प्रगति पुस्तक

8 प्रतिक्रिया
काय रे एऽऽ कुरमुर्‍या?
काय सर?
इकडे ये.


आलो सर?

काय?

*%॑

मारूं नका ना सर! लागतंय!
तो रताळ्या अगोदर कुठे बसत होता?

शेवटून दुसर्‍या बाकावर सर!

आता कुठे बसतो?

माझ्या शेजारी.

कितव्या बाकावर?

तिसर्‍या सर!

मग नंबर वर यायला पाहिजे की खाली जायला पाहिजे?

वर यायला पाहिजे.

कां घेतलंस तुझ्या शेजारीं?

तो माझ्या घरीं येतो सर कधी कधीं. माझे आईबाबा म्हणतात तो किती हुषार आहे बघ. त्याची भाषा बघ, शिष्टाचार, वागणं बघ. अशाच मुलांशीं मैत्री ठेव. म्हणून माझ्या बाजूला बसवलं सर.

*%॑ मग खाली का गेला त्याचा नंबर? काय काय शिकवतोस त्याला?

लागतंय सर! मारू नका ना उगीच! नंबर त्याचा घसरला तर मग मला का मारताय सर?

तुझ्या बाजूला बसून तो बिघडलाय! म्हणून नंबर खाली गेला त्याचा!! मग काय पूजा करू तुझी? का सत्कार करू?


पाचवीपासून तो आपल्या शाळेत आहे, कधी पाचाच्या खाली नंबर गेला नाहीं. तिमाहीला दुसरा होता आणि आता सहामाहीला दहावा? गेल्या वर्षीं आठवीला वार्षिक परीक्षेत त्याला गणितात शहाण्णव होते. तिमाहीला पन्नासापैकी अठ्ठेचाळीस आणि सहामाहीला एकवीस. गणित मीच शिकवतो ना शहाण्या? वर्गांत सगळी उत्तरं बरोबर देतो तो. मग सहामाहीलाच असं कां? लाज वाटते मला. माझ्या वर्गातल्या मुलांचं असं होतं? युद्ध सुरू झाल्यापासून मधली सुटी पण बंद झाली तुमची, शाळा लौकर सुटते आणि अभ्यासाला पण जास्त वेळ मिळतो घरी. परीक्षा पण दोन महिने उशिरा, मग असं का? बघावं तेव्हां त्याच्याबरोबर तूच असतोस. तुझी संगतच वाईट दुसरं काय? त्याला परत पूर्वीच्या जागेवर बसूं देत.


तसं झालं तर तो मरेल सर! घरीं वाट लागली आहे त्याची.
???
त्याच्या बाबांनीं सांगितलं की त्याला एस एस सी नंतर पुढे शिकवणार नाही. मग तो म्हणतो की आता अभ्यासच कशाला करायचा? पुरा बिथरलाय.
त्याच्या घरी जाऊन सांग बाबांना, भेटायला बोलवलंय मी म्हणून.
त्याचे बाबा अयूबखान आहेत सर. त्याच्या आईला निरोप देतो मी.
*%॑ मोठ्या माणसांना नावं ठेवतोस? लाज नाहीं वाटत? हसतोस काय आणि वर? निर्लज्ज. आणि बाबांना बोलाव सांगितलं ना? कां देऊं टपली?
तुमचा मार परवडला सर. मी त्याच्या आईला निरोप देतों बाबांना बोलावलं आहे म्हणून.
छान! सॉरी, तुला उगीचच मारलं.
आतां परीक्षेत लक्षांत ठेवा. पांचदहा मार्क जास्त द्या.
शहाणा आहेस! अजून खाऊ देऊं काय? चल पळ जागेवर. आणि हो, वर्गांत नको. स्टाफ रूम मध्यें भेटा म्हणावं.

हो सर.



- X - X - X -



नमस्कार सर!

नमस्कार! अरे तुम्हीं? काय काम काढलंत?

तुमचा निरोप मिळाला. स्टाफरूममध्यें येऊन भेटा म्हणून.

पण सहावीतला ...

हो. तोहि माझाच मुलगा.
वा! आडनांवावरून वाटलंच होतं मला. नशीबवान आहांत. त्याचा दुसरा नंबर आला गेल्या वर्षीं. मुलं पांग फेडणार तुमचे बरं का! का भेटायला बोलावलं कळलं असेलच. पण बाबा कां नाहीं आले त्याचे?


ते आले नाहींत यांतच काय तें समजा.
अरे हो, धाकट्याच्या ऍडमिशनला गेल्या वर्षीं पण तुम्हींच आलां होतांत. पण याचा नंबर कसा काय घसरला?
???
त्याचा मित्र म्हणाला कीं...
हो. ह्यांनीं सांगितलं की त्याला एस एस सी नंतर पुढे शिकवणार नाही. मग तो म्हणतो की आता अभ्यासच कशाला करायचा? बिथरला आहे.
काय करतात ते?
अधिकारी आहेत सचिवालयात.
मग असा विचित्रपणा?
काय सांगूं?
त्यांना माझ्याकडे पाठवा.
आतां बोलावलं होतं तरी कुठें आले?
मी येतों घरीं तुमच्या, त्यांना भेटायला.
जरूर या.
तोपर्यंत तुम्हीं पण सांगून पाहा.
ठीक आहे.
पण हा अभ्यास करीत नाहीं तर करतो तरी काय दिवसभर?
खेळतो, वाचतो आणि रेडिओ ऐकतो.
काय ऐकतो.
गाणीं, मुलांचे कार्यक्रम, शास्त्रीय संगीत पण.
म्हणजे वाईट असं कांहीं नाहीं?
अजिबात नाहीं.
तुमचे संस्कार आणि पुण्याई, दुसरं काय?
आपण कोणाचं वाईट केलं नाहीं तर कशाला काय वाईट होईल?
पण नंबर घसरला नं याचा!
दुर्दैवाचा फेरा, दुसरं काय.
मी नक्की येतों.



- X - X - X -



रोल नंबर एकतीस.
येस सर.
हं रताळ्या, तुला गणितात ८४ पडले. दहावीला हायर मॅथ्सला नांव टाकतो तुझं. अभ्यास जास्त करायला लागेल.
हो सर.
मुंडकं हलवूं नकोस. बाकीच्या विषयांत मार्क कमी आहेत. नंबर बारावा आला आहे तुझा. कमी हुषार मुलं पण अभ्यास करून पुढें गेलीं तुझ्या. जरा अभ्यास केलास तर स्कॉलरशिप वगैरे मिळेल तुला. पुढची काळजी करूं नकोस. आतां फक्त अभ्यास कर. काय अडचण आली तर नक्की भेट मला.
हो सर.



- X - X - X -



रोल नंबर ४५.
कुरमुर्‍या वेळ का इतका इकडे यायला? सगळ्यांचा रिझल्ट द्यायचाय मला. वा! रताळ्याच्या संगतीत तुझा नंबर मात्र वर आला. शाब्बास! अभ्यास करायला लागला का रे तो?
माझ्या घरी बोलवला त्याला. अडलेली गणितं सोडवायला. म्हणून दोघांचीहि प्रगति आहे.
मग बाकीचे विषय?
शिकवणी आहे.
आणि गणिताला नाहीं शिकवणी?
आहे तरी अडतात गणितं.
चला! तुझ्या निमित्तानें तरी चांगलं झालं.
_____________




लेखक सुधीर कांदळकर.
http://mumbaichediwas.blogspot.com/
तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, इतरांनाही पाठवा!
Digg it StumbleUpon del.icio.us Google Yahoo! reddit

यावरच्या 8 प्रतिक्रिया

अनामित
१७ जून, २०१०, ११:३६:०० AM

kaLalee naahee.
parat vaachun pratikriyaa deto.

१७ जून, २०१०, १:२३:०० PM

रताळ्याचे वडील असे विक्षिप्त का होते, त्याचं स्पष्टीकरण मिळालं नाही.

१७ जून, २०१०, ९:१४:०० PM

ही गोष्ट मालवणी आहे काहो? म्हणजे त्याचे काय आहे मला कळली नाही म्हणून. पण एक जरुर कळले तुम्ही गुगलीवर चांगले नियंत्रण ठेवता.

१७ जून, २०१०, १०:३३:०० PM

रताळ्या कुरमुर्‍याची गोष्ट आवडली... :)

अनामित
१८ जून, २०१०, १:५१:०० AM

आपली शैली आवडली..पण आपल्याला नक्की काय सांगावयाचे आहे हयाचा बोध झाला नाही...काहीतरी अपुर्ण वाटते कथेत..

१८ जून, २०१०, १:१९:०० PM

विक्षिप्त स्वभाव कांचनताई.

कथा साधी सरळ सरधोपट आहे. पुर्वींच्या काळीं शिक्षक मुलांची कशी काळजी घेत तें दाखवले आहेत. सर, कुरमुर्‍या आणि रताळ्या यांचे भावबंध एवढीच ही कथा आहे. आतांच्या युगांत अशा शिक्षकांअभावीं मुलें आत्महत्त्या करतात.

अनामित, कांचनताई, रानडेसाहेब, मदनबाण आणि दवबिंदु, सर्वांना धन्यवाद.

सुधीर कांदळकर

सुधीर कांदळकर

१८ जून, २०१०, ६:१२:०० PM

‘रताळ्या‘, ‘कुरमु-या‘ या सज्जनांची तोंडी शोभतील अश्या शिव्यांची माहिती झाली.
उपयोगात आणेन म्हणते

२२ जून, २०१०, १:१९:०० PM

खरं आहे.
काळजीने शिकवणारे शिक्षक, आणि मुलांची काळजी घेणारे शिक्षक खूप कमी झाले आहेत.