जागा बदल

8 प्रतिक्रिया


मी ज्या जागेत राहत होतो त्याचा मालक भाडे घ्यायला आला होता. मी पुढल्या महिन्यात ही जागा सोडणार... असे त्याला सांगितले. कराराप्रमाणे ३० दिवस आधी सुचना देणे आवश्यक होते म्हणून सांगितले. कोणत्या जागेत जाणार हे अजून ठरले नव्हते. १५ दिवस बायकोची व मुलांची, जागा बदलाच्या निश्चयाला संमती मिळवण्यात गेली. शेवटच्या १५ दिवसात जागेचा शोध सुरु झाला. तेव्हा कळले की नवीन जागेचा करार करताना बरीच कागदपत्रं गोळा करणे आवश्यक असते. त्या करता जागा मालकाने एजंट नेमलेला असतो त्याला शोधावे लागते. असा एजंट शोधण्या करता मी एक एजंट नेमला. मुलांच्या कामाच्या जागे पासून जवळ असणार्‍या भागात शोध सुरु झाला. एक जागा बघायला गेलो तेव्हा बायकोला वास्तूशास्त्र कळते हे मला कळले. तिने लगेच फ्लॅटचे दार कोणत्या दिशेला आहे हे विचारले. वास्तूशास्त्राचे हे ज्ञान बायकोला दूरचित्रवाणीवरील राशी, तारे, टारो कार्ड अशा टीआरपी वर्धक कार्यक्रमांनी दिले होते हे पण मला कळले.

दोन्ही एजंटनी लगेच खिशातले दिशा दर्शक काढून नेमकी दिशा सांगितली.

त्या जागेत आत गेल्यावर पाण्याचे नळ, स्वैपाकाचा ओटा, संडासाचे दार, अशा विविध जागा कोणत्या दिशेला आहेत ह्याचा शोध झाला. इथे, संडासाच्या दाराची दिशा... की बसल्यानंतरची दिशा... की घाण वाहून नेणार्‍या गटाराची दिशा... कोणती महत्वाची अशी एक शंका मी विचारली. पण बायकोने दंडावर जोरदार चिमटा घेत मला माझी दिशा अवगत करून देण्याचे कर्तव्य निभावले. तिला ती जागा आवडली होती, तिने होकार दिला व एजंटला त्याचा मोबदला देउन किल्ली मागितली. पण जागेचा मालक पुण्या बाहेर असल्याने रात्री फोन करून दुसर्‍या दिवशी किल्ली मिळेल असे ठरले. रात्री त्या जागेच्या मालकाने मला फोन केला. संभाषणात एकमेकांच्या माहीतीची देवाणघेवाण झाली. त्याने चांगला भाडेकरु मिळाल्या बद्दल आनंद व्यक्त केला. सकाळी किल्ली मिळेल असे ठरले. पण सकाळी किल्ली ऐवजी नकार मिळाला. त्या जागेच्या कोणत्या दिशेने आम्हाला नकार दिला ते मात्र कळले नाही.

मग दुसरा एजंट, वेगळ्या दिशा सगळे प्रकार घडले. परंतु जागा त्या पहिल्याच ईमारतीतल्या सहाव्या मजल्यावर होती. मालकाला माझे नाव समजल्यावर त्याने नकार दिला. ते दोघे जागा मालक परप्रांतीय होते. एकाच जागी सरकारी नोकरी करणारे होते. त्यांच्याच एका मोठ्या गटाने ते सगळे फ्लॅट विकत घेतलेले होते. त्या जागा मालकाचा नकार ऐकताच मी खवळलो होतो. फोन संभाषणातच मी त्याला नकार देण्याचे कारण विचारले.... पुण्यातल्या एका रानडे नावाच्या ब्राम्हणाला ह्या महाराष्ट्रातच एक परप्रांतीय नकार देतो हे चूक आहे... वगैरे मी बोलून गेलो. त्याने तितक्याच शांतपणे सागितले होते.... तो पण युपीतला ब्राम्हण होता. तो सरकारी नोकर होता व काही सरकारी बंधने असल्याने त्याने नकार दिला होता. पण त्या मालकाचा हा एजंट, तो पण युपीतला, वायुसेनेत कामाला असल्यामुळे पुण्यात बदलीवर आला व इथेच स्थाईक झालेला पण त्याला धंदा करायचा होता. त्याने नकाराचे कारण शोधून काढले. नवीन नियमां प्रमाणे, नोकरी करणार्‍या जागा मालकाने जागा भाड्याने दिल्यास १२.५ टक्के व्हॅट द्यावा लागणार वगैरे कारणे त्या एजंटने मला समजावण्याचा प्रयत्न केला होता.  ते सरकारी नियम, ते सगळे घोळ समजवून घेण्यात मला माझे रक्त आटवायचे नव्हते.

मी त्या एजंटला हे सगळे घोळ नसलेली जागा शोधायला सांगितले. नशीब माझे मला तशी जागा मिळाली व त्या जागेत माझे अस्तित्व हलवण्या करता काय घडले ते आता ऐका.

जागा बदलायची म्हणजे राहत्या जागेतील सामान नवीन जागेत नेण्याकरता नीट आवरून गाठोड्यात बांधणे अथवा खोक्यात भरणे आलेच. माझे सामान नेण्या करता एक ट्रक आवश्यक होती. म्हणून सामान
ने-आणीचा व्यवसाय कारणारी व्यक्ती मी शोधून काढली. त्याने एकूण नगांची मोजणी केली, मनुष्य बळ किती लागेल कोणती गाडी.. हे सगळे ठरवले, मला एका रितसर कागदावर लिहून दिले. काळ वेळ निश्चित केले. कामाचे स्वरुप ठरवणे व कामाला सुरूवात करणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत हे फक्त मला समजून उपयोगाचे नव्हते.... ही वास्तवता बायकोला समजवून देणे फार महागडे ठरले, इतके की दोन महीने उलटून गेले पण आजही तो विषय सगळ्या गल्लीबोळातून फिरुन चूक माझीच होती ह्या वाक्यावर येऊन थांबतो.

नऊ वाजता, आवरा आवरी कामाला ठरल्याप्रमाणे सुरुवात न होता १५ फोन झाले तेव्हा कुठे १२:३० ला काम सुरु झाले. ह्या कामाचा रितसर कागद बनवणारा आधिकारी न येता  दुसराच आधिकारी आला होता. काम लवकर संपवावे म्हणून आम्ही काही आवरा आवर केली होती, ती गाठोडी उघडून त्याने घोळ वाढवून ठेवला. बायकोने दुपारच्या चार वाजता अशूभ राहू काल सुरु होण्याची धास्ती घेतलेली होती. त्याचा फायदा घेत ह्या नवीन आलेल्या अधिकार्‍याने सामान जास्त आहे. दोन फेर्‍या करणे आवश्यक आहे वगैरे दबाव वाढवायला सुरु केली. बायको भडकली, तिने मोबाईल काढला व चक्क पोलीस स्टेशनला फोन केला. तो नवीन आलेला आधिकारी फार घाबरला. सणसणीत चपराक बसल्यासारखे सगळे कामाला लागले. तरीही चौथ्या मजल्यावरून तळमजल्याला सामान जायला सात वाजले. नवीन जागेत आम्ही सामानासकट साडेआठला जाऊन टेकलो. सगळे सामान उतरवून घेतले. नवीन जागा पहिल्या मजल्यावरच असल्याने तसा त्रास कमी होता, तरीही रात्री ११:३०ला काम संपले. प्रत्येक कामगाराला ७० रुपये वेगळे बक्षीस दिले व त्या संस्थेला ३५०० रुपये दिले. त्या कामगारांपैकी एकाला सामान आणि गाडीतल्या जागेची खूप चांगली जाण होती. त्याने ते सगळे सामान छानपैकी एका फेरीत जाईल असे बसवले होते व त्याप्रमाणे कोणतीही तोडफोड न होता सगळे सामान नवीन जागेत आले होते.

जुन्या जागेत दोन झोपायच्या खोल्या होत्या. एक दिवाणखाना, स्वैपाक घर अशी १००० चौरसफूटी जागा होती. नवीन जागेत दोन झोपायच्या खोल्या + संडास + अंघोळीची जागा, एका झोपायच्या खोलीला वेगळा संडास + अंघोळीची जागा, एक भला मोठा दिवाणखाना, स्वैपाक घर व तीन छान बाल्कनी अशी रचना होती. चांगली १५५० चौरस फूटी ऐसपैस जागा! विशेष म्हणजे जुन्या जागे एवढ्या भाड्यातच ही नवीन जागा आहे.
पुढे हे सामान उलगडून व्यवस्थितपणे लावायला जवळपास १५ दिवस गेले..ती कहाणी वेगळीच आहे. असो आता इथेच थांबतो .
लेखक: विनायक रानडे
http://vkthink.blogspot.com/
तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, इतरांनाही पाठवा!
Digg it StumbleUpon del.icio.us Google Yahoo! reddit

यावरच्या 8 प्रतिक्रिया

१७ जून, २०१०, १:०४:०० म.उ.

घर बदलतानाची कटकट....! दोनदा हा अनुभव घेतला आहे. जुन्या घराची सवय सहज सुटत नाही पण नवीन घर हवं तसं असेल तर चटकन जम बसतो.

१७ जून, २०१०, ४:१४:०० म.उ.

मी ही हा अनुभव घेतला आहे चांगलाच. त्यावेळी नवरा परदेशी, माझ्या सोबत ५ वर्षाचा मुलगा आणि ६७ वर्षाच्या सासूबाई होत्या. त्यामुळे स्टॅम्पिंग, रजिस्ट्रेशन पासून ते प्रत्यक्ष शिफ्ट होऊन सामान लागेपर्यंत सगळ्या आघाड्यांवर एकटीच झुंजत होते.

१७ जून, २०१०, ५:०८:०० म.उ.

रानडेसाहेब तुमची वर्णनशैली सुरस आहे!

वास्तुशात्र आणि राहुकाल याविषयी अनेक अद्भूत हकिकती ऐकून आहे.

एका हकिकतीत तर वास्तुशात्र अनुकूल व्हावे म्हणून संडासातील सीट ९० अंशात वळवून घेतली होती. ते उदाहरण माझ्या पक्के स्मरणात राहिले आहे.

१७ जून, २०१०, ८:२३:०० म.उ.

व्वा, माझे अनुभव लिखाण तुम्हाला आवडले, आभारी आहे.

१७ जून, २०१०, ९:५१:०० म.उ.

जागा बदलणे हे अगदी वैतागवाडीचे काम आहे हे आता व्यवस्थित समजले मला !!! :)

१८ जून, २०१०, २:५६:०० म.पू.

विंचवाच बिऱ्हाड पाठीवर ..काय करणार पर्याय नाही.. :(

१८ जून, २०१०, १२:४८:०० म.उ.

मस्त जमलें आहे. वास्तुशास्त्राच्या आणि राहूकालाच्या फेर्‍यातून सहीसलामत सुटल्याबद्दल अभिनंदन.

नेहमींप्रमानॆं तुम्हांला एकतरी विचित्र माणूस भेटलाच. तरी सामानाची मोडतोड न होतां नवीन घरांत आलांत हें काय कमी आहे? छान.

सुधीर कांदळकर

२२ जून, २०१०, १:५९:०० म.उ.

नविन जागा तुम्हाला हवी तशी मिळाली हेही नसे थोडके!