मी मांसाहारी झाले त्याची गोष्ट !

38 प्रतिक्रिया
माझ्या ब-याच नातेवाईकांना असं वाटतं की माझं लग्न झालं आणि सासरी सगळे मांसाहारी असल्याने मीही नाईलाजाने मांसाहारी बनले. पण तसं काही नाहीये हं! मी अगदी स्वइच्छेने, राजीखुशीने मांसाहारी बनले आहे. शाकाहारी असण्याचे कितीतरी फायदे आहेत आणि मला ते १०० टक्के मान्य आहेत. आयुष्याची जवळजवळ तीस बत्तीस वर्षं मी शाकाहारीच होते. पण एक नक्की आता पुन्हा शंभर टक्के शाकाहारी बनणं मला शक्य नाही. म्हणतात ना, काही गोष्टी बदलण्यासाठी फक्त एक क्षण पुरेसा असतो. तसंच काहीसं झालं माझ्याबाबतीत.

आता तुम्ही म्हणाल की यात लिहिण्यासारखं काय आहे? पण शाकाहारासारखा सात्विक मार्ग सोडून मला मांसाहाराकडे वळवण्यासाठी माझ्या घरातून मला अनेक प्रलोभनं दाखवली गेली होती. पण मी कशालाही बळी न पडता माझं शाकाहाराचं व्रत आचरत होते पण एका छोट्याशा.... अगदी क्षुल्लकशा कारणामुळे आत्मज्ञान मिळालं की आपण ज्याला शाकाहार शाकाहार म्हणतो, तोही कसा मांसाहारच आहे. ते ज्ञान मला तुमच्याबरोबर वाटून घेतल्याशिवाय चैन कसं पडेल?

मी शाकाहारी असणं हा डिस्कव्हरी सारखे चॅनल्स बघण्याचा परिणाम की दुष्परिणाम ते माहित नाही पण मांसाहार म्हटलं की आपल्या हातून प्राणीहत्येचं पातक घडू नये म्हणून मी ते टाळतच होते. तसं नाही म्हणायला पूर्वी आई बळजबरीने मटणाचा, चिकनचा एखाद्‍ दुसरा तुकडा पानात वाढत असे. “निदान लोणच्याएवढं तरी मटण खा.” असं आईने मला म्हटल्यावर, “त्यापेक्षा लोणचंच वाढ ना मग”, हे माझं ठरलेलं उत्तर असायचं. घरात मटणाच्या हड्ड्या फुटायच्या, त्यावेळेस मी दही भात खाऊन बाकीच्यांकडे तुच्छ कटाक्ष फेकत असे. वर्तमानपत्रात ’शाकाहारी बना’ सारख्या जाहिराती आल्या की मला उगाचच अंगावर दोन मुठी मांस चढल्यासारखं वाटत असे.

तरीदेखील जे काही मटण, चिकन, मच्छी मी थोडीफार चाखली होती, ती स्वादिष्ट होती हे मी नाकारणार नाही. पण का कोण जाणे, चिकन खाल्लं की यच्चयावत कुक्कुट समुदाय “कॉकॉक” म्हणून शाप देईल की काय अशी मला कायम भिती वाटत असे. हिंदी चित्रपटांत ’जा जा जा, मेरे बचपन…’ सारख्या गाण्यांमधे सुंदर अभिनेत्री जेव्हा गोंडस कोकरू हातात घेऊन कुरवाळत असे, तेव्हा तर ’कसं काय बाबा लोकं इतका गोंडस प्राणी मारून खाऊ शकतात?’ असाही मी विचार करायचे. मच्छी हा प्रकार तर माझ्यासाठी परमेश्वराचा पहिला अवतारच होता. कधीतरी जबरदस्तीने खायला लावलेल्या मच्छीचा, घशात अडकलेला काटा आठवला की मच्छीच्या चेहे-यावरचे भेदरलेले भाव माझ्या चेहे-यावर सहज उमटून जायचे. ही जमात असा खोटा खोटा भेदरलेला चेहेरा दाखवून बहुधा आपलाच काट्याने काटा काढेल अशी भिती मनात दाटून यायची. त्यामुळे मच्छीपासून आजही थोडं फटकून वागत आले आहे. हो! स्वत:च्या मृत्यूनंतरही माणसाचा सूड उगवण्यासाठी काटा नावाचं एक चांगलं हत्यार परमेश्वराने त्यांना उपजतच शरीरात दिलेलं आहे. तिस-या, चिंबो-या असले प्रकार तर माझ्यासाठी लांबून, प्रदर्शनातून पहाण्याची वस्तू होते. आजही मी त्यांना लांबूनच पहाते. माझी मांसाहाराची यादी इथपर्यंत मर्यादीत होती. त्यात भर पडली ती आमच्या बंधुराजांच्या जी.के. अर्थात जनरल नॉलेजने.

“ताई, फिलीपाईन्समधे तर कुत्रा खातात, माहित आहे का?” अशी माहिती त्याने पुरवल्यावर मला आपल्याकडच्या भटक्या कुत्र्यांपासून सुटका करून घेण्याचा एक नवा मार्ग मिळाल्यासारखं वाटलं. अमेरिकेतल्या सगळ्या चोरांना एका जहाजात बसवून जिथे सोडून दिलं, तिथे ऑस्ट्रेलिया निर्माण झाला. तसंच भारतातील सगळ्या भटक्या कुत्र्यांना फिलिपाईन्सला पाठवून देण्यासाठी कुत्रेलिया नावाचं जहाज बनवलं पाहिजे असं मला वाटू लागलं.

आमचे कराटेचे सर दरवर्षी स्पर्धांसाठी मलेशियाला जायचे. मांसाहाराचा त्यांचा अनुभव एकदम समृद्ध होता. “अगं साप सुद्धा छान लागतो. बकरीच्या मटणाच्या हाडात मांस असतं, ते जसं चवीला लागतं ना, थोडंफार तसंच लागतं सापाचं मांस.” असं त्यांनी सहजपणे सांगितल्यावर माझ्या डोळ्यांसमोर नागिन चित्रपटातील दोन-तीन दृश्य तरळून गेली. मी साप मारून खाल्लाय आणि बदला घेण्यासाठी त्याची सापीण (की सर्पीण) माझ्या मागावर गाणं म्हणत वळवळत येतेय असं मला स्वप्नही पडलं होतं.

हे कमी होतं की काय म्हणून खुद्द माझ्या वडीलांनी “सशाचं मांस तर खूपच छान लागतं”, असं सांगितलं. त्यावर “कबुतराचं मांस तर अगदी खोब-यासारखंच लागतं,” असं आमच्या काकांनी सांगितल्यावर आपण नेमके माणसात रहातो की जंगलात असा प्रश्न मला पडला.

इतकं सगळं होऊनही माझं शाकाहाराचं व्रत तुटलंच. त्याचं कारण म्हणजे मुन्नास्वामी उर्फ मंदार. माझा परम परम मित्र. ज्याची प्रत्येक गोष्टीबद्दल स्वत:ची अशी वेगळीच काहीतरी मतं होती (हे मला त्याने मांसाहाराचा अर्थ सांगताना लक्षात राहिलं नाही, तिथेच घोळ झाला सगळा).

“दूध पितेस की नाही तू?” त्याने विचारलं.

“हो.” मी उत्तर दिलं.

“ते गाईच्या रक्तापासून बनतं, म्हणजे प्रत्यक्षात तू गाईचं रक्तच पित असतेस.” मुन्नाने मंदस्मित देत विरूपण केलं.

माझ्या चेहे-यावर मच्छीच्या तोंडावरचे भेदरलेले भाव.

“अंडं...?” त्याने पुन्हा प्रश्न केला.

“नाही... अंडं नाही खात मी.” मी घाईघाईत कबुली दिली.
“मग खात जा. अंडं खाणं म्हणजे मांसाहार नाही.” मुन्नाच्या चेहे-यावर तसंच ज्ञानी लोकांच्या चेहे-यावर असतं तसं स्मित होतं.

“कसं काय?” मी प्रश्न केला.

मुन्ना माझी कीव केल्यागंत हसला.

“अंडी देणं हा कोंबडीचा गुणधर्म आहे. कोंबडीला पिलं होवोत न होवोत, ती अंडी देणारच. जर अंड्यात जीवच नाही, तर तो मांसाहार कसा?”

हे ज्ञान मला नवीन होतं. तरीच कुक्कुटपालन व्यवसाय लोकांना परवडत असावा.

पण ही दोन उदाहरणं देऊन मुन्ना गप्प बसणा-यातला नव्हता. माझ्या मनातून मांसाहाराबद्दल असलेला तिरस्कार त्याला मुळापासून नष्ट करायचा होता.

“भाज्या तरी खातेस ना?” मुन्नाने माझ्याकडे रोखून पहात विचारलं.

मी ओशाळं हसत म्हटलं, “बास का! तेही नाही खाल्लं, तर खायला उरतंच काय?”
खरंतर मुन्नाचा हा प्रश्न चेकमेट सारखा होता. हे मला त्यावेळेस समजलं नाही. पण तो माझं हृदयपरिवर्तन करायचं ठरवूनच आला होता, त्यामुळे हा प्रश्न मिळाला नसता, तर त्याने काय काय उड्या मारून एखादा प्रश्न स्वत: तयार केला असताच.

“भाज्या खातेस ना? त्या सजीव नसतात??” मुन्नाने त्याच्या नेहमीच्या स्टाईलने मान डाव्या खांद्याकडे वळवली आणि तिरक्या नजरेने डोळे बारीक करून त्याने मला प्रश्न विचारला.

मी इयत्ता सातवीमधे सामान्य विज्ञानात काय शिकले होते, ते माझ्या डोळ्यांसमोर दिसायला लागलं.

’झाडं ही सजीव असतात. एखादं देठ वा पान तोडल्यामुळे झाडांनाही वेदना होतातच.’ असं विज्ञानाच्या पुस्तकात वाचल्याचं मला (नेमक्या वेळी) आठवलं.
एखाद मोठं रहस्य उलगडल्यावर जसं वाटतं, तसं मला वाटायला लागलं. ’पटलं, पटलं’ म्हणून मी मुन्नाकडे पाहिलं. तशी तो म्हणाला, “भाज्या तेवढ्या ओरबाडून खायच्या काय गं? आणि शाकाहारी शाकाहारीचा डंका वाजवायचा? किती भाज्यांना आजपर्यंत तुम्ही शाकाहारी लोकांनी मृत्यू दिला असेल.”

त्याने असं म्हटल्यावर मला उगीचच अपराधी असल्यासारखं वाटायला लागलं. काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून मी म्हटलं, “अरे पण तोडताना ऐकायला कुठे येतं भाज्यांचं ओरडणं?”

मुन्नाने यावर उत्तर तयार ठेवलं होतं.

“बघ, म्हणजे तुला पटतं की भाज्या सजीव असूनही आपण त्या खातो...?”

मी मान डोलावली.

“फक्त त्यांचं ओरडणं ऐकू येत नाही, म्हणून तुला खाताना काही वाटत नाही...?”

मी पुन्हा मान डोलावली.

“मग कोंबड्या, बकरे तुझ्यासमोर कापले नाहीत तर त्यांचंही ओरडणं तुला ऐकू येणार नाही. खायला काय हरकत आहे?”

हाच तो प्रश्न! माझ्या उत्तरांमुळे तयार झालेला होता आणि मलाच त्याचंही उत्तर द्यायचं होती. मी काही उत्तर न देता शांत बसून विचार करत होते. मग समोर वेटर दिसला, त्याला ऑर्डर देऊन टाकली, “एक प्लेट चिकन रेशमी कबाब.”

मुन्ना या कानाच्या कडेपासून त्या कानाच्या कडेपर्यंत तोंड रूंदावून हसला.

लेखिका: कांचन कराई
http://www.mogaraafulalaa.com/
तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, इतरांनाही पाठवा!
Digg it StumbleUpon del.icio.us Google Yahoo! reddit

यावरच्या 38 प्रतिक्रिया

१७ जून, २०१०, ८:००:०० म.पू.

'जीवो जीवस्य जीवनम' बरच लवकर समजलं. लेख छानच!

१७ जून, २०१०, ११:१३:०० म.पू.

कांचनताई, सही एकदम. मी पण मध्यंतरी ४ वर्ष मांसाहार सोडला होता स्वेच्छेने, अगदी काहीच वाटायाच नाही कोणी कितीही खायाच माझ्यासमोर किवा आग्रह करायाच मला..

ता.क.- हल्लीच परत खाण सुरू झालाय :)

१७ जून, २०१०, ११:३६:०० म.पू.

मस्त चुरचुरीत शैलीतलें प्रसन्न लिखाण. आशय तसा गंभीरपणें घेतला नाहीं कांरण मी मांसाहारी कुटुंबातला स्वादाच्या आवडीनिवडीमुळें झालेला शाकाहारी प्राणी.

मच्छीच्या चेहर्‍यावरले भेदरलेले भाव आणि भटक्या कुत्र्यांचा प्रश्न या गोष्टी खासच आवडल्या.

माझ्या एका मांसाहारी मित्राला एखादा सुंदर पक्षी दिसला कीं हा कसा लागत असेल हा विचार त्याच्या मनांत ताबडतोब येतो. तो तर बॅंकॉकला मगरीचॆं सूप पिऊन आला आहे.

सुधीर कांदळकर

१७ जून, २०१०, १२:०२:०० म.उ.

@ Prakash Ghatpande,

मोठा प्राणी लहान प्राण्याला खातो इतपत ठिक होतं. माझ्या मित्राने तर शाकाहार सुद्धा कसा प्रत्यक्षात मांसाहार आहे, हे पटवून दिल्यावर मग उगाचच शाकाहारी बनून रहाण्यात मला काही दम वाटला नाही. मांसाहार चविष्ट असतो हे तर मी आधीच कबूल केलंय.

१७ जून, २०१०, १२:०३:०० म.उ.

@ सुहास,

मला तर मांसाहार चविष्ट आहे, हे कळल्यावरही खावासा वाटत नसे. अपराधी वाटायचं. बहुधा माझ्या मित्राला हाच मुद्दा लक्षात आला असावा. म्हणून त्याने माझं हृदयपरिवर्तन केलं.

१७ जून, २०१०, १२:०६:०० म.उ.

@ सुधीर कांदळकर,

माझ्या भाऊदेखील कुठला पक्षी दिसला की तो चवीला कसा लागत असावा याचा अंदाज करत रहातो. मगरीचं सूप मी ऐकून होते पण असा पदार्थ प्रत्यक्षात अस्तित्वात आहे, हे माहित नव्हतं. मी मांसाहारी झालेय खरी पण मगरीचं सूप हा बहुधा भयंकर प्रकार होईल माझ्यासाठी. मटण, चिकन, अंडी इतपत झेप आहे माझी.

१७ जून, २०१०, १:३८:०० म.उ.

खूपच चित्तवेधक वर्णन केले आहेस कांचन. आवडले.

मात्र, ही झाली एक बाजू. मी शाकाहारी का झालो याचे अनेकांनी लिहीलेले आख्यानही वाच म्हणजे बरे वाईट ठरवणे सोयीचे होईल.

१७ जून, २०१०, १:५२:०० म.उ.

मांसाहाराला पर्याय नाही.

आता तुझा लेख वाचून तोंडाला पाणी सुटलय. संध्याकाळी काहीतरी मांसाहारी बेत करायला पाहिजेल आता.

लेख अगदी मस्त जमलाय.

१७ जून, २०१०, ३:३७:०० म.उ.

Mastch jhalay lekh ekdam...!!!
Kitti changala aahe tumacha mitr, tyani tumachya aayushyat ek chavisht parv suru kele navyane...!!!
Maza mitr tar nehmi mala ekach prashn vicharato, "Kaay mag aaj kuthala prani khalla..??" pan mi pakki Non-veggi aahe...mala kahi pharak padat nahi... Non-veg la paryay nahi...tyamule bhavnik houn mi te soduch shaknaar nahi... :)

१७ जून, २०१०, ४:२२:०० म.उ.

च्या मारी ! समदं जग बोंबलून र्‍हायलं शाकाहारी व्हा ! अन्‌ हितं शाकाहारी झालेली मान्सं मांसाहार करत्यात ! राम कृष्ण हरी !

१७ जून, २०१०, ४:५४:०० म.उ.

हाहा... मांसाहारी लोकांचे अनुभव आणि त्याला चित्रपटाची फोडणी.. साप खाल्ल्यावर नागिण चित्रपट आठवला.. हा हा मस्तंच...

१७ जून, २०१०, ७:४५:०० म.उ.

कांचन तुझी लिखाणाची शैली मस्तच आहे, कोणत्याही प्रकारच्या आहारापेक्षा खुसखुशीत आणि खमंग!

१७ जून, २०१०, १०:०३:०० म.उ.

बब्बड ताय आता पर्यंत किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पचवलेस ? ;)

अनामित
१८ जून, २०१०, १:३४:०० म.पू.

कांचन ताय खरच खमंग झाला आहे लेख...मी तर लहानपणापासुनच शुद्ध मांसाहारी,त्यामुळे स्वागत हया मांसाहारी क्लबात ...अग मी सुद्धा मागे एका मित्राला असच मांसाहारपुराण सांगुन त्याला मांसाहारी बनवायच सत्कार्य केल आहे...मी लहानपणी वाचल्याप्रमाणे अन्नसाखळी व्यवस्थीत चालण्यासाठी शाकाहारी आणि मांसाहारी दोघांचीही आवश्यकता असतेच...

१८ जून, २०१०, २:१०:०० म.पू.

मी घासपत्ती शिवाय काहीच चाखले नाही आहे. एकदा एका रेस्टोरंट मधे ‘शाकाहारी पदार्थ दे` असे सांगूनही चिकन दिले होते. मला वाटले टोफु रबरसारखा झालाय. मी पुढे खाल्लेच नाही. वेट्रेसेने माफी मागितली आणि पैसे लावले नाहीत. मला पहाटे काय मध्यरात्री सुध्दा कुकुच्च कु ऐकू येत होते पोटतून.

१९ जून, २०१०, १२:४७:०० म.पू.

>>कुत्रेलिया नावाचं जहाज बनवलं पाहिजे असं मला वाटू लागलं.

हा हा .. कुत्रेलिया..

आणि >>मी साप मारून खाल्लाय आणि बदला घेण्यासाठी त्याची सापीण (की सर्पीण) माझ्या मागावर गाणं म्हणत वळवळत येतेय << पण भन्नाट होतं.

लगे रहो मुन्नाभाय (मंदारभाय) !!! ;)

१९ जून, २०१०, १०:५३:०० म.उ.

मी प्रतिक्रीया लिहीली आणि पोस्ट करताना लक्षात आलं की माझी प्रतिक्रीया म्हणजे दुसरा लेख झाला आहे. म्हणून देवकाकांच्या विरोप पत्त्यावर पाठवत आहे.

लेखन शैली चांगली आहेच पण मांसाहार स्विकारण्याचा युक्तीवाद पोकळ वाटतोय. माझी देवकाकां कडे पाठवलेली प्रतिक्रीया कृपया वाचा.

२० जून, २०१०, ८:००:०० म.पू.

या संदर्भातील प्रतिक्रीयेचे फलित म्हणून माझ्या काही स्मृती जागृत झाल्या. त्यांनीच "माझे शाकाहार पुराण -भाग १, २" हे तयार झाले. त्यातील भाग २ ची लिंक देत आहे. त्यामध्ये आपल्या लेखावरील प्रतिक्रीया आहे.


http://shatapavali.blogspot.com/2010/06/blog-post_5823.html

२० जून, २०१०, ११:२३:०० म.पू.

@ गोळे साहेब,

वयाची ३० वर्षं मी शाकाहारीच होते, त्यामुळे शाकाहार मला पटत होता म्हणूनच मी शाकाहारी होते असं म्हणायला हरकत नाही. मी फक्त या लेखापुरतं बोलते. मी मांसाहार करत नाही त्यासाठी मी जी कारणं दिली ती माझ्या मित्राने ज्या पद्धतीने खोडून काढली, ते मला आवडलं म्हणून मी मांसाहार करते पण याचा अर्थ मी शाकाहार करत नाही किंवा शाकाहाराचं महत्त्व माझ्या लेखी कमी झालं असा होणार नाही. शाकाहारी होण्याची आख्यानं मी जरूर वाचेन. मला स्वत:ला शाकाहाराचे फायदे १०० टक्के मान्य आहेत असं मी आधीच या लेखात स्पष्ट केलं आहे.

२० जून, २०१०, ११:२४:०० म.पू.

@ सचिन,
वाट बघायची नाय. मस्तपैकी चापून यायचं.

२० जून, २०१०, ११:२६:०० म.पू.

@ मैथिली,
प्राणी मारून खायचा हाच विचार मनात घट्ट रूजल्याने मी मांसाहार वर्ज्य केला होता. पण ती संकल्पना चुकीची असल्याचं मला जाणवलं (याचा अर्थ शाकाहार चूक असा होत नाही) म्हणून मी मांसाहारी झाले.

२० जून, २०१०, ११:२८:०० म.पू.

@ श्रेया ताई,
समदं जग बोंबलतं शाकाहारी व्हा कारन त्याचे लई फायदे हायेत. आता आमाला फायद्यासंग तोटेबी पायजेल असतील तर काय झालं? रामकृष्ण हरी, मटणापेक्षा कोंबडी बरी.

२० जून, २०१०, ११:२९:०० म.पू.

@ आनंद,
अरे, यापेक्षा वाईट अवस्था होती माझी. एक काळ असा होता जेव्हा मांसाहार घरात झाला तर मला गोमूत्र शिंपडावंसं वाटत असे.

२० जून, २०१०, ११:३०:०० म.पू.

@ क्रान्ति,
धन्यवाद. तुझ्या कवितांइतकं अलगद आणि सुंदर नाही लिहिता येत याची खंत मात्र मला आहे.

२० जून, २०१०, ११:३१:०० म.पू.

@ अमेय,
सांगितलं ना, माझी झेप मटण, चिकन, मच्छी इतपतच. बकरा नि कोंबडी या प्राण्याव्यतिरिक्त इतर कुठल्या प्राण्याचं मटण माझ्या घशाखाली उतरेल असं वाटत नाही. तसा मला प्रयत्नही करायचा नाही.

२० जून, २०१०, ११:३२:०० म.पू.

@ देवेंद्र,
मला हाच मुद्दा पटला म्हणून तर मी मांसाहारी झाले ना!

२० जून, २०१०, ११:३३:०० म.पू.

@ उर्मी,
शाकाहारी लोकांना असं होऊ शकतं यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण मीही अशा अनुभवातून गेले आहे. तुला शाकाहार आवडत असेल, तर शाकाहारच करत जा कारण त्याचे फायदे निश्चितच जास्त आहेत.

२० जून, २०१०, ११:३४:०० म.पू.

@ हेरंब,
धन्यवाद. पण शाकाहार सोडणं इतकं सोपं नव्हतं आणि त्याचा पगडा मनावर प्रचंड होता, तेव्हा असं काही बाही वाटायचं. हे जे लिहिलंय ते अर्थातच मी माझ्या भावाबरोबर मस्करी म्हणून रचलेले कल्पनांचे इमले आहेत.

२० जून, २०१०, ११:३८:०० म.पू.

@ अपर्णा,
तुझी प्रतिक्रिया मोठी असती तरी इथे वाचायला आवडली असती. मांसाहार स्विकारण्याचा युक्तिवाद हा माझा आहे, मी तो कुणावरही लादत नाही. कोणताही युक्तिवाद ज्या परिस्थितीत केला जातो, त्या परिस्थितीवर त्या युक्तीवादाचा भरीव व पोकळपणा अवलंबून असतो. विषारी वनस्पतींच्या देशात रहाणा-या व्यक्तिला शाकाहाराचा युक्तीवाद पोकळच वाटेल. तसंच मांसाहार चविष्ट असतो, हे मान्य करूनही शाकाहाराचा पुरस्कार करणा-या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी माझ्या मित्राने केलेला युक्तीवाद समर्थनीय ठरला. असो. लेख मनोरंजन व्हावं या हेतूने लिहिला होता. तुझ्या ब्लॉग लिंक वाचेन. धन्यवाद.

२० जून, २०१०, ११:३९:०० म.पू.

@ अपर्णा,
एक मुद्दा राहून गेला - देवकाकांकडे तू दिलेली प्रतिक्रिया मला अजून मिळालेली नाही.

२२ जून, २०१०, २:२२:०० म.उ.

हे हे.. मुन्नाभाईच लॉजिक शॉल्लीटच आहे..
दॄष्टीआड सॄष्टी..
लेख छान.

२४ जून, २०१०, १:१०:०० म.पू.

मिनल,
हा माझा मित्र ब-याच गोष्टींवर स्वत:चं असं एक लॉजिक सांगतो, जे ऐकताना खूप हसायला येतं.

अनामित
२४ जून, २०१०, १०:१९:०० म.उ.

कांचनताई, नमस्कार.

‘मी मांसाहारी झाले त्याची गोष्ट’ हा आपला लेख वाचला. लेख मनोरंजक आहे, सत्यस्थिती मांडणारा आहे.

मानवी जीवनाची सुरुवातच मांसाहाराने झाली. मानवाच्या प्रगतीबरोबर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये परिस्थितीनुरुप बदलही झाले. जुन्या ग्रंथामध्ये ऋषीमुनी, ब्राह्मण हेही मांसाहार लरीत असा उल्लेख आढळतो. कालांतरानी विविध कारणाने मांसाहारी व शाकाहारी असे भेद अस्तित्वात आले. जग जवळ येत आहे, समाज बदलत आहे आणि जागतिक पातळीवरही खाण्याच्या सवयी/पद्धती बदलत आहेत. आपल्या देशात आंतरजातीय/आंतरधर्मीय असे विवाह होत आहेत व त्यामुळे्ही शाकाहारीचे मांसाहारी व मांसा्हारीचे शाकाहारी असे बदल होत आहेत. काहीजण स्वखुषीने आपला आहार बदलत आहेत. थोडक्यात:
अहो सारे बदलते, जग आता पुढे जाते,
नको वाद शाकाहाराचा आणि मांसाहाराचा
ज्याला जे जे आवडते ते ते त्याने खावे
आणि आनंदाने संतोषाने जीवन जगावे.

आपले व्यक्तिमत्व आणि प्रकृती बर्‍याच प्रमाणात आपल्या आहारावर अवलंबून असतात. याचा विचार करून आपला आहार कसा असावा हे डॉक्टराच्या सल्ल्यानेही आपण ठरवू शकतो.


आपली लेखनशैली आवडली.

म.ना. काळे (काका)

२५ जून, २०१०, १२:२२:०० म.पू.

तुमची लिखाणाची शैली नेहमीच आवडते. हा लेख पण मस्त झाला आहे.

२५ जून, २०१०, १२:२२:०० म.पू.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
२९ जून, २०१०, १२:३०:०० म.उ.

धन्यवाद काळेकाका.
माझंही हेच मत आहे. ज्याला जे आवडतं, ते त्याने खावं. परिणाम दुष्परिणाम ज्याचे त्यालाच भोगायचे असतात.

२९ जून, २०१०, १२:३१:०० म.उ.

@ सी. रा. वाळके

प्रशंसोद्गारांसाठी धन्यवाद. आपल्या शुभेच्छा पाठीशी असू द्यात.

३ ऑग, २०१०, ४:५१:०० म.उ.

चिकनपेक्षा मटण फारच टेस्टी. कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. सुक्के मटण आणि भाकरी.

मोक्ष..


शिवाय मासे (पापलेट आणि सुरमई) हा देव अस्तित्वात असल्याचा पुरावा आहे.

सुरमई इज द प्रूफ दॅट गॉड लव्हज अस..