कपाटातील पुस्तके लावता लावता मेघदूत हाती आले. सुंदर थंड पावसाळी हवा आणि हिरव्यागार आसमंताने मला पुन्हा भूल घातली आणि कितींदा तरी वाचलेले मेघदूत मी परत वाचू लागले.
कश्चित् कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्त:
कालिदासाने लिहिलेली सुरम्य वर्णने वाचता वाचता मी गुंगून गेले. तो यक्ष किती भाग्यवान,किती हुशार. त्याला कोणत्याही सजीवाची मध्यस्थी नको वाटली म्हणून त्याने मेघालाच दूत बनविले. आपल्या प्रेयसीला भेटण्याला व्याकुळलेला यक्ष मेघाला सांगतो...माझ्यासारखी, तुझ्यावर तुझ्या प्रेयसीचा..वीजेचा विरह सहन करण्याची वेळ न येवो.
मात्र यक्षासारखे मेघदूत कोणालाच परवडणारे नव्हते. मग वेगवेगळे पक्षी, प्राणी दूताचे काम करू लागले. राजे-राण्यांना पत्रांची ने-आण करण्यासाठी कबूतरे उपयोगी पडू लागली. नळ-दमयंतीने हंसाला आपले दूत बनविले. कबूतरांचा उपयोग सैन्यदलातही संदेश वहनासाठी केला जाई. अगदी गंमत म्हणजे अलिकडच्या चित्रपटातही ’कबूतर जा जा’ असे अगदी गाणे गाऊन कबूतरांमार्फत संदेश पाठवलेला आहे. तर ’हम आपके है कौन’ ह्या चित्रपटात हे काम कुत्र्याकडून करून घेतलंय.
’रुणझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा’ असे एका मराठी गीतामध्ये म्हटले आहे. अगदी काळ्या कुरूप कावळ्याने काव काव केली तरी आज कोणीतरी पाहुणा येणार आहेचा संदेश घेऊन तो आला आहे म्हणून एकट्या मनाला सुखावून जातो. ज्ञानेश्वरांनी तर ’पैल तो हे काऊ कोकताहे’ असे कौतुकाने सांगत...त्या कावळ्याला उद्देशून म्हटलंय की... जर तो विठ्ठल येणार आहे, असा संदेश तू घेऊन आला असशील तर तुला दहीभात खाऊ घालीन आणि तुझे पाय सोन्याने मढवीन.
इतिहासकालात घोडेस्वार, सांडणीस्वार(उंटावरून) निरोप खलिते घेऊन जात. एवढेच काय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाकरीनेही गुप्तसंदेश पोचविले आणि क्रांतिकारकांना बळ दिले.
इंग्रजांनी अनेक सुधारणा भारतात आणल्या त्यात पोस्टाची सोय आली. एका आण्यात २-४ पानी पत्रांची देवाण-घेवाण या गावाहून त्या गावात होऊ लागली. खाकी कपड्यातील पोस्टमनची प्रियजन आतुरतेने वाट पाहू लागले. अगदी जलद महत्वाचा निरोप कड कट्ट करीत तारेने पाठविता येऊ लागला. यावरून दोन किस्से आठवले.
’मालगुडी डेज’ आर.के. नारायण ह्यांच्या पुस्तकातील साधे सरळ सात्विक मनोरंजन करणारे असे हे एक पुस्तक. एका ऑफीसमधील एक वॉचमन सुंदर मॉडेल्स बनवायचा. एकदा तो ऑफिसची प्रतिकृती बनवून ऑफिसमध्ये नेतो. सर्वजण त्याचे खूप कौतुक करतात. त्याचं कौशल्य वाखाणतात. साहेब बघतात पण बोलत काहीच नाही. तो खूप घाबरतो. दुसरे दिवशी घरी एक रजिस्टर पत्र येते. त्याला वाटते ह्यात काहीतरी पेन्शन रद्द वगैरे लिहिलेले असणार. ते पाकीट तो फोडतच नाही व कोणाला देतही नाही. विचार करून करून तो भ्रमिष्ट होतो. एकदा रस्त्यात त्याला ऑफिसमधले भेटतात आणि त्याचे अभिनंदन करतात. सांगतात...अरे घाबरतोस काय? फाड ते पाकीट. त्यात तुला बक्षीस आहे...शंभर रुपयांचे. वेळ होईल म्हणून रजिस्टरने पाठवले.
दुसरा किस्सा आहे...एका घरातील मुलीचे लग्न खूप रेंगाळते. जमता जमतच नाही. शेवटी एकदाचे कसेबसे जमते. ज्या दिवशी तिचे लग्न असते त्याच दिवशी एक पत्र येते...ज्यात तिच्या काकांच्या निधनाची बातमी असते. हे पत्र आत्ताच पोचवले तर त्या मुलीचे लग्न रद्द होईल असा विचार करून पोस्टमन मुद्दामून ते पत्र लग्नघरी पोचवत नाही. लग्नानंतर पोस्टमन ते पत्र मुलीच्या वडिलांना देतो आणि पत्र वेळेवर आणून दिले नाही असे सांगून आपली चूक कबूल करतो...आपण वर तकार केलीत तर माझी नोकरीही जाईल हेही मला माहित आहे...पण माझ्या मनाने सांगितले तेच मी केले...
असे हे पोस्टमनचे घराघराशी जुळलेले भावनिक नाते असायचे.
माणूस प्रगतीशील असल्याने दुसर्या देशात गेला. तिथे बोटीने पत्रे पोहोचू लागली...पण वेळ लागायचा.
मग विमानाने पत्रे जलद पोहोचू लागली.
पत्र पाठवूनही परमुलुखात, परदेशात असलेल्यांशी बोलता येत नाही याची खंत सलतच होती. पुढे देशांतर्गत व आंतर्देशीय फोन करता येऊ लागले. जागोजागी पीसीओ एसटीडी, आयएसडी बूथ दिसू लागले. पण बुद्धीमान माणसाला अजूनही चैन पडत नव्हते. फोनवर चेहरा दिसत नव्हता. तो दिसतो कसा? त्याचे घर कसे? साडी,गाडी कशी ह्याची उत्सुकता होती. ती नुसते फोटो पाहून पूर्ण होत नव्हती. आणि मग कॉम्प्युटर अवतरला आणि मानवाच्या त्याही इच्छा पूर्ण झाल्या.
माझ्या विचारांची साखळी सुपरफास्ट धावतच होती. त्या सुपरफास्टला ब्रेक लावला तो भावाने... अगं तो तुझा भाचा बघ, न्यूझीलंडवरून बोलतोय. त्याचे घर बघ, गाडी बघ.
मी ते पाहिले,कौतुक केले. आणखी कुणाकुणाचे इ-मेल वाचले.
पण खरं सांगू? आठवत जाईल तसे आपल्या हस्ताक्षरात पानेच्या पाने इ-मेलने नाही लिहिता येणार. आपल्या माणसाचे हस्ताक्षर...मग ते वेडेवाकडे, अशुद्ध, कसेही असो तरी त्या अक्षरावरून हात फिरवले की तो माणूस भेटल्याचे समाधान मिळतं. मग त्यात खोडलेली अक्षरं, शब्दं, वाक्यं...ह्यात काय बरे लिहिलेले असेल याचा विचार करण्यात वेळ जातो. XX च्या जागी काय गंमत असेल बरं? आणि अक्षरे पुसट झाली असतील तर तिकडच्या व्यक्तिला का रडू आले असेल या विचाराने जीव कसा कासावीस होतो. हे अंतरंगातील भावभावनांचे इंद्रधनुष्य कॉम्प्युटरवरील इ-मेल मध्ये येईल का? ते फक्त एक यांत्रिक संदेश ओळखत असेल.
आता अगदी अलिकडे मी माझ्या मैत्रिणीच्या मुलाला पत्र पाठवले लंडनला, तर मैत्रीण म्हणाली...अगं हल्ली पत्र कोण पाठवतंय? तर तुझ्या पत्राचे अमोलला केवढे अप्रूप! किती वेळ पारायणे झाली असतील त्या पत्राची. त्यानंतर वर्षानंतर मैत्रिणीची सून भेटली होती. ती म्हणाली...मावशी,आम्ही तुमचे ते पत्र अगदी जपून ठेवलंय बरं का!... हे तिचं वाक्य खूप समाधान देऊन गेलं.
फोनमुळे व्यक्तीव्यक्तींचे एकमेकांकडे जाणे कमी झाले. आता इ-मेल मुळे पत्रलेखनही कमी झाले. निरोप मिळाला, ख्यालीखुशाली समजली...बस्स झालं! भावभावनांची देवाण घेवाण आता होणार नाही.
इ-मेल स्टोअरही करता येतील पण पेटीच्या तळाशी असणारी गुलाबी सुगंधी पत्रे परत वाचाविशी वाटली की एकांतात वाचता यायची...तो खजिना आपल्या एकट्याचाच असायचा. त्यासाठी मोठी जागा नको, एसी जागा नको की कसले तंत्रज्ञान अवगत असायला नको.
वाटतं, यापुढे सानेगुरुजींची सुंदर पत्रे, इंदिरेस पंडित नेहरुंची पत्रे...यासारखी व्यक्तिगत पत्रांची सुंदर भांडारे पुढच्या पिढीला मिळतील का?
लेखिका: जयबालाताई परूळेकर
यावरच्या 15 प्रतिक्रिया
खरं आहे ताई. आपल्या जिवलगांच्या हस्ताक्षरामधून (मग ते कसंही असो) मायेचा ओलावा आपल्या मनापर्यंत झिरपत जातो. त्याची जागा हे ईमेल घेऊ शकत नाही. जसजशी संवादाची नवनवीन साधनं उपलब्ध होत गेली तसंतसं स्थळांमधील अंतर कमी होत गेलं पण मनांमधील अंतर वाढत गेलं.
पत्र लपवणा-या पोस्टमनला एका परक्या घराबद्द्ल वाटणारी ओढ ईमेलला कशी वाटेल, ते तर सेन्ड म्हटलं की दुस-या क्षणाला आपल्या इनबॉक्समधे येऊन थडकणार. माणसांच्या भावनांची जागा मशीनची कार्यक्षमता कधीच घेऊ शकणार नाही हेच खरं.
अगदी खर आहे.
म्हणूनच कदाचित आजकाल फायलितील जुनी पत्रे वाचताना डोळ्यात पाणी येत.
आजकाल पोस्टमन काका तर फक्त बिल च द्यायला येतात.
कांचनताई : माणसांच्या भावनांची जागा मशीनची कार्यक्षमता कधीच घेऊ शकणार नाही हेच खरं. +१
खरायं ! मी आणि माझी चुलतबहिण मुंबईतल्या मुंबईत एकमेकींना फुलस्केपची ४ पाने भरून पत्र पाठवायचो ते ही अगदी एकमेकींना पत्र मिळाले की लगेच्च. आता ती परदेशात असते पण दोन ओळीचा ईमेल सुद्धा धाडणं होऊ शकत नाही.
१९७८ ला इराणला भुकंप झाला होता. मी कसा व कुठे आहे हे विचारणारे पत्र माझ्या आईने लिहीले होते ते पत्र आठ महीन्यांनी मला भारतिय दूतावासातून मिळाले होते. आई गावातून बहीणी कडे आली तेव्हा माझ्याशी फोन वर बोलली. वेळेवर ही तांत्रीक सोय असती तर तीला तीच्या जीवंत मुलाच्या मरणाचा शोक आठ महिने भोगावा लागला नसता. शेवटी काय, समस्त मानव समाज ह्या भावनेच्या डोंबार्याच्या खेळात रमलेला दिसतो. असते एखाद्याचे नशीब.
हवेंत नेणार्या अनुभवांइतकाच रानडेसाहेबांचा अनुभव देखील तितकाच बोलका आहे.
असो. पत्रलेखनाची मह्ती मस्त उतरली. उगाच नाहीं शोभा डे नें ‘सिलेक्टिव्ह मेमरी’ लिहिलें.
पण सूर जुळले असतील तर ई-मेलमधल्या बदलत्या शब्दांमधूनहि अंतरंग, मनांतलीं ताजीं स्पंदनें ओळखतां येतात.
माझे डॅंबिस मित्र चॅटमधली भाषा वाचून माझी मनस्थिती अचूक ओळखतात. अर्थात मी देखील त्यांची.
मीं मुंबईत आणि चि. पुण्यांत अशा आमच्या गप्पा मस्त रंगल्या आहेत.
माझा साहेब माझ्या शब्दांमध्यें लिहितां न येणारा मजकूर अचूक ओळखत असे.
मीं डिस्काऊंट देऊं शकेन कीं नाहीं हें देखील कांहीं क्राहक कंपन्यांतले खरेदी अधिकारी ओळखत.
मुख्य म्हणजे ई-मेल वा चॅट मधून खोटें बोललेलेंहि त्वरित ओळखतां येतें.
तेव्हां ई-मेलला, फेसबुक, ट्वीटर इ.ना कमी लेखूं नका. फक्त आपल्याला या माध्यमांची संवय व्हायची आहे, एवढेंच.
सुधीर कांदळकर
मस्त लेख. स्वत:च्या हस्ताक्षरातल्या पत्रांचं अप्रूप आहेच, पण नव्या युगातल्या ई-पत्रांचीही महती कमी नाही.
मेघाला दूत करण्यासारखीच एक रम्य कल्पना नल-दमयंतीच्या कथेत आहे. नलाचे गुणवर्णन हंसाने दमयंतीला ऐकवले व तिचा निरोपहि परत येऊन नलाला ऐकवला कीं ती तुझ्यावर अनुरक्त आहे!
लेख फारच सुंदर लिहला आहे तुम्ही. :)
छान झाला आहे लेख...
’माणसांच्या भावनांची जागा मशीनची कार्यक्षमता कधीच घेऊ शकणार नाही हेच खरं’...अगदि सहमत..२००३ मध्ये ट्रेनिंगसाठी ८ महिने राजस्थानला होतो तेव्हा घरच्यांशी फ़ोनवर बोलण व्हायच तरीही त्यांच्या पत्राची खुप उत्सुकतेने वट पाहायचो मी..आजही जपुन ठेवली आहेत ती सर्व पत्र...कधी ती काढुन वाचायला लागलो कि अगदि भरुन येत...बाकी अब्राहम लिंकन यांच हेड मास्तरांना लिहलेल पत्रही खुप सुंदर आहे ....
http://gathode.blogspot.com/2010/01/blog-post_31.html
सर्व प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद
छान जमलाय लेख । लिखित पत्रांची मज्जाच निराळी ।
खरं आहे.
हस्ताक्षरात लिहलेल्या पत्रातली भेटच वेगळी.
छान लेख
Abhinanadan !!!
टिप्पणी पोस्ट करा