कसला विषय घेतलाय लिहायला आज- माझं मलाच कळत नाही. कदाचित गोव्याला येण्याचा परीणाम असावा हा. एका मित्राच्या मुलीचे लग्न आहे आज, आणि त्या साठी गोव्याला आलोय. संध्याकाळी फिरायला
चौपाटीवर गेलो होतो, तेंव्हा समुद्र किनार्यावर एक मुलींचा कंपू दिसला. बहुतेक कुठल्यातरी कॉलेजची सहल असावी. काही मुलं पण बरोबर होती. त्या मधला एक मुलगा उगाचच त्या मुलींच्या पुढे पुढे करीत होता. काही खास ’लक्ष्य’ न ठेवता नुसतं पुढे पुढे केल्याने काहीच फायदा होत नसतो हे त्याला समजले नव्हते बहुतेक. मी समोरच रेती वर बसलो होतो, आणि निरिक्षण केलं, तर आता पुढे पुढे म्हणजे - उगाच मोठमोठ्याने काहीतरी बोलत होता, आणि निरर्थक बोलत होता.
गोव्याच्या समुद्रावर दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे सुटी काढून मजा करायला आलेले, आणि दुसरे म्हणजे एकटे काही कामा निमित्त गोव्याला आलेले, आता संध्याकाळी वेळ जात नाही म्हणुन समुद्रावर फिरायला आलेले. दुसर्या प्रकारचे लोक हे ’बघे’ या प्रकारात मोडतात. काही करायचं नसतं, मग एखाद्या शॅक मधे बिअरचे घोट घेत इकडे तिकडे (???) बघत वेळ घालवायचा झालं!! तर मी इथे गोव्याला बघ्याच्या आणि एकांड्या शिलेदारांच्या भूमिकेत होतो, म्हणून प्रकर्षाने जाणवलं इतकंच.
जगामधे खरं तर दोनच जाती आहेत. एक नर आणि दुसरी मादी. नराने मादीच्या भोवती रुंजी घालायची हे सगळ्या पक्षां मधे पण दिसून येते. त्या साठी देवाने पण नर पक्षाला सौंदर्य दिलेलं असतं. चिमणा बघा कसा ऐटदार दिसतो, गळ्याभोवती छान काळी आयाळ असल्याप्रमाणे काळा ठिपका, थोडासाच मोठा असलेला आकार, त्याच प्रमाणे कोंबडा मस्त पैकी डोक्यावर तुर्रा घेउन कोंबड्यांच्या भोवती कुचकुचत गोल गोल फिरणारा, वर आभाळाकडे बघून पिसारा फुलवत लांडोरीला केकारव करीत साद घालणारा... या सगळ्यांकडे बघितलं की देवाने ’नराला’ मादीला आकर्षित करुन घेण्यासाठीच हे सगळं काही दिलंय असं वाटतं. मादीला मात्र काहीच करावे लागत नाही. फक्त नराची निवड करायची असते. फ्लर्टींग इथे पण असतंच! आणि अगदी हेच नियम पुरुष स्त्री ला पण लागू ठरतात.
पुरुष अथवा स्त्री कितीही वयाचे असो, फ्लर्टींग बद्दल कधीच आकस नसतो. ६५-७० वर्षांच्या आजी पण जेंव्हा मॅचिंग ब्लाऊज शिवाय साडी नेसत नाहीत, किंवा बाहेर पडतांना पावडर कुंकू केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत... तसेच आजोबा पण अजूनही ६५ ला आले तरीही ते जिन्स घालतात आणि सोबतच नायकेचे बूट घालून फिरायला जातात हे सगळं कशाचं लक्षण म्हणायचं? प्रत्येक स्त्रीला पुरुषांनी आणि पुरुषाला स्त्री ने एकदा तरी आपल्याकडे वळून पाहिलंच पाहिजे असं वाटत असतं! या मधे लैंगिक भावना असते असे नाही, पण विरुद्ध लिंगी असे जन्मतःच असलेले नैसर्गिक आकर्षण असते. अर्थात ’गे’लेले काही अपवाद वगळून.
पक्षी आणि मानव या मधे मुख्य फरक एकच - तो म्हणजे पक्षी खुलेआम मादीला आकर्षित करायला फ्लर्ट करतात, पण मानव मात्र चुपके चुपके हा प्रयत्न करीत असतात. खूप मजेशीर खेळ आहे हा, प्रत्येकालाच खेळायला आवडतो.. खेल खेल मे हा ऋषीकपूरचा सिनेमा मला खूप आवडायचा . डझनभर तरी वेळा पाहिला असेल. त्या सिनेमामधे दाखवलेले फ्लर्टींग इतकं रोमॅंटीक वाटायचं, की आपणही तसंच कुणाला तरी गाठावं असं वाटायचं. :)
पुरुषांना काही सुंदर पिसारा दिलेला नसतो मोरा प्रमाणे, किंवा सिंहा प्रमाणे आयाळ पण नसते. त्या मुळे स्त्रीयांना आकर्षित करायला खास प्रयत्न करावे लागतात. हेच खरे कारण आहे की फ्लर्ट करणे हे थोडे अवघड होते पुरुषांना. पण ते खरंच इतकं अवघड असतं कां? मला नाही वाटत!! इथे थोडं लिहितोय त्या बद्दल.
फ्लर्ट करता येण्यासाठी सर्वप्रथम एक मुलगी पाहिजे - ती कुठलीही चालेल, तुमच्या कंपूमधली, ओळखीमधली, मैत्रीण, बहिणीची मैत्रीण कोणीही चालेल, आणि तुम्हाला तिच्या बद्दल काही तरी वाटत असायला पाहिजे. एकदा भेट झाली की तुम्हाला कुठल्याही विषयावर बोलता यायला हवं, एखाद्या विषयावर बोलणं सुरु केलं, आणि लक्षात आलं, की तिला त्या विषयात रस नाही, की ताबडतोब विषय बदलता यायलाच हवा. आणि ज्याला हे व्यवस्थित जमतं तो जिंकला. तिने तुम्हाला पाहिलं, तुम्ही तिला पाहिलं, पहिली छाप ही केवळ बोलण्यावरूनच पडते. तुम्ही काय कपडे घातले आहेत, किंवा तुम्ही कसे दिसता या पेक्षा तुमचे वागणे, आणि तुम्ही कसे बोलता हे जास्त महत्वाचे ठरते. फ्लर्टींगची पहिली शिडी म्हणजे गप्पा गोष्टी . तुम्ही ह्यात जितके तरबेज - तितके फ्लर्टींगमध्ये यशस्वी होण्याची शक्यता जास्त.
कुठल्याही विषयावर बोलणं सुरु केलं, आणि एकदा तिच्या आवडीचा विषय आहे हे लक्षात आलं, की मग त्याच विषयावर चिकटून रहाणं, आणि विषयापासून वहावत न जाता आत्मविश्वासाने बोलत रहाणं ( प्रसंगी अति-आत्मविश्वासाने) हे पण महत्वाचे आहे. नाहीतर तुम्ही तुमच्याच नकळत तिच्या आवडीच्या विषयावरुन तुमच्या आवडीच्या विषयाकडे कसे जाता हे लक्षातही येत नाही, आणि ती कंटाळते. . असं होऊ नये याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. इथे थोडी काळजी घ्यायलाच हवी नाहीतर तिला तुमच्या सहवासाचा पण कंटाळा येऊ शकतो, आणि एकदा ’कंटाळवाणा प्राणी’ हा शिक्का बसला की सगळं संपलंच..आयुष्यभर मैत्रीण मिळणार नाही हे नक्की. इथे पुन्हा फ्लर्टींगचाच एक भाग असतो ही तरूणपणी असलेली मैत्री म्हणजे.
सुरुवातीला तिचा क्वॉंटम फिजिक्स मधला रस किंवा एचटीएमएल मधले प्राविण्य तुम्हाला माहिती असेल तरीही सुरुवात ही विनोदी गोष्टींपासून केली तर कधीही चांगले .कितीही गंभीर स्वभावाची स्त्री असली तरीही हा विषय सदाबहार असतो. तिला हसवत ठेवणे, आनंदी ठेवणे हा मुख्य उद्देश आहे. जरी ती क्वॉंटम फिजिक्स मधे पिएचडी /पोस्ट ग्रॅज्युएशन करित असेल तरीही तिचा आवडीचा विषय तो नसतो - बरेचदा ती एक गरज म्हणून अंगिकारलेली असते हे लक्षात घ्या. नुसते विनोदावरची पु्स्तकं वाचून विनोद सांगू नका. एसएमएस वर आलेले विनोद कदाचित तिला पण आलेले असतात त्या मूळे ते शक्यतो टाळा, किवा सांगण्यापुर्वी विचारा, हा एसएमएस आलाय का तूला म्हणून?
प्रत्येकच मुलीला आपण सगळ्या कंपूमधे जास्त आकर्षक आहोत असे वाटत असते. ( ते खरे आहे की नाही हे महत्वाचे नाही) स्वतः जगत सुंदरी असल्याचा त्यांचा अघोषित दावा असतो. अर्थातच तिच्या कडे जास्तीत जास्त लक्ष दिले जावे अशी तिची सुप्त इच्छा असते. आपल्याला एखाद्या राजकन्येसारखी वागणूक मिळावी अशी तिची अपेक्षा असते, आणि जो कोणी हे करेल तो जिंकला-ही गोष्ट कदाचित कोणतीच मुलगी मान्य करणार नाही, पण प्रत्येक पुरुषाने हिच गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी. मुली या तर्कापेक्षा भावनेला जास्त महत्व देतात. त्यांच्यातल्या भावनेला तुम्ही कशी फुंकर घालू शकता हे महत्वाचे . फ्लर्टींग पुरुषाचा जनमसिध्द अधिकार आहे, पुरुषाने फ्लर्ट करावे अशी प्रत्येकच स्त्री ची इच्छा असते.
पुर्वी पण लिहिलंय कधीतरी.. की लठ्ठपणाच्या बाबतीत आणि केसांच्या बाबतीत प्रत्येकच मुलगी अतिशय संवेदनशील असते. तेंव्हा कितीही रोड असली तरीही , तिला आपण लठ्ठंच आहोत असे वाटत असते.थोडे सांभाळून आणि नाजूकपणे हा विषय हाताळा. फ्लर्टींग करतांना, हॉटेल मधे खाताना शक्यतो या विषयावर बोलणॆ टाळले पाहिजे. नाही तर एखादा पिज्जा वगैरे मागवून डायटींगच्या गप्पा मारणॆ म्हणजे.. .. ती दूर गेलीच समजा तूमच्या पासून. तिला जर तुम्ही तुमच्या बोलण्याने खुलवू शकणार नसाल तर तिच्याबरोबर फ्लर्टींग विसराच!!
मादीला नराबद्दल आकर्षण आहे की नाही हे समजणं पक्षांच्या बाबतीत खूप सोपं असतं . मोर पण जेंव्हा लांडोरीसमोर पिसारा पसरवून नाच करतो तेंव्हा तो तिच्याकडे पुर्ण पणे दुर्लक्ष करतो- पण त्याला बरोबर समजतं की ती त्याच्याकडे आकर्षित होतेय ते. पण पुरुषांना हे समजायला कित्येक दिवस जाऊ द्यावे लागतात. कधी तर वर्षानुवर्ष समजत नाही !!
स्त्रियांना एक सहावं इंद्रिय असतं. कुणी त्यांच्या कडे तसे पहायला लागले की त्यांच्या लगेच लक्षात येते. एखाद्या मुलीकडे पाहाताय, आणि तिला ताबडतोब तशी जाणीव होत असते. तिचा तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न सुरु होतो. मग ह्या खेळामधे एखाद्या वेळेस नजरेला नजर मिळाली तर अपराधीपणाची भावना येऊ देता कामा नये. ही सुरुवात समजायची- फ्लर्टींग बद्दल अजून तर बरंच काही लिहिलं जाउ शकतं पण ... कितीही लिहिलं तरीही ते कमीच आहे. फ्लर्टींग ही एक सामाजिक गरज आहे. आता सामाजिक गरज हे लिहिलेलं काही लोकांना पटणार नाही. पण माझ्या ब्लॉग वर एक लेख लिहिलाय खूप दिवसा पुर्वी- ’स्त्री पुरुष इंट्रेस्टींग सर्व्हे’ म्हणून. एका प्रतिथयश वृत्तपत्राने एक सर्वे केला होता. त्याचे जे निष्कर्ष मिळाले, ते खुपच मजेशीर होते. ते पहा मग लक्षात येईल की . खाली देतोय तो एक लहानसा लेख..
आयुष्यभरात पुरुष जवळपास एक वर्ष स्त्रियांकडे पहाण्यात घालवतो. ( कोडॅक लेन्स व्हिजनने केलेल्या सर्व्हे चा रिपोर्ट) !
सामान्यपणे माणुस दिवसभरात ४३ मिनिटे निरनिराळ्या स्त्रियांकडे बघण्यात ( वाया??) घालवतो.
म्हणजेच वर्षातले ११ दिवस..
य़ाचाच अर्थ पुरुषाचे पन्नाशीला पोहोचे पर्यंत जवळपास ११ महिने आणि ११ दिवस स्त्रियांकडे पहाण्यात वाया (???) जातात…
आणि हे सगळं करतो ते १८ ते ५० वर्षाच्या कालावधीत!!!
काय वाटतंय वाचुन?? नको त्या गोष्टीत शक्ती फुकट घालवली म्हणून अपराधीपणा???
अजिबात वाईट वाटुन घ्यायचं कारण नाही!
कारण सामान्यपणे स्त्रिया देखिल दिवसभरात निरनिराळ्या पुरुषांकडे (दररोज कमीत कमी निरनिराळ्या ६ पुरुषांकडे) पहाण्यात २०मिनिटे घालवतात.
म्हणजेच वयाच्या १८ ते ५० वर्षे दरम्यान त्या सहा महिने वाया (!) घालवतात पुरुषांकडे पहाण्यात.
बरेच ( जवळपास १९ टक्के) पुरुष हे स्त्रियांनी त्यांच्याकडे पाहिल्याने सुखावतात ..उरलेल्या ८० टक्क्यांबद्दल काहिच लिहिलेलं नाही पेपर मधे. पण मला तरी वाटते की त्यांना त्याबद्दल वाईटच वाटत असेल. कारण आपण ( हं!!!!!!!!!) जेंव्हा एखाद्या स्त्री कडे पहातो, आणि नेमकं तिने पण जर आपल्याकडे पाहिलं तर आपली नजर आपोआप खाली झुकवलीच जाते नां?? कां – तर आपल्याला अवघडल्यासारखं वाटतं! पण जर- तिने आपल्या कडे पाहिले नाही तर आपण (?????) दर्शनसुखाचा आनंद लुटतोच ना?? म्हणजे याचाच अर्थ असा, की जेंव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला न्याहाळता तेंव्हा तिने तुम्हाला पकडू नये अशीच अपेक्षा असते. आणि अपेक्षा भंग झाला की लाज वाटते.
पण स्त्रियांच्या बाबतीत हे प्रमाण खुपंच वेगळं आहे.. कसं ते पहा इथे.. १६ टक्के स्त्रियांना अवघडल्यासारखं वाटतं. तर २० टक्के स्त्रियांना लाज वाटते , ( हे तर ३६ टक्के झाले.. पण इतर स्त्रियांचं काय हे दिलेलं नाही त्या सर्व्हे मधे :) ) माझ्या मते पुरुषांच्या बाबतीत जे प्रमाण आहे , तेच नेमकं स्त्रियांच्या बाबतीतपण खरं असावं!
४० टक्के स्त्रियांनी म्हंटलं की पुरुषांच्या डोळ्यांकडे आधी लक्ष जातं, तर पुरुषांनी मान्य केलं की आधी देहयष्टीकडे कडे लक्ष जातं. चेहेरा नंतर पाहिला जातो.
टॉप ५ प्लेसेस.. आय व्हिटॅमिन्स :) घेण्यासाठी:-बार, नाइट क्लब, शॉपिंग मॉल, वर्क प्लेस, ट्रान्सपोर्ट…
मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की कोडॅक ला हा सर्व्हे करणं सुचलं तरी कसं?? काही असो.. पण मला तरी हे निष्कर्ष मनोरंजक वाटले. अर्थात, हा सर्व्हे केला गेला ब्रिटन मधे, जर भारतात केला गेला , तर कदाचित निकाल वेगळे पण मिळतील.. कदाचित काय... १०० टक्के निकाल वेगळेच मिळतील..
एक गोष्ट समान आहे पुरुष आणि स्त्रियांच्या बाबतीत, की जर त्यांना समजा एखादा पुरुष -स्त्री कडे ,किंवा स्त्री -पुरुषाकडे पहात असतांना, जर एखाद्या तिर्हाईत व्यक्तीने पाहिल्यास पुरुष किंवा स्त्रिया लाजतात, संकोचतात.
म्हणजे पहायला आवडतं, पण इतर कोणाच्या लक्षात यायला नको.. :) मला आज कळलं की लोकं काळे चश्मे का वापरतात :)
लेखक: महेंद्र कुलकर्णी.
http://kayvatelte.com/
यावरच्या 6 प्रतिक्रिया
Dr.Love च्या भात्यातील अजून एक बाण.
काका, अतियश उपयुक्त माहिती दिलीत.
आमच्या ज्ञानात नवीन भर.
ता.क. आम्हीं याचा फक्त वाचनीय आनंद न घेता तुम्ही दिलेल्या या मौलिक टिप्सचा रोजच्या जीवनात प्रयोग करून पाहू.
स्त्री पुरूषांनी एकमेकांकडे आकर्षित होणं, हे नैसर्गिक आहे. एखादा रूबाबदार पुरूष दिसला किंवा एखादी सुंदर स्त्री दिसली तर त्यांच्याकडे पहाणं चूक आहे, असं ज्यांना वाटत असेल, त्यांना आपला वेळ वाया घालवल्यासारखं निश्चित वाटेल. ज्यांना पुढच्या पाय-या गाठायच्या असतात, ते गाठतातच पण केवळ दुरूनही सौंदर्य अवलोकनाचा आनंद घेणारे लोक आहेत. नुसतं पाहूनही आनंद मिळतो असे चेहरे, व्यक्तिमत्व समोर असताना मान दुसरीकडे वळवून खरंतर काही लोक वयाआधीच म्हातारे होत असतात.
कांचनताईंचें अगदीं खरें. फक्त वय वाढल्यावर नजर फक्त कौतुकाची असते. विश्वामित्री पवित्रा खोटाच असतो. तसा पवित्रा असला कीं समजावें कीं याचे किंवा हिचे खायचे दात वेगळे आहेत.
सुधीर कांदळकर
लेख आवडला... ;)
ब्लॉगजगतातील राजेपदाबरोबरच ब्लॉगर्सचे ’लवगुरु’ पदही छान सांभाळत आहात...भारीच...
दिल का डॉक्टर, लव-गुरु जिओ !!!
खरं तर मदनबाण तुम्हाला म्हटलं पाहिजे.. बुवा, चालेल का? ;)
टिप्पणी पोस्ट करा