दुबई, एक स्वप्न नगरी...अनेकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणारी एक रुपेरी पडद्यासारखी, झगमगाट असणारी नगरी. दुबईला मोठमोठी तारांकित हॉटेल्स आहेत, दुकाने आहेत आणि मोठ्या पगारावर नोकर्या करुन घर चालवण्यार्या मंडळींची संख्या सुद्धा इथे कमी नाही. इथे तर खरेदी उत्सव भरतो...खरेदी आणि विक्री. अशाच एका खरेदीची ही एक दर्दभरी कहाणी आहे.
रमेश एका सॉफ्टवेअर कंपनीत कामास होता आणि काही वर्ष नोकरी झाल्यावर त्याला त्याच्या कंपनीने १ वर्षासाठी कामानिमित्त दुबईला पाठवायचे ठरवले. त्याला फार आनंद झाला, आपण दुबईला जाणार या विचारानेच तो रोमांचित झाला होता...तिकडच्या लाईफ स्टाईलचे त्याला आता जबरदस्त आकर्षण वाटायला लागलं होतं. शेवटी फ्लाईट धरुन तो दुबईला पोहचला एकदाचा... मोठ्या मोठ्या टोलेजंग, गगनाला भिडणार्या इमारती पाहुन तो रोमांचित झाला होता. ’येस्स... ही लाईफ स्टाईल आपल्याला आयुष्यभर जगता आली पाहिजे’ असा विचार त्याच्या मनात तरळून गेला. त्याचे काम त्याला आवडणार्या स्वरुपाचेच असल्यामुळे तो अगदी मन लावून काम करत होता. अधे मधे जेव्हा त्याला वेळ मिळायचा तेव्हा तो तिकडच्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असे...आता त्याला इथे येऊन तब्बल ८ महिने झाले होते, वेळ कसा अगदी कापरासारखा उडून गेला हे त्याला कळलेच नाही, आता फक्त ४ महिनेच उरले होते त्याचे, तिथल्या वास्तव्याचे. तिथे त्याचे बरेचसे मित्र झाले होते. त्यातले बरेचजण तर त्याच्या ऑफिसमधलेच होते, त्याच्या बोलक्या आणि मोकळ्या स्वभावानेच त्याला अनेक मित्र दिले होते.
आता काही दिवसातच तिथे खरेदीचा उत्सव सुरु होणार होता...उत्सव कसला खरेदीचा महाकुंभमेळावाच म्हणायला हवे !!! तिथलेच, तसेच जगभरातील अनेक ठिकाणाहून लोक तिथे जमतात ते फक्त खरेदीसाठी, मौज मजा करण्यासाठी आणि स्वप्नवत आयुष्य जगण्यासाठी. आता काही महिनेच भारतात परतण्यासाठी राहिले असल्यामुळे त्याने सुद्धा जोरदार खरेदी करण्याचे ठरवले. अशाच एका दिवशी तो मित्रांबरोबर बाहेर फिरायला गेला होतो, फिरता फिरता तिथल्याच एका डान्स क्लब मधे त्याला त्याचा मित्र घेऊन गेला. आत शिरताच भारतीय गाण्याचे बोल त्याच्या कानावर पडले...पाहतोय तर हिंदी आयटम सॉंगवर बेधुंद नाचणार्या मद मस्त भारतीय तरुणी आणि त्यांच्या अवती भवती लोकांचा घोळका अगदी भान विसरुन नाचत होता. आपल्या येथील संगीतावर लोक नाचत आहेत हे पाहून तो क्षणभर चकित झाला आणि दुसर्या क्षणी आनंदीत सुद्धा.
मित्राबरोबर ड्रिंक्सचे दोन पेग मारल्यावर तो आणि त्याचा मित्र दोघेही त्या नाचगाण्यात स्वतःला पूर्णपणे विसरुन गेले. बराचवेळ नाचून झाल्यावर दोघेही थकले आणि त्यांनी आपापल्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतला. घरी गेल्या गेल्या, तो जो त्याच्या बिछान्यावर आडवा झाला तो दुसर्या दिवशी सकाळी १०लाच उठला, पण त्याला सुट्टी असल्याने त्याला आज ऑफिसला पळायची घाई नव्हती. मस्त पैकी अंघोळ करुन, तो तयार झाला होता...आज परत त्याला तसाच आनंद घ्यायची इच्छा झाली आणि त्याने त्याच्या मल्लु मित्राला फोन लावला व त्याच्या मनातला विचार बोलून दाखवला. तो मित्र मोठ्यांने हसला, म्हणाला "अरे एका रात्रीत तुझी ही अवस्था झाली तर तुला जन्नत दाखवली असती तर तु तर वेडाच झाला असता"...
"जन्नत?" रमेशने फोनवरच त्याला हा प्रश्न केला. त्याच्या मल्लुमित्राला इथे येऊन दीड वर्ष झाले होते तोही याच्या सारखाच भटक्या असल्यामुळे त्याला तिथल्या अनेक गोष्टींबद्धल आणि जागांबद्धल माहिती झाली होती..."ये जन्नत क्या चीज है?" रमेशने परत त्याला प्रश्न विचारला.
"अरे दोस्त शामको मिलना तुझे मै आज जन्नत की सैर कराता हुं! लेकीन जरा जेब भारी रखनी होगी."
"किती पैसे लागतील?" रमेशने परत प्रश्न विचारला...
त्याच्या मित्राने जो आकडा सांगितला तो ऐकून रमेश क्षणभर हडबडलाच्..."क्या? इतना? नही यार वापिस इंडिया मे भी तो कुछ ले जाना है मुझे."
"अरे यार एक बार देख तो ले, एक बार जन्नत के दर्शन तो कर ले, तेरा मन फिर बार बार उधर जानेको कहेगा, अगर तुझे पंसद नही आया तो तेरा सारा पैसा मे भर दुंगा... बास?"
"क्या ? सच्ची मे?"
"हां यार तु शाम को मिल तो सही."
संध्याकाळची वेळ ठरवून रमेश त्याच्या मित्रा बरोबर जाण्यास सज्ज झाला.
नक्की काय असेल तिथे? हा मला नक्की कुठे घेऊन जाणार असेल? कालच्या सारख्याच एखाद्या डान्स क्लबमधे तर नाही ना ? अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या मनातल्या विचारांमधे गर्दी करण्यास सुरुवात केली आणि तो आतुरतेने संध्याकाळची वाट पहायला लागला. ठरवलेल्या ठिकाणी ते दोघे भेटले, दोघांनी भरपूर गप्पा मारल्या. शेवटी रमेशने न-राहवुन त्याच्या मनातले कुतुहल बोलून दाखवलेच..."यार बता ना, किधर्को जाना है आज? और ये जन्नत-वन्नत क्या है? कोई क्लब का नाम है क्या?"
मित्र हसला म्हणाला... "जन्नत जन्नत होती है यार...उसके जैसा कुछ नही. जरा सबर कर."
त्यानंतर ते दोघे जवळच असलेल्या मॉल मधे फिरण्यास निघाले. दोघे भरपूर फिरले आणि चांगली पोटपुजा देखील केली. आता रात्रीचे ९:३० झाले होते, रमेशला घेऊन एका क्लबमधे त्याचा मित्र पोहचला...कालच्या सारखेच इथेही तसेच संगीत वाजत होते. फक्त इथे नाचणार्या भारतीय मुली जरा जास्तच सुंदर होत्या...इतक्या भरलेल्या पोरींना इतक्या जवळून, एव्हढा उत्तान नाच करताना त्यानी आधी पाहिलेच नव्हते..."अरे हा तर इथला छम छम्." मित्राने त्याच्या माहितीत भर घातली.
"चल अभी मेन जगह जाते है" असे म्हणून त्याच्या मित्राने त्याला हाथ धरुन क्लबच्या एका वेगळ्या भागात नेले...दांडगट दरवानाने करड्या नजरेने त्यांना पाहिले आणि त्या मल्लुला ओळखताच दरवाजा उघडून दिला. त्या दोघांचा एका वेगळ्याच दालनात प्रवेश झाला होता...थोडे आत गेल्यावर एका काऊंटरवर त्यांची थोडीफार विचारपुस झाली...कोडवर्ड मल्लु पुटपुटला... "व्हाईट बंगलो."
"ओह्ह, ओके," काउंटरच्या माणसाने लगेच चेहर्यावरचे भाव बदलले आणि तिकडच्याच एका खोलीत शिरण्यासाठी बोट दाखवले.
आत शिरताच त्या रुममधे त्या दोघांनी प्रवेश केला, तिथे एक बुटका माणूस एका टेबलापाशी बसून होता. रमेशला आता आपण कोणत्यातरी वेगळ्याच जागी आलो याची जाणीव झाली. ही रुम नसून रुमच्या आत मधेच एक वेगळा क्लब होता, तो म्हणजे देहबाजाराचा क्लब...बाहेरुन जरी आत एखादी साधी रुम असावी असे वाटले तरी हा तर चक्क अनेक पॉश रुमचा लॉजच होता.
त्या मल्लुने त्या बुटक्याला कानात काही तरी सांगितले आणि रमेशकडे बोट दाखवले आणि त्याला हाक मारुन त्याच्या कडचे पैसे मागितले, रमेशने खिशात हात घालून पैशांची गड्डी बाहेर काढली. ते पैसे त्या बुटक्याच्या हातात टेकवले, त्या माणसाने दोन वेगळ्या खोल्यांचे नंबर त्या दोघांच्या हातात टेकवले, आता मात्र रमेशला पूर्णपणे कळून चुकले होते की तो नक्की कुठे आला आहे...पण त्याची तीव्र उत्सुकता त्याला मागे फिरण्यापासून परावृत्त करत होती. हातातला नंबर पाहताना मित्र अचानक कुठेतरी निघून गेला हे रमेशला कळलेच नाही. तो त्या नंबरच्या रुम समोर आला आणि दरवाजा उघडून आत गेला. मंद प्रकाश असलेल्या या रुम मधे भारतीय संगीतच वाजत होते....गाण होते...छम छम करता है ये नशीला बदन...एक अतिशय सुंदर मुलगी पंजाबी ड्रेस घालुन बसली होती तिथल्याच एका बेडवर. ती भारतीयच आहे हे रमेशने लगेच ओळखले. तिने त्याला कोणते ड्रींक घेणार ते विचारले, सर्व सोय आधीच तिथे तयार होती. रमेशच्या तोंडातून एक शब्दही फुटेना !!! गोरीपान आणि इतकी बांधेसुद मुलगी त्याला काही प्रश्न विचारतेय याचे कुठलेच भान त्याला उरले नव्हते आता...ती हसली व हा नवखा आहे हे तिला समजल होते...त्याचा हात धरुन तिने त्याला आपल्या बाजुला बसवून घेतले...व त्याच्या केसांवरुन हात फिरवण्यास सुरुवात केली. रमेशचा गळा आता पार सुकला होता, तिच्या त्या गोर्या हातांचा स्पर्श अगदी मोहुन टाकणारा होता...ती म्हणाली "व्होडका?"
"अं, हं, हो," रमेशच्या ओठातून कसेबसे शब्द फुटले एकदाचे...दोन काचेचे पेले घेउन ती परत त्याच्या जवळ येउन बसली. दोघेही आता व्होडकाची चव चाखत होते आणि रमेश तर भारावल्यासारखा तिच्याकडे पाहतच होता.
"तू मॉडेल आहेस का कुठल्या जाहिराती मधली?"
त्याचा हा प्रश्न ऐकताच ती अचानक अस्वस्थ झाली आणि तिचे ते भाव मात्र रमेशने अचूक टिपले होते. जसे काही ऐकलेच नाही असा चेहरा करण्याचा तिने प्रयत्न केला.
"तुझे नाव काय" असा तिनेच प्रश्न विचारला.
"रमेश"....रमेशने आपले नाव सांगितले व बोलला "तेरा?"
" चिकीता" ती म्हणाली.
पण तिच्या नजरेतली अस्वस्थता मात्र रमेशला जाणवतच होती...ती एकदम गप्प झाली...रमेशने पटकन विचारले, "काय झाले?"
ती म्हणाली, "काहीही नाही."
पण तो म्हणाला, "नक्कीच काही तरी झालंय, तू सांग मला."
ती म्हणाली, "माझी गोष्ट ऐकशील?"
तो म्हणाला, "नक्कीच."
चिकीताने आपली कहाणी सांगण्यास सुरुवात केली...ती म्हणाली, "माझं खरं नाव गीता आणि एस्कॉर्ट मधलं चिकीता...मी मुंबईला एक मॉडेल होण्यासाठी आलेली होते... अनेक एजन्सीज मधे नाव नोंदवली, काही ठिकाणी पोर्टफोलियो देखील बनवले, पण कुठूनही संधी मिळत नव्हती...मला खात्री होती की मॉडेल बनण्याचे सर्व गुण माझात नक्कीच आहेत आणि आज ना उद्या मी टॉपची मॉडेल होऊ शकेन. पण नशिबात काही वेगळच लिहलं जाणार होतं ज्याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. अनेक एजन्सी मधे विचारणा करुन देखील संधी काही मिळत नव्हती... हळू हळू मी निराश होत चालले होते, पण अचानक एके दिवशी माझ्या मोबाईलवर तो कॉल आला.
गीताजी बोल रही है क्या?
मी उत्तरले, हा...मै ही गीता बोल रही हुँ ... आप कोन बोल रहे हो? तिकडच्या माणसाने उत्तर दिले जॉन... मै व्हिजन मॉडलींग एजन्सी से बात कर रहा हुँ...आपका एक पोर्टफोलियो हमने देखा और आप सिलेक्ट हो गई हो...क्या आप हमारी एजन्सी जॉइन करना चाहेंगी ? हे ऐकुन मला प्रचंड आनंदाच्या उकळ्या फुटल्या... हां, मैं बिलकुल तयार हुँ. कहां है आपकी एजन्सी?
मुंबईतल्या एका पॉश इलाक्यातल्या एका ९ मजले इमारतीचा तो पत्त्ता होता...त्यांनी मला ऑडीशन साठी तारीख दिली आणि मी त्या दिवशी तिथे अगदी वेळेवर पोहचले देखील... तिथे माझे नाव एका फॉर्म घेउन उभ्या असलेल्या मुलीला सांगितले. तिने तिच्या हातातले कागद पाहिले आणि एका लिस्ट मधे माझे नाव आहे का हे पाहिल्या सारखे केले. मुव्ह टू रुम नंबर ९ असे म्हणाली आणि गप्प झाली... ओके थॅंक्स म्हटले आणि रुम नंबर ९ शोधु लागले. शेवटी ती रुम दिसली... मी दरवाजा नॉक केला, मे आय कम इन ? येस, असा आवाज आतून आला. फोटो शुट साठी त्या खोलीत कॅमेरे लागले होते, सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे लाईट लागलेले होते, आणि तिथेच जवळ एक फोटो ग्राफर उभा होता... हाय आय एम सॅंडी. त्याने त्याची ओळख करुन दिली आणि मी देखील मग माझे नाव सांगितले. ओह्ह्ह येस गीता, राईट... आय हॅव सीन यअर युवर फोलियो... मग त्याने मला विचारले की आज शुट करण्यासाठी मी ओके आहे का ? जर आजचे शुट मधे मी त्यांना योग्य वाटले तर मग पुढे त्यांच्या एजन्सी थ्रू मला मॉडेल म्हणून काम करण्याची संधी मिळेल असे सॅन्डीने मला सांगितले... तो म्हणाला तिथे बाजूला एक ड्रेसिंग रुम आहे तिथे जाऊन योग्य असा ड्रेस घालून ये...
मला तर काय बोलायचे ते समजेनाच... मी शुटसाठी अगदी तयार आहे असं त्यांना सांगितलं आणि माझी पावलं कधी तिथल्या ड्रेसिंग रुमकडे वळाली ते माझं मलाच कळाले नाही !!! मी त्या रुम मधे गेले आणि तिथे असणार्या अनेक ड्रेस पैकी मला योग्य बसणारा ड्रेस पाहु लागले...एक गुलाबी रंगाचा ड्रेस मला दिसला, मला तो आवडला आणि तो घातला... जरासा तंग होता पण आता अधिक वेळ जाऊ नये म्हणून मी तोच घालून बाहेर पडले... प्रकाशाच्या झोतात माझे विविध पोझ मधले फोटो खेचण्यात सुरुवात झाली. मी अगदी हसतमुखाने आणि ओसंडत्या आनंदाने विविध पद्धतीच्या अॅंगल्समधे पोझ देत होती. जवळपास २:३० तास चाललेल्या शुट मधे वेळ कशी संपली ते माझे मलाच समजले नाही... या सर्व शुट मधे मी फक्त दोनदाच ड्रेस चेंज करुन फोटो काढले होते.
एका आठवड्यात फोन करुन कळवू असे सँन्डी मला म्हणाला...मी अगदी फुलपाखरु झाले होते...आनंदाने माझे उर भरुन गेले होते. आता सुरुवात झाली होती फोनची वाट पाहण्याची... कधी मला एकदाचा फोन येतोय...मी सिलेक्ट झाले असेन की नाही? या प्रश्रानी माझा आता ताबा घेतला होता...४ दिवस झाले होते पण अजून काही त्यांचा फोन आला नव्हता. एकदा वाटले आपणच फोन करुन पहावा एजन्सीला...म्हणजे कळेलतरी एकदाचे की काय निर्णय आहे माझ्या त्या फोटो शुटचा...पण मग विचार केला नको !!! उगीच उतावळेपणा दिसायचा. अगदी शेवटच्या दिवशी दुपारी माझा मोबाईल वाजला...व्हिजन एजन्सी मधूनच होता...मी सिलेक्ट झाले होते. मला तर क्षणभर काही सुचेनाच !!! एकदम भानावर आले...ती फोन करणारी मुलगी म्हणाली त्यांचे शुट १० दिवसांनी सुरु होणार आहे.... तर त्याची काही ट्रायल्स घेण्यासाठी मला बोलवले होते...मी तयार आहे म्हणाले. दुसर्याच दिवशी माझी काही मापं घेण्यात आली आणि त्यावर होणारे ड्रेस मी आता काही दिवसानी होणार्या शुट मधे घालणार होते... माझ्या बरोबर अजून काही मुली त्या ट्रायल शुट मधे मला दिसल्या. जवळपास ६ तास लागले संपूर्ण शुटला. ६ तासाचे मला ८ हजार पेमेंट दिले गेले आणि पुढच्या आठवड्याच्या शुटसाठी २० हजार रुपये शुट केल्याबद्धल मिळणार होते. इतक्या कमी तासात मला इतका पैसा मिळाला याचा मला अविश्वनीय आनंद झाला होता... आता मेन शुट ची वाट बघणे सुरु झाले...शेवट तो दिवस आला जवळपास ५ ते ६ फोटोसेशन्स झाली आणि मी एक मॉडेल म्हणून स्वतःची ओळख बनवण्यात यशस्वी झाले आहे असे मला वाटले. मी अगदी ढगात पोहोचले होते...जणू काही मुक्तपणे पंखाने उडणारी परीच जणू... अशी जवळपास ६ शुट मी केली...प्रचंड पैसा मिळाला होता. आता मला सांगण्यात आले माझे नेक्स्ट शुट दुबईत आहे. माझ्याकडे पासपोर्ट तयार होताच... तीन महिन्यानी माझे तिथले शुट ठरले. डायरेक्ट दुबईला आणि इथे एका हॉटलवर आम्ही पोहोचलो... रुमवर पोहोचताच आमचे पासपोर्ट काढून देण्यास सांगितले... हॉटेलमधे आलेल्या उतारुंची ओळख नोंदवून घेण्यासाठी आवश्यक आहे असे आम्हाला सांगण्यात आले. नाईलाज होऊन आम्ही आमचे पासपोर्ट काढुन दिले, आणि ते कधी आम्हाला परत मिळालेच नाहीत. वेश्या व्यवसायाच्या घाणेरड्या जगात आम्हाला लोटून देण्यात आले. देहविक्रय करणारी एक मॉडेल म्हणून माझा पहिला लचका तोडणार्याने मोठी रक्कम मोजली होती...त्यानंतर किती आले आणि गेले याचा आकडा मी विसरले आता !!! या दुबई फेस्टीवल मधे मी प्रचंड पैसा बनवून देणारी मशीन झाले आहे... पोरींनी इथे विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली आणि वर म्हणाले, त्याहून भयानक म्हणजे तुला इथल्या देहविक्रय करणार्यांच्या बाजारात विकले जाईल, कायमचे...देशात परत जायचे असेल तर आता १\५ महिना इथेच रहावे लागेल. मला पर्याय होता? नाही...इथल्या मुली म्हणाल्या मला... आता तुही एस्कॉर्ट झालीस, आमच्यातलीच एक. या नरकातून बाहेर पडण्याची रक्कम म्हणजे हा दुबई फेस्टीवल... हे झाले की हे लोक मला परत नेतील असं म्हणाले आहेत... आणि अश्या अनेक गिर्हाईकांपैकीच तू आजचा माझा गिर्हाईक आहेस. मी तुझी आजची खरेदी आहे."
रमेश थिजला त्याच्या कानात ’चिन्नमा, चिलकम्मा’ चे बोल पडत होते... त्याच्या खिशातले सर्व पैसे तिथेच ठेवून उभा राहिला आणि त्या खोलीच्या बाहेर पडला...या विचारात की त्याला आज नक्की काय जाणवले आहे!!!
लेखक: मदनबाण
http://madanban.blogspot.com/
यावरच्या 13 प्रतिक्रिया
ही सत्यकथा आहे का? वाटत नाही. प्रत्यक्षात या व्यवसायात लोटून दिलेल्या मुलींना स्वत:ची कहाणी सांगण्याइतपत मुभा मिळते का आणि त्या आपली कहाणी सांगत आहेत, हे त्यांच्या राखणदारांना (?) समजत नाही, हा संशोधनाचा विषय ठरेल. असो. पैशाच्या व प्रसिद्धीच्या लालसेने घर सोडून जाणा-या कितीतरी मुली या नरकात खितपत पडल्या आहेत. कधी कधी बातम्या ऐकायला मिळतात, तेव्हा खूप वाईट वाटतं.
कथा अर्धवट वाटली, काहितरी निर्णायक / विधायक वळणावर संपवली असती तर आवडलं असतं.
@कांचन ताई :---
ही कथा खरी नाही,पण याहुन अधिक वेदनामय आयुष्य जगणार्या मुलींची संख्या दिवसेन दिवस वाढत जाते आहे आणि हा आकडा वर्षाला काही लाख इतका असल्याचे समजले जाते.
====================
त्यक्षात या व्यवसायात लोटून दिलेल्या मुलींना स्वत:ची कहाणी सांगण्याइतपत मुभा मिळते का आणि त्या आपली कहाणी सांगत आहेत, हे त्यांच्या राखणदारांना (?) समजत नाही, हा संशोधनाचा विषय ठरेल.
>>>
ज्या मुली असे प्रयत्न करण्यात यशस्वी होतात त्यांना बर्याच वेळी सोडवण्याचे प्रयत्न केले जातात किंवा त्या सोडवल्या देखील जातात...ज्या मुली या नरकातुन सोडवल्या जातात त्या खरचं नशिबवान असतात असे मी म्हणेन.
आणि बातम्यांच म्हणत असशील तर या लिंकवर टिचक्या मारुन पहा :---
http://www.mid-day.com/news/2009/sep/210909-bars-sex-Ramzan-Dubai.htm
http://www.nriinternet.com/MIDDLE%20EAST/Dubai/2004_News/1_Prostitutation.htm
http://en.wikipedia.org/wiki/Human_rights_in_Dubai
http://gulfnews.com/news/gulf/uae/crime/women-escape-from-forced-life-as-prostitutes-1.262158
http://ibnlive.in.com/news/women-escape-from-dubai-sex-racket/24970-3.html
http://www.keralamonitor.com/dubaisexracket.html
http://en.wikipedia.org/wiki/Human_rights_in_Dubai
@श्रेया ताई :--- तुला वाटतय ते योग्यच आहे...ही कथा मी अर्धवट लिहुन सोडुन दिली होती त्याला जवळपास २-४ महिन्यांचा कालावधी झाला असेल.अंकाला कथा देताना ती पूर्ण करण्याची घाई झाल्याचे मी मान्य करतो.
ह्या व अशा कैक घटना मी फार जवळून अनूभवल्या आहेत. अगदी ह्या मुंबईत व मस्कत, ओमानला. पण गिर्हाईक म्हणून नाही तर एन्जीओच्या संबंधामुळे. आशा मुलींना बर्याच वेळा जीव गमवावा लागला आहे. त्यामूळे त्यांची काहाणी आपल्या पर्यंत पोहचतच नाही. जी पोहचते ती अर्धवट वा नाट्यमय करून चवीने वाचली जाते.
श्रेया भावनाको समझो, बुवांनी छान लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.
उत्कंठा अखेरपर्यंत टिकवून वास्तव प्रभावीपणें मांडलें आहे. अशाच कथा भारतांत देखील घडतात. फक्त मुली नेपाळ, बांगला देश इ. देशातून येतात. पण हें वाचूनहि मॉडेल मुली धोका पत्करून जातातच. हेंहि वास्तव आहे.
सुधीर कांदळकर
ही सत्यकथा जरी नसली तरी बरेच वास्तव सांगून जाते.....
मदनबाणा, प्रयत्न चांगला होता. मुली फसवल्या जावून त्यांना अश्या बाजारात अडकवले जाते हे सुध्दा वास्तव आहेच. झी-टिव्ही मराठी वर एकदा (२ महिन्यांपूर्वी) कोणत्यातरी सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री मुख्य सूत्रधार असलेल्या मालीकेच्या एका भागात एका डान्स बार मधील बाईची मुलाखत बघीतली. तिने स्वत:चे आत्मकथन पर पुस्तक पण लिहीले आहे. नाव नेमके आठवत नाहीये.
बुवा, मस्त विषय आणि समर्पक शीर्षक...
हे खरच अंधारमय जग आहे किती किती मूलीना यात गोवल गेलय याची गिनती करणे अशक्यच..
या काळ्या धंद्यात भारतात मॉडेल, तसच हवाईसुंदरी, टीवी-सिनेमा कलावंत सगळे सगळे सहभागी आहेत काही फसवले गेले म्हणून किवा काही फक्त पैशासाठी :(
बरीच वास्तववादी आहे कथा...हे घडते आहे हे आपल्या समाजाच दुर्दैव...
आता पुढल्यावेळी दुबईला जाईन तेव्हा सर्वांना भेटेन म्हणते. कस्स काय?
सगळीकडे असंच चाललंय. वाईट वाटतं फार. नुकताच टेकन (२००८) नावाचा एक चित्रपट बघितला. त्यात ह्युमन ट्राफिकिंगचे काही प्रसंग फार भयानक दाखवले आहेत. त्याची आठवण आली. खूप वास्तव लेख.
खरंय, या फसवेगिरीच्या जगात लोकं ओळखता न आल्याने फरफट झालेल्या मुलींची संख्या खूप आहे.
वेगळा विषय हाताळलात.
चांगली जमलीसा कथा! आवाडली. जरा लवकर संपल्यासारखी वाटता ह्या मात्र खरा!
टिप्पणी पोस्ट करा