हवा होतास तेव्हा फिरकला नाहीस
वाट बदलून, तोंड लपवून निघून गेलास
किती विनवण्या केल्या, आळवलं तरी
बघितलंही नाहीस मागे वळून!
आणि आता आलास आगंतुकासारखा
न सांगता-सवरता, अन कोसळलास
अस्ताव्यस्त, आंधळ्या हत्तीसारखा!
अरे, जरा पहायचंस तरी डोकावून आत!
कुणी अवघडलेली दिवस भरलेली
उद्याची माउली वेदनांनी तळमळतेय!
गर्भात गुदमरतोय कोवळा अंकूर,
तडफडतोय मोकळा श्वास घ्यायला!
कुठं ओल्या, फाटक्या चादरीच्या झोळीत
भिजतोय, गारठतोय देवकीचा कान्हा.
कोवळ्या जावळाच्या त्या तान्हुल्याला
उराशी कवटाळून आडोसा शोधतेय
अगतिक माय, डोळ्यांतलं पाणी डोळ्यांतच थोपवून!
गळक्या पत्र्यावर तुझा तडतड ताशा,
दचकून उठतोय इवलासा जीव.
कुठं खोपटात घुसलेल्या पाण्यावर नाचतोय
फाटका संसार, गाडगी-मडकी, विझल्या-भिजल्या-थिजल्या चुली!
"उद्या काय घालू लेकरांच्या पोटात?"
काळजीनं झुरणारी अस्वस्थ माय,
भिजून चिंब कुडाच्या भिंती, गवताचं छप्पर
कोसळेल कधी, कुणास ठाऊक?
थोडं वाकला असतास वस्तीत, पाहिलं असतंस त्यांच्या डोळ्यांत,
वाचली असतीस त्यांची मनं, तर कदाचित...........
कोसळलाही नसतास असा............ सैतानासारखा!
यायचं तर आहेच तुला, हवाच आहेस रे त्यांनाही तू.
पण जरा वेळेवर ये, हवा तेव्हाच ये,
त्यांच्याही मुखड्यावर हसू फुलवत.
एक सांगू? असा येऊ नकोस पुन्हा
जिथं तिथं उधळत विध्वंसाच्या खुणा!
कवयित्री: क्रांति साडेकर
http://agnisakha.blogspot.com/
http://agnisakha.blogspot.com/
यावरच्या 10 प्रतिक्रिया
ही कविता तर मस्तच आहे. पावसाच्या रौद्ररूपाने होणारी दैना अगदी प्रभावी शब्दांत मांडली आहेस तू. एक करूण चित्र डोळ्यासमोर उभं रहातं.
एक सांगू? असा येऊ नकोस पुन्हा
जिथं तिथं उधळत विध्वंसाच्या खुणा!
मुसळधार पावसाने आपले रंग दाखवायला सुरवात केलेली आहे.
कविता एकदम मस्त.
आवडली.
नि:शब्द करणारी कविता, केवळ अप्रतिम !हवा तिथे , हवं तेव्हा आणि हवा तेवढा न पडणारा बेभरवशाचा पाऊस.
दारिद्र्याचें चिरंतन दुःख स्तब्ध करून गेलें.
सलाम.
सुधीर कांदळकर
सुरेख कविता ...
सुरेख..पावसाच एकदम वेगळा रूप..आवडली कविता
खुपच छान कविता...पाउस एका वेगळ्या कोनातुन...अंतर्मुख करणारी...
बापरे.. भयंकर.. पावसाचा रौद्रावतार आणि त्याचे परिणाम खूप प्रभावीपणे व्यक्त झालेत.. खूपच आवडली कविता.
आधिची कविता आणि ही, दोन्ही पावसाची रुप दाखवणार्या कविता सुरेख झाल्यात.
what ever kay bolu yaar tula kadi hy sarv suchtay ekdem chan r
टिप्पणी पोस्ट करा