मेधाची नजर झरझर मॉनिटरच्या स्क्रिनवरून वरखाली हो्त होती. तिला अपेक्षित असलेलं उत्तर मिळायची आजची शेवटची मुदत होती. ते उत्तर आल्यावर तिला एक निर्णय सुजयच्या कानावर घालायचा होता. आलेलं उत्तर होकारार्थी असेल तर, निर्णयाचे वाईट परिणाम दीर्घकाळापर्यंत तिला सोसावे लागणार नसते. पण उत्तर जर नकारार्थी आलं असतं तर मात्र निर्णय आणि त्याचे परिणाम भोगणं तिला स्वत:लाच जड जाणार होतं. सध्यातरी तिने घेतलेला निर्णय एकतर्फीच होता.
केबीन एकदम अंधारून आल्यासारखी वाटल्यामुळे, तिने मागच्या बाजूला असलेल्या काचेच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. आकाश अंधारून आलं होतं. काळे कुट्ट् ढग एखाद्या हवेच्या फुग्याप्रमाणे टच्च भरले होते. पाऊस कधीही कोसळायला लागला असता. हे वातावरण जणू काही तिच्या मनातल्या आंदोलनांचीच ग्वाही देत होतं. तिच्या डोळ्यात येऊ पहाणारं पाणी तिने त्या ढगांसारखंच थोपवून धरलेलं होतं.
आज शनिवार म्हणजे सप्ताहांत. त्यातून पावसाळी दिवस. त्यामुळे ऑफिसातले बरचसे तरूण-तरूणी सहलीला गेले होते. मेधालाही आमंत्रण होतेच पण खाजगी कामाचे निमित्त सांगून ती गेली नव्हती. ती न गेल्याने सुजयही इच्छा असून सहलीला गेला नाही. आणि मेधाचा सहवास मिळावा म्हणून सुट्टीचा दिवस असूनही तिच्याचसारखा ऑफिसला आला होता.
एक वर्षापूर्वीच मेधा आणि सुजयचा साखरपुडा झाला होता. सुजय मूळचा ग्रामीण भागातून आलेला. गावात आई-वडिलांचा राजकारणात सक्रिय सहभाग. सुजयला मात्र राजकारणाचा तिटकारा होता. वडिलांच्या मागे लागून शिक्षणाकरता म्हणून मुंबईला आला. तसा शिक्षणातही त्याला रस नव्हताच, पण घरी राहिला असता तर वडिलांसारखं राजकारणात उतरावं लागलं असतं. त्यापेक्षा शिक्षणाच्या नावाखाली घरापासून लांब पळता आलं. जेमतेम पदवी मिळवल्यावर पुन्हा वडीलांच्याच वशिल्याने या एका प्रतिष्ठित कंपनीत नोकरीही मिळाली आणि मग परत घरी न जाण्याचा जणू त्याला परवानाच मिळाला. मुंबईतलं छंदीफंदी आयुष्य त्याला मनापासून आवडलं होतं. लहानपणापासून कधीच कसलीही ददात आई-वडिलांनी पडू न दिल्याने त्याला कसलीच महत्वाकांक्षा नव्हती. खावं, प्यावं, मजा करावी असं खुशालचेंडू आयुष्य चाललं होतं. नाही म्हणायला शरीर कमावायची त्याला मनापासून आवड होती आणि त्याकरता लागेल ती मेहनत करायचीही तयारी होती.
याउलट मेधा मात्र डॉक्टर आई-वडीलांची एकुलती एक लेक. नावाप्रमाणेच बुद्धिमान शिवाय बुद्धीबरोबर सहसा न मिळणारं सौंदर्यही तिला लाभलं होतं. आई-वडिल डॉक्टर असले तरीही सेवाभावी वृत्तीचे असल्याने खाजगी दवाखाना न काढता सरकारी दवाखान्यात काम करणारे. त्यामुळे फार सधन नसले तरीही खाऊन पिऊन सुखी कुटुंब होते. वडिलांच्या अकाली मृत्युने आणि त्यानंतर आईने अर्धांगवायूने अंथरूण धरल्यामुळे मेधावर फारच लहान वयात कुटुंबप्रमुखाची जबाबदारी येऊन पडली होती. शिक्षण पूर्ण करता करताच तिला नोकरी करावी लागली. पण तिच्या महत्वाकांक्षेपुढे येणार्या अडचणी फिक्या ठरल्या आणि सुरूवातीला केवळ क्लार्क म्हणून लागून आज याच कंपनीत मेधा मॅनेजरच्या पदावर पोचली होती केवळ दोन वर्षात.
दोन वर्षापूर्वी ती जेव्हा या कंपनीत रूजू झाली त्यावेळी सुजय तिचा वरिष्ठ होता. ती करत असलेल्या कामाला तो जबाबदार असे. पण सहा महिन्यांचा काळ संपल्यावर कायम होताना ती सुजयच्या खांद्याला खांदा लावून कंपनी करता काम करू लागली. आणि आता सहा महिन्यापूर्वीच तिला बढती मिळून ती मॅनेजरच्या पदावर काम करत होती.
मेधा प्रथमदर्शनीच सुजयच्या प्रेमात पडली होती.त्याचं व्यायामाने कमावलेलं बलदंड शरीर आणि रूबाबदार व्यक्तिमत्व याने मेधाच्या मनावर एक प्रकारे गारूड केलं होतं. अन्यथा महाविद्यालयीन जीवनात अनेकांना नकार दिलेल्या मेधाने सामान्य वकुबाच्या सुजयला होकार देण्याचे काहीच कारण नव्हते. खरं तर मेधाने सुजयला होकार दिला असं म्हणण्यापेक्षा सुजयने मेधाला होकार दिला असं म्हणणं योग्य ठरेल कारण विचारणा मेधाकडून झाली होती. सुजयला लग्नात अजिबात रस नव्हता. प्रेम करायला त्याची हरकत नव्हती पण लग्नाचं बंधन त्याला नको होतं. हे ही कारण त्याला घरापासून लांब रहायला प्रवृत्त करत होतं. कारण घरी त्याला असं स्वातंत्र्य मिळू शकलं नसतं. नोकरीला लागल्यानंतर आई-वडील लग्नाकरता त्याच्या मागे लागले होते, पण हा अजिबात बधत नव्हता. बंधनात अडकायची इच्छाच नसल्याने आजपर्यंत इतक्याजणी त्याच्या मागे लागूनसुद्धा तो कोणाच्या जाळ्यात अडकला नव्हता. पण मेधाच्या बाबतीत मात्र काहितरी वेगळं घडलं.
एव्हाना बाहेर पाऊस पडायला सुरूवात झाली होती. आणि इथे आत मेधाचेही डोळे गळायला लागले होते. प्रत्यक्ष निर्णय जाहिर करायच्या आधीच हे आपल्याला काय होतयं हे तिला समजत नव्हतं पण इतक्या दिवसांचं मनावरचं साचलेलं मळभ आज तिला दूर करायचं होतं.
मेधाला सुजय आवडतोय हे तिने कधीच लपवून ठेवलं नव्हतं. किंबहुना आपण विचारलं तर सुजय आपल्याला नकार देऊच शकणार नाही असा एक आत्मविश्वास तिच्या वागण्यातून जाणवायचा. हळूहळू सुजयलाही तिच्या आक्रमक व्यक्तिमत्वाची मोहिनी पडली आणि मेधाचा सहवास आपल्याला आवडतोय हे त्याला जाणवायला लागलं. इतर जणींना टाळून तो तिच्या अवती-भोवती असायला लागला. त्याच्या विचारण्याची वाट पाहून कंटाळून एक दिवस मेधानेच त्याला जेव्हा लग्नाचे विचारले तेव्हा तो विचारात पडला. अर्थात मेधाशी लग्न बिग्न करायचा विचार त्याने केलेला नव्हताच पण तिच्याबरोबर एकत्र रहायला त्याची आता हरकत नव्हती. मेधाला मात्र लग्नाशिवाय एकत्र रहाणे मान्य नव्हते. मेधाबरोबर रहायचे तर होते पण लग्नही करायचे नव्हते असा तिढा आता कसा सोडवणार ? एकीकडे आई-वडिलही मागे लागलेले; त्यांना माझ्या लग्नाच्या फंदात पडू नका असे सांगून बसलेला. तरीही आई-वडीलांना मेधाबद्दल कुणकुण लागली. आडून आडून चौकशी करून त्यांनी खरं काय आहे ते त्याच्याकडून वदवून घेतलं. मेधाबद्दल माहिती काढली आणि इतकी चांगली मुलगी आपल्या मुलाच्या प्रेमात पडली आहे पण तो करंटा तिच्याशी लग्नाला तयार होत नसल्याबद्दल त्याला बोलही लावले. सगळ्या बाजूने त्याच्या लग्न न करण्याच्या इच्छेला विरोध होऊ लागल्यावर शेवटी कुरकुरत का होईना तो लग्नाला कबूल झाला. मेधा त्याच्या घरी सगळ्यांना भेटून आली. कर्तृत्ववान सून मिळाल्याबद्दल त्याच्या आई-वडीलांना आनंद झाला होताच. शिवाय तिच्याचमुळे सुजय लग्न करून मार्गाला लागेल ही त्यांची इच्छा तो पूर्ण करत होता. इथे मेधाच्या आईलाही सुजयच्या आर्थिकदृष्टया संपन्न पार्श्वभूमीमुळे आपली मुलगी सुखात राहिल याची जणू हमीच मिळाली आणि तिनेही त्या दोघांना आशिर्वादच दिले.
मात्र दोन वर्षांनी लग्न करायचे ही सुजयनी अट घातली. दोन वर्षात नाहीच एकमेकांच पटलं तर वेळीच निर्णय बदलता यावा याकरता ही मोकळीक असावी हा त्याचा हेका होता. त्याच्या लग्नाच्या नसलेल्या इच्छेची पार्श्वभूमी त्याच्या आई-वडीलांना माहिती असल्याने त्यांना ही अट मान्य नव्हती पण अजिबात लग्नाला उभा न रहाणारा मुलगा आता निदान दोन वर्षाने का होईना पण लग्न करेन म्हणतोय म्हणून त्यांनी या अटीला मान्यता दिली. मेधानेही ही अट मान्य करताना मात्र निदान साखरपुडा करून घेऊया असं म्हणत त्याचं मन वळवण्यात यश मिळवलं.
आणि सरतेशेवटी बरोबर एका वर्षापूर्वी त्यांचा साखरपुडा पार पडला. आता हे वर्ष पार पडलं की लग्न. पण आता सुजयच इतका तिच्या प्रेमात बुडाला होता की आपण उगाचच ही दोन वर्षाची अट घातली असे त्याला राहून राहून वाटत होते. साखरपुडा झाल्याने तो आता तिच्यावर पारंपारिक नवर्याप्रमाणे हक्क गाजवायला लागला होता. मेधा स्वत: आक्रमक वृत्तीची असल्याने दुसर्याच्या अतिक्रमणाची तिला अजिबात सवय नव्हती, पण केवळ सुजयवरच्या प्रेमामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करू शकली. त्यांचा साखरपुडा झाल्यावर पहिले सात-आठ महिने बरे गेले. आणि अचानक चार महिन्यापूर्वी सुजयने तिला हि नोकरी सोडायला किंवा दुसरी धरायला सांगितले. मेधाचा मात्र ह्याला विरोध होता. परिस्थितीशी झगडून तिने शिक्षण आणि नोकरी दोन्ही मिळवले होते. आता त्या मिळालेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करण्याऐवजी नोकरी सोडून देणे तिला मानवणारे नव्हते. तिने याविषयी सुजयशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण, त्याच्या हेक्यापुढे सगळे व्यर्थ. शेवटी तिने स्वत:च्या मनाविरुद्ध सद्य नोकरी बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यादिशेने शोध चालू ठेवला. तिला सुजयच्या वागण्याचे राहून राहून आश्चर्य वाटत होते. साखरपुडा झाला तेव्हा तिच्या नोकरीला विरोध नसलेला तो आता मात्र काहितरी वेगळंच वागत होता. तिने त्याच्या मनात काय आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला पण त्यात तिला यश येईना. आणि एक दिवस अचानक तिच्या डोक्यात प्रकाश पडला.
त्याचं असं झालं की, ती तिच्या एका लग्न झालेल्या मैत्रिणीबरोबर सोबत म्हणून एका मॅरेज कौन्सिलरकडे गेली होती. तिथे त्यां दोघींचे संवाद ऐकता ऐकता तिच्या डॊक्यात ट्यूब पेटायला लागली. तिला मिळालेली पदोन्नती, त्या पदाबरोबर मिळणारा मान आणि तिच्यासारखी मुलगी बायको होणार म्हणून इतरत्र सुजयला मानल गेलेलं ’लकी’....हे सगळं त्याला पचवायला जड जातयं. तिच्यासारखी हुशार, करारी, तत्वनिष्ठ मुलगी त्याला आता झेपत नव्हती. तिची आर्थिक-बौध्दिक कोंडी केली तर कदाचित आपला निभाव लागू शकेल असं तर सुजयला वाटत नव्हतं ना ? या विचाराने मेधा हबकली. ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं तो स्वत:च्या अस्तित्वाकरता तिचं अस्तित्व मोडू-तोडू पहात होता. तिला आहे तसं स्वीकारण्यापेक्षा तो स्वत:च्या पद्धतीने तिला घडवू पहात होता. तिचा उत्कर्ष त्याला सहन होत नव्हता. एका पारंपारिक नवर्यासारखं तो हे जे वागत होता ते आता मेधाला पचण्यासारखं नव्हतं. ही तर फक्त एका नोकरीची घटना होती. पण २४ तास एकत्र राहिल्यावर मेधाच्या तेजापुढे सुजय कसा काय टिकाव धरेल याबद्दल आता तिला काळजी वाटू लागली. अलीकडे त्याच्या नसलेल्या महत्वाकांक्षेबद्दल तिला अनेकवेळा आश्चर्य वाटे. पुढे लग्न झाल्यावर मग पश्चाताप करण्यापेक्षा ’ स्टिच इन टाईम सेव्हज नाईन’ या उक्तीप्रमाणे तिने अजून लग्नाला एक वर्ष अवकाश असतानाच यावर तोडगा काढायचे ठरवले. तिला शंका आल्यावर तिने या शंकेची सुजयच्या वेगवेगळ्या वागण्यातून खात्री करून घेतली आणि शेवटी ती सुजयशी लग्न न करण्याच्या निर्णयापर्यंत पोचली होती.
तिच्या मॉनिटरवर ’यू हॅव रिसिव्हड ऍन ईमेल’ असा संदेश झळकला. तिने रडणं थांबवून आलेला संदेश वाचला. तिच्या अपेक्षेप्रमाणे तिने अर्ज केलेल्या नोकरीचे होकारार्थी उतर आले होते. हा एक प्रकारे तिला शुभशकूनच वाटला. आता सुजयला सामोरे जाताना कमी त्रास होईल कारण ही त्यांची शेवटची भेट असेल. लगेचच या नोकरीचा राजीनामा देऊन ती नव्या नोकरीत रूजू होणार होती. एकीकडे हा निर्णय घेताना, ज्याच्या आयुष्यावरही याचा परिणाम होणार आहे त्या सुजयला विश्वासात न घेतल्याबद्दल तिला अपराधी वाटत होतचं. पण त्याच्या पारंपारिक मानसिकतेपायी तिला स्वत:च्या व्यक्तिमत्वाचा बळी द्यायचा नव्हता. या निर्णयाकरता त्याने तिला जबाबदार ठरवणंही तिला मान्य होतं. खरं तर जो हेका तो चालवत होता....तसाच हेका तिचाही होता. आणि म्हणूनच पुढे जाऊन दोघांचं पटू शकणार नसल्याची कल्पना तिला आली होती. रोज वादविवाद करून डोक्याला ताप करून घेण्यापेक्षा गोडी असतानाच संबंध तोडले तर एकमेकांविषयी मनात अढीतरी राहाणार नाही अशी एक तिची कल्पना होती. शिवाय सुजयला मुळातच लग्नाची इच्छा नसल्याने कदाचित हे संबंध तोडायला तो नकार देणार नाही किमानपक्षी तिला जबाबदार ठरवणार नाही अशी एक आशा तिला मनात होती.
एक मोठ्ठा श्वास घेऊन तिने सुजयला केबिनमध्ये बोलवायला म्हणून सुजयचे एक्स्टेंशन फिरवले. तिने खिडकीतून सहज बाहेर पाहिले तर, आता पाऊस पूर्णपणे थांबला होता. लख्ख ऊन पडले होते आणि आभाळ तिच्या मनाप्रमाणेच आता स्वच्छ झाले होते.
लेखिका: श्रेया रत्नपारखी
http://majhimarathi.wordpress.com/
http://majhimarathi.wordpress.com/
यावरच्या 15 प्रतिक्रिया
मस्त जमलीये कथा.
आवडली.
कथा छान आहे. जोडीदाराच्या आक्रमकतेमुळे एखाद्या व्यक्तीची घुसमट होते, हे त्या आक्रमक व्यक्तिमत्त्वाच्या जोडीदारालाही कळायला हवं.
छान कथा आहे, मेधाच्या मनातले भाव मस्त...
श्रेयाताय, मानला काय भाव व्यक्त केलेस तू....
सुपर्ब
छान यु टर्न घेतला की हो. कोण्या हवादाराने पकडल, का सरळ निघून गेली हे मात्र अधांतरी ठेवलेत.
छान ओघवती कथा. नेहमी मुलांनीच का अटी घालाव्यात......आक्रमक असावे? मुलींना पण कधी अटी घालू देत आणि आक्रमक होवू देत. गरजेचं आहे.
कथा आवडली... :)
छान झाली आहे कथा...पुर्ण चित्र उभ राहिल समोर ...मस्तच...
कथा आवडली आणि काही मनातल्या प्रश्नांची उत्तरेही देऊन गेली..
कॅनव्हास,कांचन,आप,सुझे,रानडेकाका,अल,अधा,दवबिंदू,मुक्त कलंदर.....तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाकरता आभारी आहे. तसा कथा बिथा लिहिणं हा माझा प्रांत नाही, केवळ हा विषय बरेच दिवस डोक्यात घोळत होता म्हणून पहिल्यांदाच हे धारिष्टय केले.
छान कथेचा शेवटहि मस्त जमला आहे.
सुधीर कांदळकर
खूप छान आहे कथा.. मेधाचा स्वभाव, विचार, भावना छान व्यक्त झालेत..
श्रेया मस्त ग.... मनापासुन आवडली कथा....
श्रद्धा
कथा खूप आवडली. सलग, प्रवाही छान झाली आहे.
कथा छान जमली आहे. खूप आवडली.
टिप्पणी पोस्ट करा