पाऊस - सिनेमातला

15 प्रतिक्रिया
पाऊस म्हटलं की आम्हा शहरी लोकांच्या डोळ्यांपुढे चिखलाने, मातट पाण्याने भरलेल्या खड्ड्यांनी भरलेले रस्ते येतात. पच्च्कन पाणी उडवून जाणारी वाहनं, विजारी, साड्या घोट्यांच्या वर करून उशीर होऊ नये म्हणून घाईगडबडीत चालत जाणारी माणसं, पुढे आपल्या स्वतःला होणारा उशीर आणि मग आजार असलं काय काय येतं. पण हेच एखाद्याच्या डोळ्यांपुढे तुरळकच राहिलेली पण हिरवीगार झाडं, चहूबाजूला जाणवणारा निसर्गाचा तजेला, पावसातल्या पाण्यात थबक-थबक पाणी उडवत जाणारी, आपले रेनकोट, गंबूटांची पर्वा न करता आनंदाने जाणारी लहान मुलं, 'कावळा' झालेल्या छत्र्या, 'ती' भिजू नये, म्हणून आपली एक बाही भिजवत छत्री सांभाळत तरीही 'ति'च्याकडे पाहता पाहता पुढचा रस्ता पाहण्याचा प्रयत्न करणारा 'तो' आणि भिजल्या ओढणीला एका मुठीने गच्च आवळून धरत थंडीने कुडकुडत डोळ्यांच्या कोपर्‍यातून 'त्या'चं छत्री धरणारं रूप डोळ्यांत साठवत खाली पाहत चालणारी 'ती' असलं काही काही येतं. तर एखाद्या गावाकडच्याला सर्वांत प्रथम आठवण होते ती मातीच्या सुगंधाची. ह्या सुगंधाला स्वर्गीय म्हणता येत नाही, कारण तो एकमेव असा सुगंध आहे जो ह्या जगाशी, मातीमार्फत जोडलेला आहे. काहींना पावसाने संसार उद्ध्वस्त व्हायची भीती, तर काहींचा संसार पावसावर अवलंबून. एखाद्याला "घन घन माला, नभी दाटल्या" आठवतं, तर एखाद्याला "नभ मेघांनी आक्रमिले". एखादा "प्यार हुआ, इक़्ररार हुआ है.." गुणगुणायला लागेल, तर एखाद्याच्या डोळ्यांपुढे "टिप टिप बरसा पानी, पानी ने आग लगायी"चं पिक्चरायझेशन येईल.

तर अशी प्रत्येकाची निरनिराळी तर्‍हा. प्रत्येकाची दुसर्‍यापेक्षा अगदी वेगळी आणि म्हणूनच कदाचित अकल्पनीय (अनइमॅजिनेबल). मला कसं वाटतं, हे दुसर्‍याला कसं कळणार. पण हे कळण्याचंसुद्धा एक शक्तिशाली माध्यम आहे. सिनेमा.

सिनेमात आजवर अगणित गोष्टी, संकल्पना हाताळल्या गेल्या. पण माझ्या मते पाऊस ही वैश्विक स्तरावर सर्वाधिक हाताळली गेलेली गोष्ट असावी. अगदी पाश्चात्य देशांपासून अतिपूर्वेकडच्या देशांतल्या सिनेमातही पाऊस निरनिराळ्या रूपाने येत राहिलाय. कधी पाऊस हे कारण, कधी नुसतीच पार्श्वभूमी, कधी मानसिक आंदोलनं दाखवणारा संकेत, कधी नुसताच एखाद्या पात्राचा साथी (सुखातला, दुःखातला, आनंदातला, उदासीतला) तर कधी चक्क अख्खा सिनेमा व्यापून राहणारं एक पात्र. निरनिराळ्या पद्धतीने पावसाचं अस्तित्व बघायला मिळतं सिनेमात. आणि त्यातनंच कित्येकांचे दृष्टिकोन आपल्याला सहज बघायला, अनुभवायला मिळतात; जे एरव्ही सहजासहजी शक्य नसतं.

मी अनुभवलेल्या सिनेमांतला सर्वांत जुना पाऊस म्हणजे 'राशोमान'चा पाऊस. अकिरा कुरोसावा ह्या मातब्बर दिग्दर्शकाची उभ्या जगाला ओळख करून देणारा एक प्रचंड क्लिष्ट पण काही क्षणी तितकाच सोपा वाटणारा आणि एका तरल शेवटावर संपणारा सिनेमा. एका पावसाळी दिवशी, एका निर्जन, पडीक अशा 'राशोमान' नावाच्या घरात घडणारी एक विलक्षण कथा. प्रचंड पाऊस सिनेमाची सुरूवात करून देतो आणि शेवटाला जेव्हा तो थांबतो, तेव्हा काही जीवांच्या मनावरचं मळभ दूर करून. ह्या सिनेमात पाऊस जास्त वेळ दिसत नाही, पण तो सिनेमात केवळ एक मूक साक्षीदार म्हणून राहतो आणि तरीही त्याचा ठसा मात्र उमटतो.

सत्यजित राय ह्यांच्या 'पाथेर पांचाली' मध्ये अपूच्या बहिणीचा बळी घेणारा पाऊसही लक्षात राहतो. राज कपूर, प्रेमनाथचा 'बरसात' टिपिकल हिंदी सिनेमाच्या धाटणीचा असूनही शेवटाकडे सुन्न करून जातो. इथे पाऊस एक कारण बनून राहतो, आणि शेवटी मात्र उदास बरसत राहतो, आपल्या मनावर मळभ आणत. हेच नाव लेवून एकदा बॉबी देओल आणि एकदा अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेले सिनेमेही येऊन गेले, पण त्यात पाऊस हा "समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता"(असा मी असामी) मधल्या हिंदमातेसारखा कोनाड्यात ठेवलेल्या केरसुणीसारखा अंग चोरून उभा राहिलेला दिसतो.

मग एक एक करून डोळ्यासमोर यायला लागतात ती हिंदी सिनेमातली पावसाला साक्ष ठेवून चित्रीत केलेली गाणी. अगदी, "प्यार हुआ इकरार हुआ है" सारख्या एका छत्रीतल्या जोडप्याला अजरामर करणारं गाणं असो, की मुमताजची ग्लॅमर कोशन्ट आणणारी भिजभिजीत गाणी असोत, किंवा "तेरा जाना, दिलके अरमानों का मिट जाना" सारखं गाणं असो. मला वाटतं, राज कपूरनं पावसाला जेव्हढं एक्सप्लॉईट केलं, तेव्हढं कुणीही केलं नसेल. "बरसात" असो, की "श्री ४२०", किंवा "अनाडी", दोन प्रेमिकांना स्वप्नगीतात घेऊन जाणारा पाऊस थोड्या वेळाने नायिकेला एकटेपणाची बोच लावतो, पावसाचा वेगवेगळ्या स्वरूपात वापर करावा तर राज कपूरने.

गाण्यांच्या विषयावरून न भटकता पुढे जाताना, पावसाचा शृंगारिक उपयोग सुरू होतो. सुभाष घई, इंद्रकुमार पासून यश चोप्रा, करण जोहरपर्यंत सगळ्यांनी पावसाला शृंगारिक बेड्यांमध्ये असं जखडून टाकलंय, की यांच्या सिनेमांवर पोसल्या जाणार्‍या हल्लीच्या पिढीला पाऊस म्हणजे तंग साडी घालून पावसात भिजणारी हीरॉईन आणि पांढरे बिना बनियानचे शर्ट घालून भिजत भिजत हीरॉईनच्या वरताण अंगप्रदर्शन करत दोन्ही हात पसरून हीरॉईनला बोलावणारा हिरोच नजरेसमोर येत असावेत अशी रास्त शंका मला यायला लागते. माझ्या ह्या शंकांना खतपाणी लोकांचे हनिमूनच्या वेळी काढलेले फोटो पाहून घातलं जातं (हे मी माझ्या मर्जीने पाहत नाही, 'मी आणि माझ्या शत्रूपक्षा' प्रमाणे मला हे जबरदस्तीनेही दाखवले जातात किंवा ऑर्कुटवर टाकले जातात). ह्या फोटोंमध्ये लोक अगदी तश्याच (यश चोपडी पावसाच्या गाण्यातल्या) पोझेस देत फोटो काढतात(अर्थात पाऊस नसतो कारण एक म्हणजे पावसात कॅमेरा खराब होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे खरंच पावसात जर फोटो काढले तर ते दाखवायची पंचाईत). मग ह्याच मांदियाळीत "टिप टिप बरसा पानी", "छत्री ना खोल बरसात में" असली गाणी पावसाला आयटम गर्ल बनवून सोडतात.

असो, तर एकंदर पावसाला टाईपकास्ट करण्याचं पाप जरी ह्या काही दिग्दर्शकांनी केलेलं असलं तरी त्याला निरनिराळे रोल्स देणार्‍या दिग्दर्शकांचीही कमी नाही.

'लगान'मधला न येऊन अख्ख्या सिनेमाला कारण देणारा आणि शेवटी सेलिब्रेशनला येणारा पाऊस आशुतोष गोवारीकरने मस्त वापरलाय. 'चमेली' मधला पाऊस हिरोच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर उलथापालथ घडवून आणतो, पण ' त्या' एका रात्री मात्र तो फक्त एक साक्षीदार बनून राहतो. 'रेनकोट' मधला पाऊस, हिरो-हीरॉईनच्या आयुष्यातल्या त्या निर्णायक दिवसाच्या प्रत्येक उलथापालथीचा साक्षीदार बनतो आणि शेवटाला रितुपर्नोच्या शैलीत बिनसंगीताच्या एका मधूर गाण्याच्या साथीने संथ बरसत राहून एक हूरहूर लावून जातो. 'नटरंग' मधला मृगाचा पाऊस गुणाला एक तात्पुरता धक्का देतो, पण निर्धारही देतो. 'गाभ्रीचा पाऊस' मधला "गाभ्रीचा" ह्या शिवीचा धनी पाऊस चक्क खलनायकाची भूमिका निभावतो.

आपल्या सिनेमाव्यतिरिक्त मी पाहिलेल्या काही थोड्या जागतिक सिनेमांमध्येसुद्धा पाऊस हा एक महत्वाचा भाग दिसतो. फक्त बर्‍याचश्या जागतिक सिनेमांमध्ये पावसाबरोबरच हिमवर्षावही तेव्हढीच ताकदीची भूमिका निभावतो. सहसा माझ्या थोडक्याच इंग्रजी सिनेमांच्या ओळखीप्रमाणे पाऊस हा रहस्यकथांचा प्राण असतो. बहुतांश रहस्यपटांमध्ये किंवा थरारपटांमध्ये गूढता वाढवण्यासाठी पावसाचा परिणामकारक वापर दिसतो. खून झाल्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी जेव्हा खुनी किंवा आळ येऊ शकणारा/शकणारी घराबाहेर पडतात तेव्हा हमखास पाऊस किंवा वादळ असतंच, अगदी तसंच ते त्यांच्या भ्रष्ट बॉलीवूड कॉप्यांमध्येही प्रतिबिंबित होतं. 'आयडेंटिटी' मध्ये पावसाचा मस्त वापर केला गेलाय, थरार वाढवण्यासाठी. पण हॉलीवूडचा ग्रेटेस्ट म्युझिकल ऑफ ऑल टाईम 'सिंगिंग इन द रेन' मात्र पावसाचा वेगळा छान वापर करतो. मग युरोपाकडे आपली गाडी आली, की तिथेदेखील सहसा पाऊस थरारपटांपलीकडे दिसत नाही, पण हिमवर्षाव मात्र बरीच पात्र निभावतो. नाताळ आणि त्याच्याशी संबंधित कुठल्याही गोष्टीत हिमवर्षाव येतोच. आनंद दाखवायला कित्येक ठिकाणी, पण त्यात बागडणारी मुलं पाहून उदास होणारी एकलकोंडी पात्रही पैशाला पासरी मिळतील. 'मेरी ख्रिसमस'('जॉय नोएल')मध्ये युद्धभूमीवर नाताळच्या दिवशी पडणारं पांढरंशुभ्र हिम वेगळाच अर्थ सांगतं आणि शेवटी ट्रेनने चाललेले जर्मन सोल्जर्स जेव्हा मंद आवाजात हिमाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिकलेली स्कॉटीश ख्रिसमस कॅरोल्स गात जातात, तेव्हा अंगावर काटा उभा राहतो. किएस्लोव्स्कीच्या डेकालॉगमध्ये पहिल्याच गोष्टीत हिमवर्षाव हा निसर्गाचं प्रतिनिधित्व करतो आणि एका वेगळ्याच अपरिहार्यतेकडे बोट दाखवतो. डेकालॉगच्याच तिसर्‍या भागात 'त्या' विचित्र रात्रीमध्ये मूक साक्षीदाराचं काम करतो. पुढे येताना अतिपूर्वेकडच्या सिनेमांमध्ये पाऊस आणि हिमवर्षाव दोन्ही महत्वाच्या भूमिका करतात. 'ओल्डबॉय' मधला सुरूवातीचा पाऊस केवळ निमित्तमात्र वाटतो, पण एक छोटंसं कारण बनून जातो. 'सिम्पथी फॉर लेडी व्हेन्जिअन्स' मधलं शेवटी पडणारं हिम एका नव्या पांढर्‍यास्वच्छ आयुष्याचा संकेत देतं. 'ख्रिसमस इन ऑगस्ट'मधला पाऊस हिरोच्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी एक मूक साक्षीदार बनून येतो, किएस्लोव्स्कीच्या डेकालॉगमधल्या बिन नावाच्या पात्रासारखा!

असा हा सिनेमातला पाऊस, मी अनुभवलेला. ह्याहूनही पलिकडे अथांग सिनेसागरात कित्येकांना कित्येक वेगवेगळ्या प्रकारे पाऊस दिसला असेल. वेगवेगळ्या भिंगातून, वेगवेगळ्या कोनांतून आणि वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून. प्रत्येक नव्या अनुभवानंतर जाणवतं, की अजून अथांग अनुभवायचंय. पण एक मात्र खरं, खर्‍याखुर्‍या सरींनी जितकं शिकवलं नसेल त्याहून जास्त केवळ पावसांच्या चित्रसरींत भिजण्यातनं शिकायला मिळालंय.

लेखक: विद्याधर भिसे
http://thebabaprophet.blogspot.com/
तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, इतरांनाही पाठवा!
Digg it StumbleUpon del.icio.us Google Yahoo! reddit

यावरच्या 15 प्रतिक्रिया

१७ जून, २०१०, १०:३७:०० AM

बाबा,
शिनेमातला पौउस.
अगदी मुसळधार जमलाय लेख.

१७ जून, २०१०, १:०१:०० PM

पाऊस चित्रीत करणं ही देखील एक कला आहे. काही दिग्दर्शक नुसता पाऊस नि ओलेती शरीरं दाखवतात तर काही पावसात भिजलेली मनं दाखवतात हाच तो फरक. पाऊस आठवला की मला आशा ताईंचं झुंजुर मुंजुर हे गाणं आठवतं. फास्ट आणि चंचल असूनही त्या गाण्यात प्रियकराच्या भेटीची व्याकुळता आहे. डोळ्यातला पाऊस अन बरसणारा पाऊस यांचा सुरेख मेळ आहे त्यात.

१७ जून, २०१०, ४:१९:०० PM

पावसाच्या विविध भूमिकांचं यथार्थ वर्णन.

१७ जून, २०१०, ५:०१:०० PM

विभि, नेहमीप्रमाणेच लेख सरस आला आहे.
सिनेमा म्हणजे तुझं होम-पिचंच आहे !
- ओंकार

१७ जून, २०१०, ६:३०:०० PM

विभि एकदम सरस रे...मला पहिला परिच्छेद खूपच आवडला..सगळा कस डोळ्यासमोर आल बघ..
सिनेमा म्हणजे तुझं होम-पिचंच आहे ! +1

१७ जून, २०१०, ७:४८:०० PM

जब्बरदस्त निरिक्षण...

>>
पण एक मात्र खरं, खर्‍याखुर्‍या सरींनी जितकं शिकवलं नसेल त्याहून जास्त केवळ पावसांच्या चित्रसरींत भिजण्यातनं शिकायला मिळालंय.
>>

अनुमोदन x 10000000000000000000000000

१७ जून, २०१०, ८:१८:०० PM

क्या बात है, राव तुम्ही तर ३६० अंशात आम्हाला फिरवीत आणलं बघा. छान छान भोलानाथ च्या बाळबोध पावसातून ये थेट खुनाची साक्ष असणार्‍या पावसातून भिजवून आणलं बघा.

१७ जून, २०१०, ९:२७:०० PM

विद्याधरा अगदी ओघवते लिहले आहेस... :) लेख आवडला.

१७ जून, २०१०, १०:००:०० PM

लेख सुंदर. सिनेमा आणि पाऊस यांचा मेळ सुरेख जमला आहे. पण ’अकल्पनीय’ या शब्दाचा इंग्रजीतून पण नागरी लिपीत अनइमॅजिनेबल असा बालबोध अर्थ समजावून सांगितलेला वाचून गंमत वाटली!

अनामित
१८ जून, २०१०, २:४१:०० AM

विद्याधर..खरच सिनेमा म्हणजे तुझ होम पिच आहे...मस्त गुंफ़ल आहेस पाउस आणि सिनेमाला...

१८ जून, २०१०, २:५८:०० AM

विभि डायरेक्ट पावसाला हिरोच केलं..

१८ जून, २०१०, १२:३८:०० PM

मस्त.

सुधीर कांदळकर

१९ जून, २०१०, १२:३७:०० AM

"और ये लगा सिक्सर !!!" वाली ती जाहिरात आठवते आहे का? अगदी तसा झालाय तुझा लेख. खूप छान. हिंदी, बंगाली, इंग्रजी आंतरराष्ट्रीय सगळे सिनेमे आणि त्यातला पाऊस छान विश्लेषणासकट मांडला आहेस. सुंदर लेख !!

२२ जून, २०१०, २:१९:०० PM

वरती सगळ्यांनी म्हटले आहे तसे.. मस्तच!

२५ जून, २०१०, १२:५७:०० AM

लेख आवडला. छानच लिहीलय.