ह्या वर्षा विशेषांकाच्या वाचनाकरता येणार्‍या वाचकांचे स्वागत आहे.

पेंच अभयारण्यात एक दिवस

14 प्रतिक्रिया
००७ च्या मे महिन्यात आम्ही नागपूरला होतो. तेव्हा एक दिवस कुठे तरी सहलीस जावे असा विचार पक्का झाला. मग परस्पर सहमतीने पेंच प्रकल्पाची निवड झाली. ती मे महिन्याची ८ तारीख होती. उन्हाळा कडाडला होता. ४८ अंशावर पारा चढला होता. तरीही अरण्यास भेट देण्याकरता तो काळ योग्यच होता. कारण उन्हाळ्यात अरण्यातील पाणवठे ओसरत जातात. जिथे अजूनही ते बाकी असतात, त्यांच्या अवती भवतीच निरनिराळे प्राणी-पक्षी आढळण्याची शक्यता दाट असते. म्हणूनच उन्हाळ्यात, नैसर्गिक पाणवठे हुडकत अभयारण्यांतून भटकणे आनंददायी ठरू शकते. त्यातून माझा भाऊ वनाधिकारी असल्याने, सहलीसोबत सुसंगत निरुपणाची उत्तम सोय उपलब्ध होती. सकाळी सकाळीच तयार होऊन आम्ही अभयारण्याकडे कूच केले.







सुमारे दोन तासात आम्ही पेंच अरण्याबाहेरच उभारलेल्या महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पर्यटक निवासाजवळ येऊन पोहोचलो. या महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळ, सिल्लारी (पेंच) पर्यटन संकुलाचे उद्‌घाटन दि.१५ डिसेंबर २००५ रोजी माननीय नामदार श्री.विजयसिंह मोहिते पाटील, मंत्री ग्रामविकास व पर्यटन, यांचे हस्ते झालेले होते. तिथल्याच उपाहारगृहात उत्तमपैकी नास्ता करून आमच्या सहलीस सुरूवात झाली.





ज्या झाडाची पाने आपण दसर्‍याला सोने म्हणून वाटतो, त्या आपट्याच्या झाडाला, मोहक, सुंदर, शुभ्र, नाजूक कलाकुसरीची फुले येतात हेही मला इथेच प्रथम पाहायला मिळाले. नंतर पुढे डोंबिवलीतील पाथर्ली नाका ते शिवाजी उद्योगनगर रस्त्याच्या उजव्या कडेवर लागलेल्या झाडावरही तसलीच नितांतसुंदर फुले आढळून आली. आणखी बारकाईने पाहू लागल्यावर, तर डोंबिवलीतील आमच्या टिळकपथावरही आपट्याची झाडे रस्त्याच्या किनार्‍याने लावलेली दिसून आली.


ऊन प्रखर होऊ लागलं होत. सूर्य माथ्यावर येत होता. सारेच प्राणी सावलीच्या शोधात असलेले दिसून येत होते. अचानकच मग हरणे दिसली. डौलदार. तीही सावलीच्याच शोधात होती. तिथेच एका सावलीत, एक हरिणी आपल्या पिल्लास पाजत असलेलीही दिसून आली.





 मग आम्हाला पेंच नदीवरचे धरण दिसले. या धरणाचे सारेच पाणलोटक्षेत्र मध्यप्रदेशात आहे. धरणातून सुटणारे पाणी महाराष्ट्रात येते. त्यामुळे पाणी महाराष्ट्राचे. मात्र, पेंच जलविद्युत प्रकल्पातून निर्माण होणार्‍या विजेची वाटणी मध्यप्रदेशास ८५% तर महाराष्ट्रास १५% अशी केली जाते. धरणाच्या भिंतीवरून पलीकडे मध्यप्रदेशात जाणारा रस्ता बांधवगडच्या वनात घेऊन जातो. मोगलीची कहाणी याच वनात चित्रित करण्यात आलेली होती. इथले वन, भारतातल्या सर्वात जुन्या आणि घनदाट वनांपैकी एक आहे.


आता हे धरण आम्हाला सततच दिसत राहणार होते. कारण याच धरणाभोवती दिवसभर फिरत राहण्याचा आमचा मानस होता. दिवस बुडता बुडता आम्ही पेंच जलविद्युत प्रकल्पासही भेट दिली. धरणाच्या पाठीमागच्या जलाशयाला, तळाशी एक भोक पाडून, धरण असलेल्या डोंगराच्या पोटात एक शक्तीसंयंत्र बसवलेले आहे त्याच्या पाणचक्कीच्या पात्यांवर हे पाणी सोडलेले होते. त्यामुळे पाणचक्की फिरे. ती जनित्रांना फिरवी आणि वीज निर्माण केली जात असे. पुढे मोठाली रोहित्रे लावून ती वीज उच्च दाबावर नेऊन तिचे पारेषण केले जात होते. डोंगराच्या पोटातील त्या शक्तीसंयंत्रापर्यंत पोहोचण्याकरता एक, एक किलोमीटर लांबीचा बोगदा आम्ही पायी चालत चालत पार केला आणि संयंत्रापर्यंत जाऊन पोहोचलो. बोगद्यातून सतत हवा खेळती राहावी म्हणून, आतून मोठमोठ्या वायुक्षेपकां (काँप्रेसर्स) द्वारे बोगद्याबाहेर हवा पाठवली जात होती. त्या क्षेपकांचा आवाज संपूर्ण बोगदाभर आमची सोबत करत होता. दरम्यान भेट देण्याकरता परवानगी आधीच मिळवून ठेवलेली होती. त्यामुळे संयंत्र आत जाऊन व्यवस्थित पाहता आले.


आत्ता मात्र आम्ही एका टेकडीकडे निघालो होतो, जिच्यावरून पेंच नदीचे दूरवर पसरलेले पात्र एकाच दृष्टीक्षेपात दिसू शकणार होते.





एवढ्यात भावाने एका उंच निष्पर्ण झाडाच्या टोकावरले घरटे दाखवले. तो सांगत होता की ते गिधाडाचे घरटे आहे. गिधाडे अशीच खोल घरटी, उंच झाडांच्या टोकांवर बांधलेली आढळतात. त्याने आणखीही एका ठिकाणी बोट दाखवले. तिथे एक हापशी होती. हापशीचे पाणी खाली उतरून एका कृत्रिम डबक्यात साठत होते. तो म्हणाला की हे एक अभयारण्य आहे. इथे नैसर्गिक पाणवठ्यांसोबतच वनखाते कृत्रिम पाणवठेही निर्माण करते. अशाप्रकारचे. मग मी विचारले की, “पण या कृत्रिम पाणवठ्यात पाणी भरायचे तर कुणीतरी हापशी चालवायला नको का?”. त्यावर तो म्हणाला की तशी सोयही वनखाते करतच असते. कुणीतरी दररोज ती हापशी चालवून त्या डबक्यात पाणी भरून ठेवत असतो. तितक्यात आम्हाला काही माकडेही डबक्यात येऊन पाणी पितांना दिसली.



 एव्हाना आम्ही टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो होतो. वाहने तिथेच उभी केली. डोक्याला ओली फडकी गुंडाळली आणि टेकडीच्या माथ्यावर वाट चढू लागलो. टेकडीवरून पेंच नदीच्या पात्राचा विस्तार दूरपर्यंत नजरेस येत होता. वाटेवर एक अगदी निष्पर्ण झालेले उंच झाड दिसले. अशी माहिती समजली की त्या झाडाचे नाव “करू (kulu)” आहे. त्याच्या डिंका (kulu-gum) पासून औषधांच्या कॅपसूल्सची आवरणे तयार केली जातात. पांढर्‍या पांढर्‍या खवल्यांचा त्याचा बुंधा अंधारात चमकतोही. रात्री कधीकधी तर म्हणे तो भुतासारखाच वाटतो.




एव्हाना बरीच पायपीट झालेली होती. पोटात कावळे ओरडू लागले होते. वनखात्याच्या, वनातल्याच एका अतिथी-गृहावर पोटपूजेकरता व्यवस्था केलेली होती. म्हणून आम्ही तिकडेच निघालो. पोहोचे पोहोचे पर्यंत जेवण तयार झालेले होते. भुकेल्या पोटी गरम गरम अन्न रुचकर लागले. उत्तम जेवण झाले. मात्र, विश्रांतीसाठी थांबल्यास वनदर्शनास, वेळ अपुरा पडेल हे लक्षात घेऊन आम्ही लगेचच पुन्हा, उन्हासाठीचा जामानिमा करत बाहेर पडलो.




आता आम्ही निघालो होतो एका विशाल वटवृक्षाकडे, ज्याच्या छत्रछायेत, वनखात्याने पारंब्यांच्या आधारे बांबुंच्या छपर्‍या बांधलेल्या होत्या. पारंब्यांचे झोपाळे तयार केलेले होते. आम्ही तिथे बराच वेळ विहार केला. जवळच्याच वेळुवनातही बांबुच्या पालापाचोळ्यातून एक फेरफटका मारला. उतारावरून खाली गेल्यास पेंच नदीचे पात्र लागत होते. तिथूनच मग आम्ही पेंच जलविद्युतप्रकल्प पाहण्यास गेलो होतो.

त्या वडाच्या झाडाला भेटून मला, एखाद्या थोर व्यक्तीस भेटून यावे तसेच वाटत होते. आपण भेटलेल्या थोर व्यक्तीस जसे विसरू शकत नाही, तसेच आजही मी त्या वडाची आठवण विसरू शकत नाही. वनखात्याने त्या वडाभोवतीच सहलीस योग्य असे कुंजविहार बांधून एकप्रकारे पेंच नदीकिनार्‍यावर एक उत्तम सहलस्थानच निर्माण केले आहे. आम्हाला त्या ठिकाणाचा संस्मरणीय सहवास लाभला.


वनाबाहेर पडलो तेव्हा असे लक्षात आले की प्रत्येकाजवळ काही काही वस्तू जमा झाल्या आहेत. त्यापैकी काहींचा आम्ही एक ग्रूप फोटोच काढला. दोन्ही बाजूची खालची पाने आहेत तेंदूची. म्हणजे तेंदूपत्ता हो. बिड्या वळायला वापरतात ती पाने. मधले पान आहे रबराच्या झाडाचे. डाव्या बाजूच्या पिशवीत आहे “करू”चा डिंक आणि उजवीकडच्या पिशवीत आहे अभ्रक. इकडच्या डोंगरांवर अनेकदा सापडणारे खनिज. सामान्यतः उत्तम उष्णता वाहक असणारे पदार्थ उत्तम विद्युतवाहकही असतात. अभ्रक मात्र निराळेच आहे. ते उत्तम उष्णतावाहक आहे तरीही विजेला मात्र अवरोधच करते. म्हणूनच याचा उपयोग विजेच्या अनेक उपकरणांच्या निर्मितीत केला जातो.


 त्या एका दिवसात आम्ही पेंचला घालवलेल्या काही संस्मरणीय क्षणांचे वर्णन या लेखाद्वारे करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पेंचच्या राष्ट्रीय अभयारण्यातील वनसमृद्धीची वानगीदाखल छायाचित्रेही इथे दिलेली आहेत. तरीही, त्या दिवसात आम्ही मिळवलेल्या अवर्णनीय आनंदाचे आख्यान इथे लिखित मजकुराद्वारे कसे करावे हे मला समजत नाही. एवढेच सांगणे पुरेसे आहे की जर तुम्हीही कधी नागपूरला गेलात तर, एक दिवसात करता येणारी एक सुंदर सहल तुम्ही पेंचला नक्कीच करू शकता. ती संस्मरणीय होईल यात मला मुळीच संशय नाही.






लेखक: नरेंद्र गोळे
http://nvgole.blogspot.com/

साक्षीदार

9 प्रतिक्रिया

निवेदन: कथेतील पात्रं आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत. जर कोणाला कोणत्याही घटनेशी अथवा व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
(ह्या कथेतील छायाचित्र जालावरून साभार
.)

भाग १-

चानक सुरू झालेल्या पावसात मिस्टर वूड्स आडोसा शोधून उभे राहिले. आपली टोपी, पिशवी, कपडे यावर पडलेले पावसाचे थेंब झटकून त्यांनी बाजूलाच हाताशी पाहिले तर त्यांना कॅथी दिसलीच नाही. केवळ श्वेत वर्णाच्या अमेरिकन लोकांसाठी राखीव असलेल्या त्या शेड खाली काळी हॅट, गुडघ्यापर्यंतचा काळा कोट, काळी पॅंट गळ्यावर बो किंवा टाय असलेली अनेक अमेरिकन माणसे उभी होती. त्यांच्यातही कॅथी दिसली नाही. मिस्टर वूड्सच्या तोंडचे पाणीच पळाले.



अमेरिकेतल्या दक्षिणेकडील राज्यात राहणारे मिस्टर वूड्स आपल्या फार्ममधे तयार होत आलेल्या कापसाच्या विक्रीची बोलणी करण्यासाठी तिथल्याच जरा लांबच्या मार्केटमधे पोचले होते. ते घरून निघताना कॅथी- त्यांची लहानगी लेक त्यांच्या सोबत फिरायला यायचा हट्ट करू लागली. जरा लांबचा प्रवास होता आणि किती वेळ लागेल हे माहित नव्हते. शिवाय पावसाची ही शक्यता होती.



“यू विल गेट टायर्ड, स्विट हार्ट” असे म्हणून तिला घरीच सोडून मिस्टर वूड्स निघणार तोच कॅथीने मोठ्यांदा भोकाड पसरले आणि ती आपल्या वडीलांच्या गळ्यातच पडली. ते गोजरे हात मिस्टर वूड्स सोडवून घेऊ शकले नाहीत. त्यांनी तिला कडेवर उचलले. आपल्या पत्नीला म्हणजे मिसेस एलिझाबेथला “बाय” करून ते निघाले. घोडा ओढणा-या गाडीतून तासा - दिड तासाचा प्रवास करून ते मार्केटमधे पोचले होते. बराच वेळ झाला होता पण त्यांच्या मनासारखा सौदा होत नव्हता. त्यातच पावसाची मोठ्यांदा सर आली आणि कॅथी दिसेनाशी झाली होती.



त्या मार्केटमधे गर्दी होती. बरेच गोरे अमेरिकन आपल्या वस्तूंची विक्री किंवा तंबाखू, साखर, कापूस, कॉफी यांसारख्या शेतकी उत्पादनाच्या विक्रीची बोलणी करण्यासाठी जमले होते. काही जण कपडे/भांडी/बूट असे तत्सम विकण्यासाठी आले होते तर काही लाकडी सामान मांडून बसले होते. काही आपली गुरे विकायला आले तर काही आपले गुलाम. आफ्रिका देशात पकडून मजूरी करण्यासाठी अमेरिकेत आणलेले अनेक कृष्ण वर्णाचे काळे गुलाम लोक ही तिथे जमा होते. हाती पायी धडधाकट असलेल्या गुलामांची कान, डोळे यांची व्यवस्थित तपासणी आणि चाचणी झाल्यावर त्यांना खरेदी करून काही गोरे मालक परतून निघतच होते. पण या अचानक सुरू झालेल्या पावसाने गोंधळ उडाला होता. त्या धावपळीत कॅथी हात सोडून कुठे गायब झाली काही कळलेच नाही म्हणून मिस्टर वूड्सच्या तोंडचे पाणी पळाले होते.



ते जिवाच्या आकांताने कॅथीला हाका मारून इकडे तिकडे शोधू लागले.

त्यांचे लक्ष समोर असलेल्या काळ्या गुलामांच्या घोळक्याकडे गेले. लांब कळकट झगा घातलेल्या एका काळ्या बाईने मोठी टोपली उलटी करून कॅथीच्या डोक्यावर धरली होती. त्या टोपली खाली सोनेरी केसांची गोरीपान कॅथी खुशीत हसत होती. डोक्यावर उलट्या दिसणा-या टोपली वरून खाली पडणा-या पावसाच्या पाण्याच्या धारात आपल्या हातातले लाकडी खेळणे भिजवत होती. आणि ती काळी बाई ”प्लिज. टेक केअर ऑफ युवर सेल्फ, मॅडम” म्हणून तिला आवरत संभाळत होती.



मिस्टर वूड्स जरा निश्चिंत झाले. ते कॅथीला हातवारे करून हाका मारू लागले. कॅथीचे लक्षच नव्हते. ती त्याच घोळक्यातील तिच्यापेक्षा तीन चार वर्षाने मोठ्या असलेल्या एका कुरळ्या केसांच्या काळ्या गुलाम मुलाकडे पाहून आपले खेळणे दाखवत काही तरी बोलत होती. मधेच त्यालाही त्या टोपली खाली खेचत होती. तो हलकेच हसून लाजत मानेने “नो, नो” म्हणत होता.



काही वेळातच पाऊस थांबला. मिस्टर वूड्सनी लागलीच त्या गुलाम घोळक्याकडे धाव घेतली आणि कॅथीला आपल्या ताब्यात घेतले. कापसाच्या विक्रीचा सौदा न होऊनही आता त्यांना तात्काळ घरी निघावेसे वाटत होते. ते कॅथीला कडेवर उचलून भराभर निघालेही. पण का कोण जाणे? ते उलट फिरून पुन्हा त्या काळ्या गुलामांच्या घोळक्याकडे फिरले.


त्यांच्या मालकाला हुडकून काढून आपल्या लेकीच्या डोक्यावर टोपलीचे छत्र धरणा-या काळ्या बाईची खरेदीसाठी चौकशी करू लागले. तिचे नाव मिसेस फिल्डर असे कळले. ती प्रेमळ तर होतीच शिवाय विनम्रही दिसत होती. लहानग्या कॅथीला मायेने संभाळायला ती बाई अतिशय योग्य वाटली आणि घरकामात किंवा इतरत्र ही एलिझाबेथला हिचा उपयोग होईल अश्या विचाराने मिस्टर वूड्स यांचा तिला विकत घ्यायचा विचार होत होता. तिच्या मालकाशी बरासा सौदा ही झाला. ते निघणार तेवढ्यात मिसेस फिल्डरनी मिस्टर वूड्स समोर गुडघे टेकले आणि रडत रडत आपल्या मुलालाही तिच्या बरोबर विकत घेण्याची विनंती केली. तोच तो मुलगा... हलके हसणारा... लाजत “नो” म्हणणारा...



कुणाच्या तरी पायाशी लोळण घेऊन आई का रडत होती याचा उलगडा न होऊन तो भांबावलेला दिसत होता. तिचा झगा एका हातच्या मुठीत घट्ट पकडून काळेभोर टपोरे डोळे तिच्यावर रोखून तो जवऴच उभा होता. तो मुलगा हाती पायी तरी सुदृढ दिसत होता. पण ह्या इतक्या लहान पोराचा काय उपयोग आपल्याला? कशाला विकत घ्या ह्याला? ह्या विचाराने ते त्याला तिथेच सोडून केवळ मिसेस फिल्डरसह निघणार होते. पण जरा वळून पाहिले तर कॅथी त्या मुलाच्या जवळ जाऊन त्याला तिच्या हातातले ते लाकडी खेळणे देऊ करत होती. त्या मुलाचे खेळण्याकडे लक्षच नव्हते. तो रडणा-या आईकडे एकटक पहात होता. कॅथी हिरमूसलेली दिसताच मिस्टर वूड्स नी त्या स्वस्त किंमतीच्या तिच्या मुलाची - जोसेफची ही खरेदी करून टाकली. तसे करताना ‘जोसेफ मोठा झाला की पाठवू फार्मवर कामाला.‘ असा विचार ही पक्का झाला.





ते चौघे घोडा ओढणा-या गाडीच्या स्टॉपपाशी आले. तिथे मिसेस फिल्डर, जोसेफ आणि इतर काळ्या गुलामांचे हात दोरखंडाने आवळून त्यांना घोड्याच्या गाडीला बांधण्यात आले. त्यांना तिथून पळून जायची सूतराम शक्यता ठेवली नव्हती. ऊन-पावसातील सर्व प्रवास त्यांना गाडी मागून काटया-कुपट्यातून चालत चालत करायचा होता. छोटी कॅथी आणि तिचे वडील मिस्टर वूड्स घोडा ओढणा-या गाडीत बसले. त्यात अजूनही काही श्वेत वर्णीय प्रवासी होते. तरीही खूप सारी गर्दी नसल्याने बसायला ब-याच जागा शिल्लक होत्या.


कॅथीने जोसेफला तिच्या तिथे बसायला बोलावले.


“ नो डार्लिंग. ही कांट सिट हिअर विथ अस” मिस्टर वूड्स ने सांगितले.


“ बट व्हाय?” ह्या तिच्या प्रश्नावर “ही इज वन ऑफ दोज स्लेव्हज” हे मिळालेले उत्तर तिला कळलेच नाही. ती अधिक विचार न करता खिडकीतून बाहेर मजा बघण्यात गढून गेली.



त्या काळ्या बाईला आणि तिच्या लहान मुलाला गुलाम म्हणून बरोबर घेऊन परतलेल्या मिस्टर वूड्सनी वर्णन केलेली मार्केट मधली ती घटना ऐकून मिसेस एलिझाबेथ यांना ती खरेदी अत्यंत आवडली. त्यांनी त्यांच्या मालकीच्या घोड्यांच्या तबेल्या मागची खोली त्या माय- लेकाला रहायला देऊ केली. तेव्हा पासून हे दिड गुलाम वूड्सच्या घरीदारीच असायचे. मिसेस फिल्डर घरातले सर्व काम पहात असत आणि जोसेफ कॅथीला संभाळायला मदत करत असे. या दोघांची मिसेस एलिझाबेथ यांना खूपच मदत होत होती. आता त्यांना कापसाच्या फार्मकडे, तिथल्या मजूरांकडे लक्ष द्यायला फुरसत मिळत असे. मिसेस फिल्डर आणि त्यांचा मुलगा जोसेफ यांना त्यांची गुलामी मान्य होती. त्यामुळे सक्तिचे प्रयोग करून कामे करून घेण्याचा त्रास नव्हता. विनासायास दिलेली कामे पार पडत होती. ते दिड गुलाम वूड्स कुटूंबियांच्याकडे खुश असण्यापेक्षा सुरक्षित होते. सर्व कामे व्यवस्थित केली तर इथून हाकलले जाणार नाही याची खात्री वाटत असे. दूसरीकडे विकल्या गेलेल्या जोसेफच्या वडीलांचा काही पत्ता नव्हता. या जन्मात त्यांची पुन्हा भेट होईल अशी अंधुकशी आशा ही मिसेस फिल्डर यांना नव्हती. या जगातला एकमेव रक्ताचा/ प्रेमाचा माणूस म्हणजे जोसेफ. लवकरच हाताशी येणारा हा आपला लेक कुठल्याही कारणाने दूसरीकडे विकला जाऊन दूर होऊ नये म्हणून मिसेस फिल्डर ही नेहमी मालक वूड्स यांच्या घरच्या गुलामीचे फायदे त्याला पटवून देत असत. रेल्वे/रस्ता बांधणीसारखे सततचे कष्ट किंवा इतर गो-या अत्याचारी मालकांचा जुलूम, मारहाण वूड्स कुटूंबाकडे नाही याची मिसेस फिल्डर नेहमी जोसेफला जाणिव करून देत असत. त्यासाठी अदबशीर आणि आज्ञाधारक रहायलाच हवे यासाठी त्यांचा कटाक्ष असे. जोसेफही दिलेल्या शिकवणीनुसार त्याला नेमून दिलेले काम नेमाने आणि प्रेमाने करत होता.


लहानपणापासून जोसेफ कॅथीची खूप काळजी घ्यायचा. तिची खोली आवरणे, तिचे कपडे घडी करणे, तिच्याशी खेळणे अशी सोपी कामे करत तो लहानाचा मोठा होत होता.



कॅथी जराशी मोठी झाल्यावरही जोसेफच तिला संगत करीत असे. ख्रिसमसमधल्या बर्फात स्नो मॅन करण्यापासून फॉल सिझनमधे रंगित पानांचा डोंगर करून त्यात लपून बसण्यापर्यंत तिच्या सोबत असायचा. रिमझिम पावसात धूसर आकाशातल्या सात रंगाचा वेध घेण्यापासून ते समरमधे रंगित फुलांच्या ताटव्यात फुलपाखरांबरोबर खेळा-बागडायला जोसेफनेच तिला शिकवले होते. भर दुपारच्या कडक उन्हात सावलीसारखा तर काळ्या मिट्ट अंधारात चंद्राच्या प्रकाशासारखा कॅथी जाईल तिथे तो हजर असायचा.


जोसेफ मोठा झाल्यावर कॅथीला मैत्रीणींकडे जाताना सोबत करणे, तिला घोडेस्वारी शिकवणे याबरोबरच घरातली डागडूजी, फार्मवरची कामे, बागकाम, समानाची ने-आण तो करू लागला होता. जोसेफची विनातक्रार गुलामी मिस्टर वूड्स यांनाही आवडायची. इतर काळ्या तरूण गूलामांनी केलेला प्रतिकार, अरेरावी यांसारखा त्रास जोसेफकडून कधीच झाला नव्हता. तो त्यांला दिली गेलेली कामे निमूटपणे करत असे. शिकारीला जाताना जोसेफला ते अवश्य आपल्या बरोबर नेत असत. त्यांच्या मोठ्या बंदूका न्यायची आणि मारलेले जनावर उचलू्न आणायची हमाली जोसेफच करत असे. जवळपासच्या कामाच्या ठिकाणी मिस्टर वूड्स यांना जोसेफच गाडी ओढून घेऊन जात/ येत असे. मालकाची मर्जी राखणारा जोसेफ मिसेस फिल्डरना ही काळजी रहित ठेवायचा. आपल्या स्वत:च्या मूलाबरोबर एका ठिकाणी कायमचे राहता यावे यापेक्षा जीवनाकडून त्यांना अजून कुठलीच अपेक्षा नव्हती. मालकाच्या मुलीबरोबर तो मित्र मैत्रिणीसारखा एकत्र खेळी-मेळीत असला तरी जोसेफ आपली गूलामी कधी ही विसरला नव्हता यातच त्याच्या आईला समाधान वाटायचे.


भाग २-


एकेदिवशी वरच्या मजल्यावरच्या आपल्या खोलीतून कॅथी बाहेरच्या बागेकडे सारखी पहात होती. पांढ-या रंगाचे जाळीदार पडदे वा-याने हलले की कॅथीच्या मनात चलबिचल होई. आणि ती पुन्हा पुन्हा खिडकीतून बाहेर डोकावून पाहे. चार पाच दिवस झाले तरी तिला जोसेफ दिसला नव्हता. आज आपल्याला तो नक्की भेटेल असे तिला वाटत होते. जोसेफला आज बागकाम करायला बोलावल्याचे कॅथीला माहित होते. मिसेस फिल्डर ने “ही विल कम एनी टाईम नाऊ” असे मॉमला सांगताना कॅथीच्या कानाने अचूक टिपले होते आणि म्हणूनच ती बागेकडे पुन्हा पुन्हा पहात होती.



जोसेफ आपल्याला का टाळतो आहे याचा उलगडा तिला होत नव्हता. त्या दिवशी जे झाले ते तर दोघांच्या ही संमतीने झाले होते. मग त्यानंतर तो पुन्हा भेटायला का आला नाही याचा जवाब तिला हवा होता. एक-दोन वेळा ती घोड्यांच्या तबेल्याच्या मागे असलेल्या जोसेफच्या घरी सुध्दा जाऊन आली होती. पण जोसेफची भेट झाली नव्हती. तो कधी एकदा भेटतो आहे असे कॅथीला झाले होते. आता तर डोळ्यातून अश्रूधारा वहायच्याच बेतात होत्या. पण जोसेफचा काही पत्ताच नव्हता.


काही दिवसांपूर्वी कॅथीला हॉर्स रायडिंगचा सराव करून घरी घेऊन येताना नेहमीप्रमाणे जोसेफ सोबतीला होता. पण मधेच जोरदार पाऊस सुरू झाला. ते घराच्या रस्त्यावर पोचतच होते तेव्हा घोड्याचा मातीच्या रस्त्यावर एक पाय घसरला आणि त्यावर बेसावध बसलेल्या कॅथीचा तोल जाऊन ती खाली पडली. एक पाय दुमडला गेला आणि भिजलेल्या कपड्यांना, हाता पायाला चिखल लागला. घोड्याचा लगाम धरून खाली चालत असलेल्या जोसेफने कॅथीला उठायला मदत केली. पण तिला पायाला दुखापत होऊन मुरगळल्याचे कळल्यावर त्या पावसात पुन्हा घोड्यावर बसवून तिला तिच्या घरी नेणे त्याला अवघड वाटले. पाऊस थांबेपर्यंत काही वेळ जवळच्याच घोड्यांच्या तबेल्यात थांबण्याचे कॅथीने सुचवले आणि लंगडत्या कॅथीच्या दंडाला धरून हळू हळू दोघे ही तबेल्यात पोचले आणि तिथे घोडा बांधून पाऊस थांबायची वाट पाहू लागले. हातापायाला लागलेला चिखल हातानेच झटकून आपल्या भिजलेल्या लांबसर फ्रॉकच्या बाहीला तोंड पुसताना कॅथीला पाहून जोसेफ तिच्यावरून नजर हटवूच शकला नाही. तिच्या गो-या गुलाबी गालावर पाण्याचे थेंब ओघळत होते. सोनेरी आखूड केस ओले होऊन कानावरून चेह-यावर विसावले होते. तिचे निळे डोळे भिरभिरत मधेच पाणी ओतणा-या आकाशाकडे पहात होते. तेवढ्यात जोसेफच लक्ष तिच्या हाताच्या कोपराकडे गेलं. तिथून रक्त येत होते. ती जखम लगेच स्वच्छ करणे जरूरीचे होते. त्याने कॅथीला तबेल्याच्या कडेकडेने सवकाश चालत मागेच असलेल्या आपल्या खोलीवजा घरी नेले.



घरात साठवलेल्या पाण्याने हात पाय पूसून दिले. तिची जखम हळूवार धुतली तरी सुध्दा “ आहS” करून कॅथी चित्कारली. जोसेफने मायेने तिच्या जखमेवर फुंकर घातली आणि कापडाची चिंधी त्या जखमेवर बांधली. त्याने थोडे पाणी गरम करून आणले. कॅथीला लाकडी खूर्चीवर बसवून जोसेफ खाली जमीनीवर बसला आणि त्या गरम पाण्यात जाडसर कपडा बुडवून तो पिळून पिळून कॅथीच्या मुरगळलेल्या पायाला शेकू लागला. कॅथीला जरा आराम पडू लागला. तिने कृतज्ञतेने जोसेफकडे पाहिले. तिला लहानपणापासून जोसेफचा असलेला सहवास आठवला. त्याने वेळोवेळी कॅथीचे केलेले संरक्षण आठवले. तिला जोसेफ बद्दल आदर वाटला. तिने त्याचा हात हातात घेतला आणि “ थॅक्यू “ म्हणण्यासाठी ओठ विलग केले. जोसेफने पुढे होऊन तिच्या ओठावर हाताचे बोट ठेवले. हळूच हसून कॅथी जोसेफला बिलगली. ओल्या शर्टाआडूनही जोसेफचा सुडौल आणि शक्तिवान बांधा खूप आकर्षक दिसत होता. त्याची तुकतुकीत काळ्या रंगाची कातडी पाण्याने स्वच्छ होऊन चमकत होती. त्याच्या काळ्या भोर दाट कुरळ्या केसात पाण्याचे मोती चमकत होते. कॅथीला त्याच्यापासून विलग राहणे अशक्यप्रय होऊन बसले होते. परंतु जोसेफने “ नो मॅडम. ईट्स रॉंग टू डू दिस विथ अ स्लेव्ह “ म्हणून कॅथीला दूर सारले. कॅथीने अधिक आवेगाने जोसेफला आपल्या बाहूपाशात घेतले. वातावरणात अजब नशा चढवून बाहेरचा जोरदार पाऊस त्यांच्या एकरूपतेला जणू पाठिंबाच देत होता.



पावसाचा आवेग सरल्यावर जोसेफने कॅथीला घरी पोहोचवले होते आणि त्यानंतर एकदाही तो कॅथीला भेटला नव्हता म्हणूनच कॅथी पिसाटल्यासारखी झाली होती. तिने पुन्हा बाहेर पाहिले. जोसेफ बागेत काम करताना दिसला. ती धावत बागेत पोचली तेव्हा जोसेफ काहीही न बोलता तिथून निघून गेला. तीने जोसेफचा पाठलाग केला तेव्हा” सॉरी मॅडम. प्लीज एक्स्क्युज मी. ईट वॉज अ मिस्टेक.” असे म्हणून तो तिथून पळत निघून गेला.



कॅथीने मिसेस फिल्डरला गाठले आणि त्यांना जोसेफ बद्दल विचारू लागली. आपल्या प्रेमाची कबूली द्यायचे कॅथीने जणू ठरवलेच होते. तिचे काही बोलणे एकून न घेता मिसेस फिल्डरनी “सॉरी मॅम. जोसेफ अ‍ॅंड मी बेग युअर मर्सी.” असे म्हणून तिथून काढता पाय घेतला.



त्या दिवशी ओल्याचिंब कॅथीला घरी सोडून पळत सुटलेल्या जोसेफला पाहून मिसेस फिल्डरना काही वेगळीच शंका आली होती आणि घरी गेल्यावर पलंगावरची ती ओली चादर पाहून ती शंका दाट झाली होती. ती शंका नसून सत्य असल्याची जोसेफकडून खात्री केल्यानंतर त्यांना भविष्यात येणा-या धोक्याची सूचना आगाऊ मिळाल्यासारखे वाटले. मिसेस फिल्डरला आता रोजच काहीशी भिती वाटत होती. आणि म्हणूनच त्या माफीची याचना करत होत्या.



मिसेस फिल्डर विचारात मग्न असून खाली मानेने काम करताना मिसेस एलिझाबेथ यांनी पुढल्या आठवड्याच्या शेवटी आयोजित केलेल्या पार्टीबद्दल सांगितले. तरूण कॅथीला आता जीवनातला साथीदार मिळावा या उद्देशाने तिच्या अनुरूप असे मुलगे असलेल्या कुटुंबांना आमंत्रित केले होते. त्या निमित्ताने ओळखी होतील आणि मैत्री होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध तयार होतील हा साधा हिशेब मिसेस एलिझाबेथ यांनी मोकळेपणाने सांगितला. पण मिसेस फिल्डर यांची चिंता अधिक वाढली. कारण पार्टीच्या आधी आणि दरम्यान कामाला जोसेफला ही बोलावले होते.



काही ही करून जोसेफला दूरच ठेवावे असा मिसेस फिल्डर यांनी निश्चय केला.



पार्टीच्या आधी रात्रं-दिवस राबून मिसेस फिल्डर यांनी स्वच्छता वगैरे करून तयारी केली, पण पार्टीच्या दिवशी फार्ममधे काम करणा-या जोसेफला मिस्टर वूड्सनी मदतीसाठी घरी पाठवले. आता त्याला काही ही पर्याय उरला नव्हता.



तो घरी पोहोचताच रागावलेल्या कॅथीला पार्टीसाठी छानसे नटून तयार होण्यासाठी मनवण्याचे काम जोसेफवर सोपवण्यात आले. कॅथीला पार्टीचा हेतू नीटपणे सांगितला गेला होता आणि म्हणूनच तिने असहकार पुकारला होती. तिला जबरदस्ती केल्यास "घरातून पळून जाईन" असाही इशारा तिने दिला होता. वूड्स आईबाप काळजीतच होते. जोसेफ गुलाम असला तरी कॅथीला मनवण्यात तो यशस्वी होईल अशी त्यांना खात्री होती.



जोसफ कॅथीच्या खोलीत जाताच कॅथी हरखून गेली. तिच्या डोळ्यात पाणी आले आणि ती जोसेफला बिलगली. “ टेक मी अवे फ्रॉम हिअर” असे सांगून हमसाहमशी रडू लागली.


“ मॅम, धिस इज नॉट पॉसिबल. आय एम युअर स्लेव्ह. देअर इज नो एस्केप ” जोसेफने समजूतदारपणे सांगितले.
कॅथीने ते मान्य न करता ”आय एम यूअर. ओनली यूअर” असे सांगून आपल्या प्रेमाची कबूली दिली.
जोसेफने कॅथीला ‘अशी अशक्य स्वप्न न पाहता एखाद्या अनुरूप गो-या तरूणाशी जीवनाची गाठ बांधायचा’ उपदेश केला. “आय विल बी ऑलवेज देअर विथ यू" असे पटवून देउन कॅथीला पार्टीसाठी तयार होण्यास समजावले.


मिस्टर वूड्सच्या घराचा बाहेरचा परिसर सजवला गेला होता. बागेत छानशी फुलझाडे लावली होती. छोटी झुडपे बागेतल्या पायवाटेच्या कडेने एका रेषेत शिस्तीत उभी होती. मऊ हिरव्या गवताचा गालिचा बागेभर एकसरखा पहुडला होता. घराचा हॉल आकर्षकरित्या नटवला होता. खिडक्यांनी रंगित पडदे ओढून घेतले होते. छताला टांगलेले मेणाचे दिवे असणारे काचेचे झुंबर संपूर्ण हॉल प्रकाशित करत होते. जमिनीवर रंगित गालिचे अंथरले गेले होते. शोभिवंत वस्तू काचेच्या दारातूनही लक्ष वेधून घेत होत्या. कोरीवकाम केलेल्या लाकडी नक्षीदार टेबलांवर काचेच्या प्लेट्सची चळत, काचेचे ग्लासेस, स्टीलचे चमकते काटे-चमचे वगैरे विशिष्ठ रितीने मांडून ठेवले होते. टेबलाच्या नक्षीला अनुरूप खूर्च्या पाहुण्यांची वाट पाहत होत्या. स्वयंपाकघरात विविध पदार्थ तयार होऊन आपल्यातच मुरत बसले होते. पार्टीची मनाजोगी सर्व तयारी झाली. शेवटी मिसेस फिल्डर आणि जोसेफला काही सूचना दिल्या गेल्या. कॅथी कशी बशी का होईना पण तयार झालेली पाहुन मिस्टर आणि मिसेस वूड्स यांनी हुश्श्य केले होते. ते ही तयार होऊन पाहुण्यांची वाट पाहू लागले.



इतक्यात जोरदार पावसाला सुरवात झाली. सर्वच तयारी वाया जाते आहे की काय असे वाटू लागले. बोलावलेली सर्व मंडळी उशीरा का होईना पण आली. पेय पान, खाद्य पान सुरू झाले. गप्पा- गोष्टी सुरू झाल्या. तरूण मंडळींनी आपला वेगळा कंपू बनवला आणि त्यात चेष्टा मस्करी सुरू झाली. त्यांनी आपापल्यातच गाणी म्हणून नाच सुरू केले. त्या(Deletत) कंपूत मिस्टर वूड्सना कॅथी दिसलीच नाही. ती बराच वेळ आपल्यात नाही हे ही आत्ता त्यांच्या लक्षात आले. तसे त्यांनी मिसेस एलिझाबेथला हळूच सांगितले सुध्दा. मिसेस वूड्सची नजरही पाहुण्यांशी बोलाचाली करताना सर्व दिशेने कॅथीचा मागोवा घेत होती. दोघांनाही कळेना की अचानक कॅथी गेली तरी कुठे? ती ना तिच्या खोलीत होती ना इतरत्र कुठे. बाहेर बागेत वगैरे जायचा प्रश्नच नव्हता कारण पाऊस नुसता कोसळत होता. कॅथीच्या नाराजीचे काही कारणच कळत नव्हते म्हणून तिचे असे दृष्टीआड होणे चिंताकारक वाटू लागले.



अमेरिकन शिष्टाचारानुसार मिस्टर वूड्स यांनी पाहुण्यांची क्षमा मागून काही काळासाठी रजा घेतली आणि ते चेह-यावरची चिंता लपवत कॅथीचा शोध घेऊ लागले. मिसेस फिल्डरनाही कॅथी दिसली नव्हती. त्यांना जोसेफही बरच वेळापासून आसपास न दिसल्याचे लक्षात आले आणि त्यांची चलबिचल वाढली. त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्या सर्व खोल्यातून पुन्हा पुन्हा पाहू लागल्या. मिस्टर वूड्स बाहेर पाहू लागले. रात्र होत होती. पावसाच्या जोराबरोबर हळूहळू काळोख झिरपत होता. मिस्टर वूड्स घराला वळसा घेऊन पुढे येऊ लागले तेव्हा त्यांना बाजूच्या दाराजवळ कॅथी जोसेफच्या बाहूपाशात उभी असलेली दिसली. ते दोघे ही आपल्याच धुंदीत होते. आजूबाजूची त्यांना शुध्द नव्हती. ते पाहून मिस्टर वूड्स संतापले आणि ताड ताड पाय आपटत घरात गेले. भिंतीवर लावलेल्या हरणाच्या शिंगाखालची लटकवलेली मोठी बंदूक काढून घेतली आणि “ यू ब्लॅक स्लेव्ह, यू नीड नॉट लिव्ह ऑन धिस अर्थ” असे जोराजोराने ओरडत पावसाची पर्वा न करता पुन्हा घराबाहेर पडले. घरी आलेले सर्व पाहुणे आणि मिसेस एलिझाबेथ मिस्टर वूड्स चा अवतार पाहून प्रश्नांकित झाले. ते ही भर पावसातून मिस्टर वूड्सच्या मागे मागे धावले. चिंताग्रस्त मिसेस फिल्डरचे काळीज धडधडू लागले. हातातले काम टाकून धडपडत त्या ही तिथे निघाल्या. मिस्टर वूड्स नी कॅथीचा हात धरून तिला जोसेफ पासून दूर केले. त्याच्या वर बंदूक रोखून धरली आणि कुणीही काही बोलायच्या आधी बंदूकीचा चाप दाबला. “ठो” करून एकच गोळी निघाली आणि जोसेफच्या छातीत घुसली. जोरदार धक्का बसून जोसेफ जमिनीवर कोसळला. मिसेस फिल्डर रक्तबंबाळ जोसेफपाशी धावत पोचल्या. पावसाच्या पाण्यातून त्याचे रक्त वाहू लागले होते. तो वाचायची कुठलीच शक्यता त्यांना तिथे दिसत नव्हती. एका काळ्या गुलामाला मरताना पाहून वाचवणारा कोण होता तिथे? सर्वच श्वेत वर्णीय...काळ्या गुलामांचे मालक. नाही म्हणायला कॅथी होती तिथे पण ती काय करू शकणार होती?



ती तर जोसेफच्या निश्चल शरीराशेजारी उभी होती, धो धो पडणा-या पावसाकडे एकटक पहात... तिची आणि जोसेफची पहिली भेट घडवणारा आणि पुढे त्यांना एकजीव करणारा तो पाऊस त्यांच्या प्रेमाच्या अंताचा ही साक्षीदार ठरला होता. त्याचीच ती जणू जबानी घेत होती. कॅथी आणि जोसेफच्या प्रेमकथेचा तो साक्षीदार मात्र अबोल होऊन नुसता कोसळत होता.




लेखिका: मीनल गद्रे
http://myurmee.blogspot.com/

भीती

14 प्रतिक्रिया
मलोय मी, भेदरलोय मी

भीती वाटते मला



भीती वाटते मला

देवबाप्पासारखा शांत बसलो नाही तर

पळवून घेऊन जाणार्‍या बुवाची

अंधारात दडलेल्या भुतांची

शाप देण्यासाठी टपून बसलेल्या

रस्त्यावरील प्रत्येक लिंबाची

पिंपळावरील वेताळाची

किमान दहा लोकांना फॉरवर्ड करा

अशी धमकी देणार्‍या इ-मेल्सची

त्यातल्या देवाची आणि त्याच्या शिक्षेची

स्पेलिंग नाही बदललं तर

अशुभ ठरणार्‍या माझ्याच नावाची

तेरा आकड्याची

माझ्या समोरचा माणूस माझ्याबद्दल

काय विचार करतोय याची

समाजाला काय वाटेल त्याची

प्रश्नचिन्हाची, उत्तरांची

ज्ञानाची

अज्ञानाला कवटाळतो मी

त्यातून निर्माण होणारा देव कसा

सगळ्याची जबाबदारी घेतो

आणि मला तर भीती आहे

साध्यासुध्या जबाबदारीची

जगण्याचीही, मरण्याचीही

आरशातील माझ्याच प्रतिमेची

सत्याची



दमलोय मी, भेदरलोय मी

भीती वाटते मला

ही भीती खाऊन टाकतेय मला



मला उडायचंय

भीतीपासून मुक्त व्हायचंय



मला जगायचंय!


कवि: ओंकार भारद्वाज

चिनम्मा, चिलकम्मा

13 प्रतिक्रिया
दुबई, एक स्वप्न नगरी...अनेकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणारी एक रुपेरी पडद्यासारखी, झगमगाट असणारी नगरी. दुबईला मोठमोठी तारांकित हॉटेल्स आहेत, दुकाने आहेत आणि मोठ्या पगारावर नोकर्‍या करुन घर चालवण्यार्‍या मंडळींची संख्या सुद्धा इथे कमी नाही. इथे तर खरेदी उत्सव भरतो...खरेदी आणि विक्री. अशाच एका खरेदीची ही एक दर्दभरी कहाणी आहे.



रमेश एका सॉफ्टवेअर कंपनीत कामास होता आणि काही वर्ष नोकरी झाल्यावर त्याला त्याच्या कंपनीने १ वर्षासाठी कामानिमित्त दुबईला पाठवायचे ठरवले. त्याला फार आनंद झाला, आपण दुबईला जाणार या विचारानेच तो रोमांचित झाला होता...तिकडच्या लाईफ स्टाईलचे त्याला आता जबरदस्त आकर्षण वाटायला लागलं होतं. शेवटी  फ्लाईट धरुन तो दुबईला पोहचला एकदाचा... मोठ्या मोठ्या टोलेजंग, गगनाला भिडणार्‍या इमारती पाहुन तो रोमांचित झाला होता. ’येस्स... ही लाईफ स्टाईल आपल्याला आयुष्यभर जगता आली पाहिजे’ असा विचार त्याच्या मनात तरळून गेला. त्याचे काम त्याला आवडणार्‍या स्वरुपाचेच असल्यामुळे तो अगदी मन लावून काम करत होता. अधे मधे जेव्हा त्याला वेळ मिळायचा तेव्हा तो तिकडच्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असे...आता त्याला इथे येऊन तब्बल ८ महिने झाले होते, वेळ कसा अगदी कापरासारखा उडून गेला हे त्याला कळलेच नाही, आता फक्त ४ महिनेच उरले होते त्याचे, तिथल्या वास्तव्याचे. तिथे त्याचे बरेचसे मित्र झाले होते. त्यातले बरेचजण तर त्याच्या ऑफिसमधलेच होते, त्याच्या बोलक्या आणि मोकळ्या स्वभावानेच त्याला अनेक मित्र दिले होते.



आता काही दिवसातच तिथे खरेदीचा उत्सव सुरु होणार होता...उत्सव कसला खरेदीचा महाकुंभमेळावाच म्हणायला हवे !!! तिथलेच, तसेच जगभरातील अनेक ठिकाणाहून लोक तिथे जमतात ते फक्त खरेदीसाठी, मौज मजा करण्यासाठी आणि स्वप्नवत आयुष्य जगण्यासाठी. आता काही महिनेच भारतात परतण्यासाठी राहिले असल्यामुळे त्याने सुद्धा जोरदार खरेदी करण्याचे ठरवले. अशाच एका दिवशी तो मित्रांबरोबर बाहेर फिरायला गेला होतो, फिरता फिरता तिथल्याच एका डान्स क्लब मधे त्याला त्याचा मित्र घेऊन गेला. आत शिरताच भारतीय गाण्याचे बोल त्याच्या कानावर पडले...पाहतोय तर हिंदी आयटम सॉंगवर बेधुंद नाचणार्‍या  मद मस्त भारतीय तरुणी आणि त्यांच्या अवती भवती लोकांचा घोळका अगदी भान विसरुन नाचत होता. आपल्या येथील संगीतावर लोक नाचत आहेत हे पाहून तो क्षणभर चकित झाला आणि दुसर्‍या क्षणी आनंदीत सुद्धा.


मित्राबरोबर ड्रिंक्सचे दोन पेग मारल्यावर तो आणि त्याचा मित्र दोघेही त्या नाचगाण्यात स्वतःला पूर्णपणे विसरुन गेले. बराचवेळ नाचून झाल्यावर दोघेही थकले आणि त्यांनी आपापल्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतला. घरी गेल्या गेल्या, तो जो त्याच्या बिछान्यावर आडवा झाला तो दुसर्‍या दिवशी सकाळी १०लाच उठला, पण त्याला सुट्टी असल्याने त्याला आज ऑफिसला पळायची घाई नव्हती. मस्त पैकी अंघोळ करुन, तो तयार झाला होता...आज परत त्याला तसाच आनंद घ्यायची इच्छा झाली आणि त्याने त्याच्या मल्लु मित्राला फोन लावला व त्याच्या मनातला विचार बोलून दाखवला. तो मित्र मोठ्यांने हसला, म्हणाला "अरे एका रात्रीत तुझी ही अवस्था झाली तर तुला जन्नत दाखवली असती तर तु तर वेडाच झाला असता"...
"जन्नत?"  रमेशने फोनवरच त्याला हा प्रश्न केला. त्याच्या मल्लुमित्राला इथे येऊन दीड वर्ष झाले होते तोही याच्या सारखाच भटक्या असल्यामुळे त्याला तिथल्या अनेक गोष्टींबद्धल आणि जागांबद्धल माहिती झाली होती..."ये जन्नत क्या चीज है?"  रमेशने परत त्याला प्रश्न विचारला.
"अरे दोस्त शामको मिलना तुझे मै आज जन्नत की सैर कराता हुं! लेकीन जरा जेब भारी रखनी होगी."
"किती पैसे लागतील?" रमेशने परत प्रश्न विचारला...
त्याच्या मित्राने जो आकडा सांगितला तो ऐकून रमेश क्षणभर हडबडलाच्..."क्या? इतना? नही यार वापिस इंडिया मे भी तो कुछ ले जाना है मुझे."
"अरे यार एक बार देख तो ले, एक बार जन्नत के दर्शन तो कर ले, तेरा मन फिर बार बार उधर जानेको कहेगा, अगर तुझे पंसद नही आया तो तेरा सारा पैसा मे भर दुंगा... बास?"
"क्या ? सच्ची मे?"
"हां यार तु शाम को मिल तो सही."
संध्याकाळची वेळ ठरवून रमेश त्याच्या मित्रा बरोबर जाण्यास सज्ज झाला.
नक्की काय असेल तिथे? हा मला नक्की कुठे घेऊन जाणार असेल? कालच्या सारख्याच एखाद्या डान्स क्लबमधे तर नाही ना ? अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या मनातल्या विचारांमधे गर्दी करण्यास सुरुवात केली आणि तो आतुरतेने संध्याकाळची वाट पहायला लागला. ठरवलेल्या ठिकाणी ते दोघे भेटले, दोघांनी भरपूर गप्पा मारल्या. शेवटी रमेशने न-राहवुन त्याच्या मनातले कुतुहल बोलून दाखवलेच..."यार बता ना, किधर्को जाना है आज? और ये जन्नत-वन्नत क्या है? कोई क्लब का नाम है क्या?"
मित्र हसला म्हणाला... "जन्नत जन्नत होती है यार...उसके जैसा कुछ नही. जरा सबर कर."


त्यानंतर ते दोघे जवळच असलेल्या मॉल मधे फिरण्यास निघाले. दोघे भरपूर फिरले आणि चांगली पोटपुजा देखील केली. आता रात्रीचे ९:३० झाले होते, रमेशला घेऊन एका क्लबमधे त्याचा मित्र पोहचला...कालच्या सारखेच इथेही तसेच संगीत वाजत होते. फक्त इथे नाचणार्‍या भारतीय मुली जरा जास्तच सुंदर होत्या...इतक्या भरलेल्या पोरींना इतक्या जवळून, एव्हढा उत्तान नाच करताना त्यानी आधी पाहिलेच नव्हते..."अरे हा तर इथला छम छम्." मित्राने त्याच्या माहितीत भर घातली.
"चल अभी मेन जगह जाते है" असे म्हणून त्याच्या मित्राने त्याला हाथ धरुन क्लबच्या एका वेगळ्या भागात नेले...दांडगट दरवानाने करड्या नजरेने त्यांना पाहिले आणि त्या मल्लुला ओळखताच दरवाजा उघडून दिला. त्या दोघांचा एका वेगळ्याच दालनात प्रवेश झाला होता...थोडे आत गेल्यावर एका काऊंटरवर त्यांची थोडीफार विचारपुस झाली...कोडवर्ड मल्लु पुटपुटला... "व्हाईट बंगलो."
"ओह्ह, ओके," काउंटरच्या माणसाने लगेच चेहर्‍यावरचे भाव बदलले आणि तिकडच्याच एका खोलीत शिरण्यासाठी बोट दाखवले.


आत शिरताच त्या रुममधे त्या दोघांनी प्रवेश केला, तिथे एक बुटका माणूस एका टेबलापाशी बसून होता. रमेशला आता आपण कोणत्यातरी वेगळ्याच जागी आलो याची जाणीव झाली. ही रुम नसून रुमच्या आत मधेच एक वेगळा क्लब होता, तो म्हणजे देहबाजाराचा क्लब...बाहेरुन जरी आत एखादी साधी रुम असावी असे वाटले तरी हा तर चक्क अनेक पॉश रुमचा लॉजच होता.
त्या मल्लुने त्या बुटक्याला कानात काही तरी सांगितले आणि रमेशकडे बोट दाखवले आणि त्याला हाक मारुन त्याच्या कडचे पैसे मागितले, रमेशने खिशात हात घालून पैशांची गड्डी बाहेर काढली. ते पैसे त्या बुटक्याच्या हातात टेकवले, त्या माणसाने दोन वेगळ्या खोल्यांचे नंबर त्या दोघांच्या हातात टेकवले, आता मात्र रमेशला पूर्णपणे कळून चुकले होते की तो नक्की कुठे आला आहे...पण त्याची तीव्र उत्सुकता त्याला मागे फिरण्यापासून परावृत्त करत होती. हातातला नंबर पाहताना मित्र अचानक कुठेतरी निघून गेला हे रमेशला कळलेच नाही. तो त्या नंबरच्या रुम समोर आला आणि दरवाजा उघडून आत गेला. मंद प्रकाश असलेल्या या रुम मधे भारतीय संगीतच वाजत होते....गाण होते...छम छम करता है ये नशीला बदन...एक अतिशय सुंदर मुलगी पंजाबी ड्रेस घालुन बसली होती तिथल्याच एका बेडवर. ती भारतीयच आहे हे रमेशने लगेच ओळखले. तिने त्याला कोणते ड्रींक घेणार ते विचारले, सर्व सोय आधीच तिथे तयार होती. रमेशच्या तोंडातून एक शब्दही फुटेना !!! गोरीपान आणि इतकी बांधेसुद मुलगी त्याला काही प्रश्न विचारतेय याचे कुठलेच भान त्याला उरले नव्हते आता...ती हसली व हा नवखा आहे हे तिला समजल होते...त्याचा हात धरुन तिने त्याला आपल्या बाजुला बसवून घेतले...व त्याच्या केसांवरुन हात फिरवण्यास सुरुवात केली. रमेशचा गळा आता पार सुकला होता, तिच्या त्या गोर्‍या हातांचा स्पर्श अगदी मोहुन टाकणारा होता...ती म्हणाली "व्होडका?"
"अं, हं, हो," रमेशच्या ओठातून कसेबसे शब्द फुटले एकदाचे...दोन काचेचे पेले घेउन ती परत त्याच्या जवळ येउन बसली. दोघेही आता व्होडकाची चव चाखत होते आणि रमेश तर भारावल्यासारखा तिच्याकडे पाहतच होता.
"तू मॉडेल आहेस का कुठल्या जाहिराती मधली?"
त्याचा हा प्रश्न ऐकताच ती अचानक अस्वस्थ झाली आणि तिचे ते भाव मात्र रमेशने अचूक टिपले होते. जसे काही ऐकलेच नाही असा चेहरा करण्याचा तिने प्रयत्न केला.
"तुझे नाव काय" असा तिनेच प्रश्न विचारला.
"रमेश"....रमेशने आपले नाव सांगितले व बोलला "तेरा?"
" चिकीता" ती म्हणाली.
पण तिच्या नजरेतली अस्वस्थता मात्र रमेशला जाणवतच होती...ती एकदम गप्प झाली...रमेशने पटकन विचारले, "काय झाले?"
ती म्हणाली, "काहीही नाही."
पण तो म्हणाला, "नक्कीच काही तरी झालंय, तू सांग मला."
ती म्हणाली, "माझी गोष्ट ऐकशील?"
तो म्हणाला, "नक्कीच."


चिकीताने आपली कहाणी सांगण्यास सुरुवात केली...ती म्हणाली, "माझं खरं नाव गीता आणि एस्कॉर्ट मधलं चिकीता...मी मुंबईला एक मॉडेल होण्यासाठी आलेली होते... अनेक एजन्सीज मधे नाव नोंदवली, काही ठिकाणी पोर्टफोलियो देखील बनवले, पण कुठूनही संधी मिळत नव्हती...मला खात्री होती की मॉडेल बनण्याचे सर्व गुण माझात नक्कीच आहेत आणि आज ना उद्या मी टॉपची मॉडेल होऊ शकेन. पण नशिबात काही वेगळच लिहलं जाणार होतं ज्याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. अनेक एजन्सी मधे विचारणा करुन देखील संधी काही मिळत नव्हती... हळू हळू मी निराश होत चालले होते, पण अचानक एके दिवशी माझ्या मोबाईलवर तो कॉल आला.
गीताजी बोल रही है क्या?
मी उत्तरले, हा...मै ही गीता बोल रही हुँ ... आप कोन बोल रहे हो? तिकडच्या माणसाने उत्तर दिले जॉन... मै व्हिजन मॉडलींग एजन्सी से बात कर रहा हुँ...आपका एक पोर्टफोलियो हमने देखा और आप सिलेक्ट हो गई हो...क्या आप हमारी एजन्सी जॉइन करना चाहेंगी ? हे ऐकुन मला प्रचंड आनंदाच्या उकळ्या फुटल्या... हां, मैं बिलकुल तयार हुँ. कहां है आपकी एजन्सी?


मुंबईतल्या एका पॉश इलाक्यातल्या एका ९ मजले इमारतीचा तो पत्त्ता होता...त्यांनी मला ऑडीशन साठी तारीख दिली आणि मी त्या दिवशी तिथे अगदी वेळेवर पोहचले देखील... तिथे माझे नाव एका फॉर्म घेउन उभ्या असलेल्या मुलीला सांगितले. तिने तिच्या हातातले कागद पाहिले आणि एका लिस्ट मधे माझे नाव आहे का हे पाहिल्या सारखे केले. मुव्ह टू रुम नंबर ९ असे म्हणाली आणि गप्प झाली... ओके थॅंक्स म्हटले आणि रुम नंबर ९ शोधु लागले. शेवटी ती रुम दिसली... मी दरवाजा नॉक केला, मे आय कम इन ? येस, असा आवाज आतून आला. फोटो शुट साठी त्या खोलीत कॅमेरे लागले होते, सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे लाईट लागलेले होते, आणि तिथेच जवळ एक फोटो ग्राफर उभा होता... हाय आय एम सॅंडी. त्याने त्याची ओळख करुन दिली आणि मी देखील मग माझे नाव सांगितले. ओह्ह्ह येस गीता, राईट... आय हॅव सीन यअर युवर फोलियो... मग त्याने मला विचारले की आज शुट करण्यासाठी मी ओके आहे का ? जर आजचे शुट मधे मी त्यांना योग्य वाटले तर मग पुढे त्यांच्या एजन्सी थ्रू मला मॉडेल म्हणून काम करण्याची संधी मिळेल असे सॅन्डीने मला सांगितले... तो म्हणाला तिथे बाजूला एक ड्रेसिंग रुम आहे तिथे जाऊन योग्य असा ड्रेस घालून ये...


मला तर काय बोलायचे ते समजेनाच... मी शुटसाठी अगदी तयार आहे असं त्यांना सांगितलं आणि माझी पावलं कधी तिथल्या ड्रेसिंग रुमकडे वळाली ते माझं मलाच कळाले नाही !!! मी त्या रुम मधे गेले आणि तिथे असणार्‍या अनेक ड्रेस पैकी मला योग्य बसणारा ड्रेस पाहु लागले...एक गुलाबी रंगाचा ड्रेस मला दिसला, मला तो आवडला आणि तो घातला... जरासा तंग होता पण आता अधिक वेळ जाऊ नये म्हणून मी तोच घालून बाहेर पडले... प्रकाशाच्या झोतात माझे विविध पोझ मधले फोटो खेचण्यात सुरुवात झाली. मी अगदी हसतमुखाने आणि ओसंडत्या आनंदाने विविध पद्धतीच्या अ‍ॅंगल्समधे पोझ देत होती. जवळपास २:३० तास चाललेल्या शुट मधे वेळ कशी संपली ते माझे मलाच समजले नाही... या सर्व शुट मधे मी फक्त दोनदाच ड्रेस चेंज करुन फोटो काढले होते.
एका आठवड्यात फोन करुन कळवू असे सँन्डी मला म्हणाला...मी अगदी फुलपाखरु झाले होते...आनंदाने माझे उर भरुन गेले होते. आता सुरुवात झाली होती फोनची वाट पाहण्याची... कधी मला एकदाचा फोन येतोय...मी सिलेक्ट झाले असेन की नाही? या प्रश्रानी माझा आता ताबा घेतला होता...४ दिवस झाले होते पण अजून काही त्यांचा फोन आला नव्हता. एकदा वाटले आपणच फोन करुन पहावा एजन्सीला...म्हणजे कळेलतरी एकदाचे की काय निर्णय आहे माझ्या त्या फोटो शुटचा...पण मग विचार केला नको !!! उगीच उतावळेपणा दिसायचा. अगदी शेवटच्या दिवशी दुपारी माझा मोबाईल वाजला...व्हिजन एजन्सी मधूनच होता...मी सिलेक्ट झाले होते. मला तर क्षणभर काही सुचेनाच !!! एकदम भानावर आले...ती फोन करणारी मुलगी म्हणाली त्यांचे शुट १० दिवसांनी सुरु होणार आहे.... तर त्याची काही ट्रायल्स घेण्यासाठी मला बोलवले होते...मी तयार आहे म्हणाले. दुसर्‍याच दिवशी माझी काही मापं घेण्यात आली आणि त्यावर होणारे ड्रेस मी आता काही दिवसानी होणार्‍या शुट मधे घालणार होते... माझ्या बरोबर अजून काही मुली त्या ट्रायल शुट मधे मला दिसल्या. जवळपास ६ तास लागले संपूर्ण शुटला. ६ तासाचे मला ८ हजार पेमेंट दिले गेले आणि पुढच्या आठवड्याच्या शुटसाठी २० हजार रुपये शुट केल्याबद्धल मिळणार होते. इतक्या कमी तासात मला इतका पैसा मिळाला याचा मला अविश्वनीय आनंद झाला होता... आता मेन शुट ची वाट बघणे सुरु झाले...शेवट तो दिवस आला जवळपास ५ ते ६ फोटोसेशन्स झाली आणि मी एक मॉडेल म्हणून स्वतःची ओळख बनवण्यात यशस्वी झाले आहे असे मला वाटले. मी अगदी ढगात पोहोचले होते...जणू काही मुक्तपणे पंखाने उडणारी परीच जणू... अशी जवळपास ६ शुट मी केली...प्रचंड पैसा मिळाला होता. आता मला सांगण्यात आले माझे नेक्स्ट शुट दुबईत आहे. माझ्याकडे पासपोर्ट तयार होताच... तीन महिन्यानी माझे तिथले शुट ठरले. डायरेक्ट दुबईला आणि इथे एका हॉटलवर आम्ही पोहोचलो... रुमवर पोहोचताच आमचे पासपोर्ट काढून देण्यास सांगितले... हॉटेलमधे आलेल्या उतारुंची ओळख नोंदवून घेण्यासाठी आवश्यक आहे असे आम्हाला सांगण्यात आले. नाईलाज होऊन आम्ही आमचे पासपोर्ट काढुन दिले, आणि ते कधी आम्हाला परत मिळालेच नाहीत. वेश्या व्यवसायाच्या घाणेरड्या जगात आम्हाला लोटून देण्यात आले. देहविक्रय करणारी एक मॉडेल म्हणून माझा पहिला लचका तोडणार्‍याने मोठी रक्कम मोजली होती...त्यानंतर किती आले आणि गेले याचा आकडा मी विसरले आता !!!  या दुबई फेस्टीवल मधे मी प्रचंड पैसा बनवून देणारी मशीन झाले आहे... पोरींनी इथे विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली आणि वर म्हणाले, त्याहून भयानक म्हणजे तुला इथल्या देहविक्रय करणार्‍यांच्या बाजारात विकले जाईल, कायमचे...देशात परत जायचे असेल तर आता १\५ महिना इथेच रहावे लागेल. मला पर्याय होता?  नाही...इथल्या मुली म्हणाल्या मला... आता तुही एस्कॉर्ट झालीस, आमच्यातलीच एक. या नरकातून बाहेर पडण्याची रक्कम म्हणजे हा दुबई फेस्टीवल... हे झाले की हे लोक मला परत नेतील असं म्हणाले आहेत... आणि अश्या अनेक गिर्‍हाईकांपैकीच तू आजचा माझा गिर्‍हाईक आहेस. मी तुझी आजची खरेदी आहे."

रमेश थिजला त्याच्या कानात ’चिन्नमा, चिलकम्मा’ चे बोल  पडत होते... त्याच्या खिशातले सर्व पैसे तिथेच ठेवून उभा राहिला आणि त्या खोलीच्या बाहेर पडला...या विचारात की त्याला आज नक्की काय जाणवले आहे!!!



लेखक: मदनबाण
http://madanban.blogspot.com/

जन्माचं सार्थक

6 प्रतिक्रिया
युगांची तहानेली, तापलेली धरणी सोसत आलीय जन्माची असोशी

आतुर डोळ्यांत प्राण आणून वाट पहातेय तुझ्या घनघोर बरसण्याची.

विरहाच्या वणव्यात होरपळणा-या, सुकलेल्या कोमेजलेल्या कायेला

कधी रे भिजवशील चिंब चिंब अमृताच्या वर्षावानं?

कधी रे रुजवशील सृजनाचे कोवळे कोंब तिच्या आसुसलेल्या कुशीत?

आळवून, वाट पाहून थकलेली, दमलेली खुळी बिचारी!

अन अचानक आला गंधभारला वारा प्राजक्ताच्या दारावरून.

एक वेडा चुकार, अवखळ, खट्याळ मेघ,

क्षणात सुखाचं शिंपण देऊन "थांब, थांब" म्हणेतो निघूनही गेला!

थरथरलेली, मोहरलेली चकित धरणी, चातक अवाक, पावशा स्तब्ध!

तनाच्या घुमटात मनाचा पारवा भान विसरून घुमतोय, फिरतोय!

खट्याळ मेघा, तूच सांग, अशा क्षणाच्या शिंपणानं

तिची युगांची तहान कधीतरी भागेल का रे?

तुझ्या घनघोर आवेगाचे उसळणारे अमृतघट

मुक्तपणे रिते करशील तिच्यावर, तेव्हाच होईल तिच्या जन्माचं सार्थक!
कवयित्री: क्रांति साडेकर
http://agnisakha.blogspot.com/

आगंतुक

10 प्रतिक्रिया
वा होतास तेव्हा फिरकला नाहीस


वाट बदलून, तोंड लपवून निघून गेलास


किती विनवण्या केल्या, आळवलं तरी


बघितलंही नाहीस मागे वळून!


आणि आता आलास आगंतुकासारखा


न सांगता-सवरता, अन कोसळलास


अस्ताव्यस्त, आंधळ्या हत्तीसारखा!



अरे, जरा पहायचंस तरी डोकावून आत!


कुणी अवघडलेली दिवस भरलेली


उद्याची माउली वेदनांनी तळमळतेय!


गर्भात गुदमरतोय कोवळा अंकूर,


तडफडतोय मोकळा श्वास घ्यायला!


कुठं ओल्या, फाटक्या चादरीच्या झोळीत


भिजतोय, गारठतोय देवकीचा कान्हा.


कोवळ्या जावळाच्या त्या तान्हुल्याला


उराशी कवटाळून आडोसा शोधतेय


अगतिक माय, डोळ्यांतलं पाणी डोळ्यांतच थोपवून!


गळक्या पत्र्यावर तुझा तडतड ताशा,


दचकून उठतोय इवलासा जीव.


कुठं खोपटात घुसलेल्या पाण्यावर नाचतोय


फाटका संसार, गाडगी-मडकी, विझल्या-भिजल्या-थिजल्या चुली!


"उद्या काय घालू लेकरांच्या पोटात?"


काळजीनं झुरणारी अस्वस्थ माय,


भिजून चिंब कुडाच्या भिंती, गवताचं छप्पर


कोसळेल कधी, कुणास ठाऊक?


थोडं वाकला असतास वस्तीत, पाहिलं असतंस त्यांच्या डोळ्यांत,


वाचली असतीस त्यांची मनं, तर कदाचित...........


कोसळलाही नसतास असा............ सैतानासारखा!


यायचं तर आहेच तुला, हवाच आहेस रे त्यांनाही तू.


पण जरा वेळेवर ये, हवा तेव्हाच ये,


त्यांच्याही मुखड्यावर हसू फुलवत.


एक सांगू? असा येऊ नकोस पुन्हा


जिथं तिथं उधळत विध्वंसाच्या खुणा!


कवयित्री: क्रांति साडेकर
http://agnisakha.blogspot.com/