जन्माचं सार्थक

6 प्रतिक्रिया
युगांची तहानेली, तापलेली धरणी सोसत आलीय जन्माची असोशी

आतुर डोळ्यांत प्राण आणून वाट पहातेय तुझ्या घनघोर बरसण्याची.

विरहाच्या वणव्यात होरपळणा-या, सुकलेल्या कोमेजलेल्या कायेला

कधी रे भिजवशील चिंब चिंब अमृताच्या वर्षावानं?

कधी रे रुजवशील सृजनाचे कोवळे कोंब तिच्या आसुसलेल्या कुशीत?

आळवून, वाट पाहून थकलेली, दमलेली खुळी बिचारी!

अन अचानक आला गंधभारला वारा प्राजक्ताच्या दारावरून.

एक वेडा चुकार, अवखळ, खट्याळ मेघ,

क्षणात सुखाचं शिंपण देऊन "थांब, थांब" म्हणेतो निघूनही गेला!

थरथरलेली, मोहरलेली चकित धरणी, चातक अवाक, पावशा स्तब्ध!

तनाच्या घुमटात मनाचा पारवा भान विसरून घुमतोय, फिरतोय!

खट्याळ मेघा, तूच सांग, अशा क्षणाच्या शिंपणानं

तिची युगांची तहान कधीतरी भागेल का रे?

तुझ्या घनघोर आवेगाचे उसळणारे अमृतघट

मुक्तपणे रिते करशील तिच्यावर, तेव्हाच होईल तिच्या जन्माचं सार्थक!
कवयित्री: क्रांति साडेकर
http://agnisakha.blogspot.com/
तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, इतरांनाही पाठवा!
Digg it StumbleUpon del.icio.us Google Yahoo! reddit

यावरच्या 6 प्रतिक्रिया

१७ जून, २०१०, ११:४९:०० AM

क्रांति, कविता छान आहे. थोडी वेगळ्या धाटणीची वाटली.

>>तुझ्या घनघोर आवेगाचे उसळणारे अमृतघट
कसं जमतं गं तुला लिहायला. मला तर आठवूनही आठवलं नसतं.

१७ जून, २०१०, ८:०४:०० PM

चातक अवाक, पावशा स्तब्ध.

एकदम झकास. कठीण परिस्थितीतला. पडत्या काळातला आशावाद आवडला.

वा!

सुधीर कांदळकर

१८ जून, २०१०, १२:३९:०० AM

तुझ्या घनघोर आवेगाचे उसळणारे अमृतघट

मुक्तपणे रिते करशील तिच्यावर, तेव्हाच होईल तिच्या जन्माचं सार्थक!

खरच सुंदर..

१९ जून, २०१०, १२:३०:०० AM

मस्त आहे. जरा वेगळी कविता. ग्लोबल वॉर्मिंग काव्यात गुंफाल्यासारखं वाटलं. :)

२२ जून, २०१०, ४:१६:०० AM

खट्याळ मेघा, तूच सांग, अशा क्षणाच्या शिंपणानं

तिची युगांची तहान कधीतरी भागेल का रे?

तुझ्या घनघोर आवेगाचे उसळणारे अमृतघट

मुक्तपणे रिते करशील तिच्यावर, तेव्हाच होईल तिच्या जन्माचं सार्थक!
खूपच सुरेख लिहितेस ग क्रांति .

२२ जून, २०१०, १२:३०:०० PM

थरथरलेली, मोहरलेली चकित धरणी, चातक अवाक, पावशा स्तब्ध!

क्रांती, खूप छान झाली आहे कविता.