सोनेरी काठांवरुन हात फिरवतांना चटकन बोट कापेलच की काय या भितीने आपण हात काढून घेतला होता तेव्हा टपटपून मोगर्‍याची फुले सांडत वहिनी हसल्या होत्या. तीच मोगर्‍याची फुले साडीभर चिकटून बसल्यासारखी वाटली तिला. वहिनींना खूप प्रिय होती ती साडी. आत्ता कुठे असतील त्या? या विचारांसरशी पुढच्या न उमटलेल्या प्रश्नाची त्यांना खूपच भिती वाटली. असतील ना त्या?
सकाळी सकाळी मंदा घरी येणे हे संकटापेक्षा कमी नव्हते. तिच्या बडबडीने पुढची कामे खोळंबून रहात पण आज आपणहून प्रमिलाबाईंनी तिला हाक मारली.

"अगं ए, येशील का माझ्याबरोबर तिकडे, त्यांच्या नातवंडांनाच विचारु वहिनींच्या तब्बेतीबद्दल.."
'वेळ नाही' म्हणावेसे वाटूनही मंदा मुकाट प्रमिलाबाईंबरोबर चालू लागली. इनामदारांच्या कुठल्याश्य़ा नातवाने पाच मिनिटे थांबण्यास सांगून त्या दोघींना खुर्चीवर बसण्यास सांगितले. जुन्या वैभवाच्या खुणा पहात त्या तिथे बसल्या. हॉलमध्येच बरेच सामान विखुरलेले होते. कपड्यांचे, उंची भांड्यांचे वेगळे ढीग ठेवलेले होते. 'हे घर लवकरच विकणार ते बहुदा!' मंदा प्रमिलाबाईंच्या कानात कुजबुजली. इतक्यात नातू परत बाहेर येवून सामानाची उचक पाचक करू लागला.

"ए ती, ती साडी बघू"

आतून आलेली एक मुलगी, बहुदा त्या नातवंडांपैकी सर्वात मोठी, त्याला हिरव्या रंगाचे टोक दाखवत होती. ओढून काढलेली साडी नक्की तीच साडी होती, त्या मुलीच्या सुंदर आजीच्या लग्नातला मखमली शालू.
"काय डिझाईन आहे, हिः हिः हिः केवढं गॉडी डिझाईन आहे, भडक रंग, लुक ऍट धिस बॉर्डर.."
"हो ना, एवढ्या वजनदार वस्तूला कपडा म्हणण्याचे डेअरिंग होत नाही, खीः खीः"

"माय गॉड, आजीची असेल ही साडी?"
"हो, तुझ्या आजीचीच आहे, अतिशय आवडती..! तिच्या लग्नातला शालू. असंख्य स्वप्ने लपेटलेला शालू!"

आपल्या प्रिय मैत्रिणीच्या आवडत्या गोष्टीची टिंगल सहन न होवून ताडताड बोलत प्रमिलाबाईं पायर्‍या कधी उतरु लागल्या त्यांना कळलच नाही. ज्या तुच्छतेला त्या घाबरत होत्या ती त्यांच्या मैत्रिणीच्याच वाट्याला आली होती..
कृष्णकुंजच्या खिडकीतून बाहेर बरसणारा पाऊस त्या पहात होत्या. विस्कटलेले मन जरा थार्‍यावर येईल म्हणून निळ्या करड्या आकाशतुकड्याला नजर भिडवू पहात होत्या. संपूर्ण आभाळ बघण्याच्या उर्मीने बाहेर येवून अंगणातल्या पायर्‍यांवर उभे रहात त्या पावसाच्या काचसरी निरखू लागल्या. इनामदार वहिनींच्या आठवणीने का कुणास ठाऊक त्यांना त्यांच्या अंगणातल्या रंगित पक्षांची आठवण झाली. आवडीची वस्तू बाळगण्याचीही परवानगी नसावी त्यांना? बाजूला वसंतराव उभे राहिल्याची जाणीव झाली. सकाळचा प्रकार त्यांना कळलाच असावा.
"असं बघ, जुन्या गोष्टींबद्दल आपल्या मनात जी जागा आहे, ती दुसर्‍याच्याही मनात असणारच असे गृहित धरण्यात अर्थ नाही. आपण त्यांच्या वैयक्तीक बाबीमधे न पडलेलंच बरं! तुम्हा दोघींची सुखदुःखाची पाच सहा वर्षे तुमच्यापासून कोण हिरावून घेणार? खंत बाळगू नकोस. राहता राहिला शालूचा प्रश्न तर, समोर बघ.. एकदा तूच म्हणाली होतीस नां? अगदी हा तर वहिनींचा दुसरा शालूच!"
समोरच्या डोंगरावर पाऊस कोसळताना चंदेरी वर्ख सांडत होता. हिरवाकंच रंग डोलत होता, थेट वहिनींच्या हिरव्या शालूसारखा! मधल्या पायवाटेच्या कडेने नाजूक फुलांची नक्षी उमललेली होती. अप्रतिम सुगंध दरवळत होता. पाण्याची सळसळ ओलेत्या गवतांच्या निर्‍यातून जाणवत होती. समाधानाने प्रमिलाबाई बघत राहिल्या. या भरजरी हिरव्या शालूला नावं ठेवायची कुणाचीच हिंमत नव्हती!!


लेखिका: मीनल वाशीकर
http://gazali.blogspot.com/

सलाड ओलवीये (इराणी नाव) म्हणजेच चीकन सलाड

12 प्रतिक्रिया
मू ळच्या इराणी पण आता अस्सल भारतीय असलेल्या नीता रानडे आपणासाठी सादर करत आहेत एक इराणी पदार्थ.


 साहित्य:
उकडलेल्या बोनलेस चिकनचे बारीक तुकडे - २५० ग्रॅम 










 
उकडलेले बटाटे - २५० ग्रॅम






 



 उकडलेले वाटाणे - १ वाटी








उकडलेले गाजर - १ नग


 






लिंबाचा रस - १ लिंबू चवी नुसार
किंवा काकडी + वीनेगर + मीठ लोणचे चवी नुसार











मीठ / मीरपूड - चवी नुसार मायॉनेझ - २ मोठे चमचे चवी नुसार
बारीक केलेला कांदा - १ नग चवी नुसार

 









कृती - वरील सगळे जीन्नस एकत्र एकजीव करा. शीत कपाटात थंड करा. 
















नुसतेच सलाड किंवा पावाच्या दोन चकत्यामधे घालून खायला तयार.




 

टीप: हाच प्रकार शाकाहारी तयार करण्याकरिता चिकनच्या ऐवजी अळंबी(मश्रूम) किंवा पनीरचा वापर करता येईल. http://golikitch.blogspot.com/

कॉल सेंटरची दुनिया..

22 प्रतिक्रिया
कॉल सेंटर्स, कॉन्टॅक्ट सेंटर्स किवा बीपीओ नव्वदीच्या दशकात भारतात ह्यांच एकदम उधाण आले होते ते आजतागायतही टिकून आहे. भारतात इंग्रजी बोलणारी एवढी मोठी लोकसंख्या, चांगली शिक्षण पद्धती आणि बेरोजगारी ह्या मूलभूत कारणांमुळे आणि आपल्या गरजांमुळे जगाच्या नजरेतून असे गोल्डन मार्केट सुटणार नव्हते. सुरुवातीला मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्या अश्या गोष्टींसाठी नेमल्या गेल्या त्यात विप्रो, इन्फोसिस आणि सत्यम कंप्यूटर्स आघाडीवर होते. नुसत्या कॉल सेंटर्सला वाहून घेतलेल्या कंपन्या त्या काळी अस्तित्वात नव्हत्या आणि ज्या होत्या त्या सगळ्या उसात आणि यूकेत होत्या..हळूहळू ह्यातील मनी मार्केट ओळखून खूप सॉफ्टवेर क्षेत्रातील उद्योगपती स्वतंत्र कॉल सेंटर्स स्थापन करू लागले भारतात. ह्यांचा एवढा फायदा झाला की त्यानी खूप शहरात ऑफीसं चालू केली आणि आपला रेवेन्यू वाढवत नेला आणि अजुन वाढवतच आहेत.



तसा या क्षेत्रात मी तीन वर्ष कार्यरत आहे. गेले तीन वर्ष रोज नाइट शिफ्ट करतोय, पहले दोन महिने ट्रेनिंगचे सोडले तर. ह्या कालावधीत खूप मोठे चढ उतार बघत आज तिथेच टिकून आहे. अश्या खूप क्लाइंट्सना आपला बिजनेस वाढवताना बघितलंय आणि नुकसान करून घेतानाही पण बघितलंय. आता तुम्हाला थोडं ह्यांच्या कार्यपद्धती बद्दल सांगतो.. जेवढं मला माहीत आहे तेवढं.



एक मोठी कंपनी मग ती भारतीय असो किवा परदेशी (एमएनसी) जर ते एखाद प्रॉडक्ट बनवत असतील आणि मार्केटमध्ये त्याची विक्री करत असतील तर सेल्स एग्ज़िक्युटिव टीम नियुक्त करून, ऑनलाइन पोर्टल्स मधून ती सर्विस आपल्या ग्राहकांपर्यंत पोचवायचे काम ते उत्तमरित्या करतात. आता प्रॉडक्ट तर विकला त्यानी, आता कस्टमर्सला काही प्रॉब्लेम झाला तर परत ते त्या कंपनीला धरणार, मग परत त्यांची धावाधाव... हे असे का झाले, कसे ठीक करायचे ते. अश्यावेळी असे प्रॉब्लेम्स सांभाळायच काम एका दुसर्‍या कंपनीला देऊन आपण नवीन प्रॉडक्ट्स आणि सर्वीसेस वर काम करायचं. त्या कंपनीला आपल्या प्रॉडक्ट्सची सगळी माहिती द्यायची, प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे याचं ट्रेनिंग द्यायचं आणि त्याना पैसे पुरवायचे.. बस...आपण मोकळे त्यातून :)



आता परदेशी क्लायंट्स म्हटले की फिरंगी लोक आलेच आणि परदेशी क्लायंट मिळवणे हे सगळ्यात फायद्याचं. पैसे चिक्कार मिळतात, त्यांची नवीन टेक्नॉलॉजी शिकायला मिळते आणि मग क्लायंट खुश असेल तर बातच वेगळी. ह्या परदेशी कंपन्या एकेका कस्टमरच्या कॉलचे भारतीय लोकांना ४ ते ५ डॉलर देतात. हे साधे कस्टमर सर्विसचे कॉल्स. ह्या मध्ये अगदी बेसिक माहिती आणि प्रॉडक्ट सपोर्ट दिला जातो. पण हाच दर जर हार्ड कोर टेक्निकल पातळीच्या सपोर्टचा असेल तर १२-१५ डॉलर जातो. ह्यात मोस्ट्ली कंप्यूटर्स आणि सॉफ्टवेर निर्मिती करणारे क्लाइंट्स असतात. हाच सपोर्ट जर त्यांच्या देशात असता तर त्याना पर कॉल १८-२० डॉलर्र मोजावे लागतात, ते पण कस्टमर सर्विससाठी, टेक्निकल सपोर्ट तर सोडुनच द्या. आपल्याला मिळालेला हा कॉल्सचा दर एका बिडिंग मीटिंग नंतर दिला जातो. जो कमी पैशात काम करून द्यायला तयार त्याला हे कॉंट्रॅक्ट दिले जाते आणि ते पण एका वर्षासाठीचे. हवे तर कॉंट्रॅक्ट नंतर परत वाढवतात पण एका वर्षापेक्षा जास्त वेळ दिला जात नाही. कारण त्यामध्ये स्पर्धा वाढली जाते आणि क्लायंटला खूप पर्याय उपलब्ध होत राहतात. मग यात राजकारण येतेच, मुद्दाम आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीच्या लोकांना आपल्याकडे खेचणे, त्यांच्यातील मोठ्या पदावरील लोकांना भरपूर पैसे देऊन त्याच कंपनीमध्ये राहून प्रतिस्पर्धी कंपनीसाठी काम करायला लावणे अश्या खूप गोष्टी बघितल्या आहेत.



आता ह्या सगळ्या परदेशी वातावरणामुळे साहजिकच काही लोकांमध्ये एक धुंदी आणि मुक्तपणा येतो. हेच कारण दिले जाते ह्या बदनाम फील्डच्या बदनामीच. मी मान्य करतो काही जण अक्षरश: बेधुन्द असतात, वागतात, आपल्याला खूप मोठे समजतात. पण असे ही लोक आहेत ज्यांचे पोटपाणी या इंडस्ट्रीवर चालते, घरचा गाडा हाकण्यासाठी खूप पदवीधर, रिटायर्ड शिक्षक, कमी शिकलेले, शिकत असलेले इथे कामाच्या शोधात येतात आणि त्या फ्लोरचा एक घटक होऊन जातात. कस्टमर्सच्या शिव्या खात, त्याना समाजावत, त्यांचे प्रॉब्लेम सोडवत आपला सीसॅट (कस्टमर सॅटिस्फॅक्षन) आणि एएचटी (अवरेज हॅंडल टाइम) सांभाळत आपले टार्गेट्स पूर्ण करत असतात. दिलेली टार्गेट्स अचिव केली की मिळणारी शाबासकी, प्रमोशन सगळे सगळे सारखेच जे बाकी नॉर्मल ऑफीस (बीपीओ सोडून कारण आम्ही अब्नोर्मल लोक) मध्ये होतं...नाइट शिफ्टचा शरीरावर होणारा ताण सहन करणे ही खूप कष्टाची बाब आहे खरंच. आम्हाला फक्त एकच काम क्लायंटच्या कस्टमर्सना मदत करणे मग ते बाय हुक ऑर क्रुक आणि आपला पर्फॉर्मेन्स सांभाळणे कारण... THIS INDUSTRY SPEAKS PERFORMANCE DATA, IF YOU ARE GOOD IN IT YOU ARE GOOD, IF YOU ARE NOT YOU DON’T DESERVE TO BE HERE



चालायचंच, मला काही नाही करायचं. कोण काय बोलतय ह्या बद्दल..मी भला आणि माझ काम भलं :)




लेखक: सुहास झेले
http://suhasonline.wordpress.com/