तैलचित्र

12 प्रतिक्रिया
दला दिवस पुर्ण आणि आज दुपार पर्यंत गाडी चालवून चालवून जीव अगदी मेटाकुटीस आला होता. कधी एकदा गादीला पाठ टेकवतोय असे झाले होते. गरम तर इतके होत होते की मुक्कामाला पोहोचल्यावर दोन बीअरच्या बाट्ल्या मागवून घेतल्या आणि त्याचा आस्वाद घेत बगिच्यातल्या खुर्चीवर निवांत बसलो. बसल्या बसल्या केव्हा डोळा लागला तेच कळले नाही.

हवेतल्या गारव्याने जाग आली आणि डोळे किलकिले करुन जरा बघितले आणि खोलीत धाव घेतली - कॅमेरा घ्यायला. कॅमेरा चालू केला आणि बाहेर आलो तर साक्षात परमेश्वराने हातात कुंचला धरला होता. समोर डोंगराच्या मधे पाण्याचे मस्त व्यासपीठ उभारले होते त्याने. आकाशाचा निळ्या रंगाचा कॅनव्हास त्या डोंगरात मस्त पैकी ताणून बसवला होता. हा साधासुधा कॅनव्हास नव्ह्ता. जादूचाच होता म्हणा ना ! त्याच्यावर रेखाटलेले पटकन पुसता येत होते आणि रंग तर असे पसरत होते की बस्स ! मी डोळे विस्फारुन तो रंगाचा अद्‍भूत खेळ बघत बसलो. किती कमी रंगात असंख्य छटा त्या कॅनव्हासवर फासल्या जात होत्या ! मधेच संगीताची साथ असावी म्हणून गडगडाट, पावसाचा खर्जातला तालबध्द आवाज, दुसर्‍याच पातळीवरचा पक्षांचा मंजूळ आवाज. असले भारी पार्श्वसंगीत मी तरी आत्तापर्यंत ऐकलेले नव्हते. खेळ सुरू होण्याची घंटी म्हणून एक कडकडाट झाला आणि रंगमंचावर एकदम प्रकाशाचा झोत पडला. मी आता जरा सावरून बसलो. कॅमेरा सज्ज केला....

त्याने पहीला कुंचला पांढर्‍या रंगात बुडवला आणि त्या रंगाचा भला मोठा ठिपका त्या कॅनव्हासवर टाकला. बघता बघता तो खाली ओघळणारा रंग त्याने एका फटक्यात उलटा वरच्या दिशेला फिरवला आणि एक पांढराशुभ्र ढग त्या कॅनव्हास वर अवतीर्ण झाला. त्या रंगाला जणू याचा राग आला आणि तो डाव्या बाजूला जरा पिंजल्यासारखा झाला. निळ्यावर हा पारदर्शक पांढरा रंग म्हणजे..... तेवढ्यात त्या रंगमंचावर घोंगावणार्‍या वार्‍याचे आगमन झाले. त्या वार्‍याबरोबर त्याने काळा रंग शिंपडला. तो थोडा उचलला आणि तसाच सोडून दिला. ज्या वेगाने तो खाली पसरायला लागला ते पाहून मी दचकलो. मला वाटलं आता शाई सांडते तसा हा रंग आता खाली सांडणार आणि पाण्यात मिसळणार. पाणी काळे होणार, पण त्याने मग त्याच्या कुंचल्याची अजून एक करामत दाखवली. तो रंग त्याने आडव्या फटक्याने उजव्या बाजूला पसरवला आणि निवांत त्या रंगाची गंमत बघत बसला. मधेच त्याने कुठून कोणास ठाऊक एक पांढरा रंग त्या काळ्या रंगात सोडून दिला, त्याचा झाला तरंगणारा धुरकट डोंगर. मी आपला माझ्या इलेक्ट्रॉनिक कुंचल्याशी मारामारी करत त्याची कॉपी करायचा प्रयत्न करत होतो.

एकदम त्या रंगमंचावर स्तब्धता पसरली. जणू काही त्याने संमोहन अस्त्र वापरुन सगळे विश्व थांबवले, माझे तर बोटही उचलेना कॅमेर्‍याचे बटन दाबायला. एक क्षण असा गेला आणि परत त्या रंगमंचावर गडबड उडाली. पावसाचे थेंब ताडताड वाजायला लागले, वीज चमकली, रंगाची झपाझप सरमिसळ झाली आणि तो काळा रंग या टोकापासून ते त्या टोकापासून झपाट्याने खाली उतरायला लागला. मी माझा श्वास रोखून पुढे काय होणार याची वाट बघू लागलो. तेवढ्यात काय झाले कोणास ठाऊक त्याने एकदम तो रंग जागेवरच थांबवला. जणू काही त्याला खालच्या डोंगराची काळजी वाटत होती. खालचे, मर्त्य जग खाली आणि हा स्वर्ग वरती राहीला. मधे तयार झाली एक या दोघांना विभागणारी रेषा. या रेषेत मी अडकलो. वर जाता येईना आणि खाली यायची इच्छा होईना !

त्यावेळी काढलेला हा फोटो.....




लेखक: जयंत कुलकर्णी
http://omarkhayyaminmarathi.wordpress.com/
तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, इतरांनाही पाठवा!
Digg it StumbleUpon del.icio.us Google Yahoo! reddit

यावरच्या 12 प्रतिक्रिया

१७ जून, २०१०, ११:५०:०० AM

जादूच्या कॅनव्हासवरचें चित्रण तितकेंच जादुई आणि प्रत्ययकारी झालें आहे. एकदम झकास. मला १९९९ सालची माझी जुलै महिन्यांतली माथेरानची सहल आठवली. दोन दिवस क्षणांत ढग आणि धुकें तर क्षणांत चकचकीत सूर्यप्रकाश असें बदलतें चित्र होतें. त्यांत अगदी गटारी अमावस्येच्या दिवशीं माझ्याबरोबर शाकाहारी जेवण्यांत माझे अट्टल मांसाहारी मित्र शाकाहारी जेवले आनि हें त्यांच्या परत येतांना लक्षांत आले. अशी ही निसर्गाची किमया. आपल्या लेखानें अशा मस्त आठवणी जाग्या केल्या.

सुधीर कांदळकर

१७ जून, २०१०, ११:५७:०० AM

फोटोमधे ती रेषा दिसली आणि वाटलं की ते सगळं मी प्रत्यक्षच पाहिलं आहे की काय. फोटो अद्भूत आहे. कधी कधी तर निसर्गाची कलाकारी पहातान भान इतकं हरपतं की फोटो काढायचंही राहून जातं. मध्यंतरी सूर्यास्ताचे फोटो काढताना मला तुमच्याच सारखा अनुभव आला होता. ते दृश्य इतकं विलक्षण होतं की कुणी आठवण करून दिली नसती तर मी फोटो सुद्धा काढले नसते. निसर्ग खरोखरच महान आहे.

१७ जून, २०१०, १२:२५:०० PM

वा वा जादूचा कॅनव्हास शब्दातून मस्त जसाच्या जसा उभा केलात डोळ्यासमोर.

आणि इलेक्ट्रॉनिक कुंचल्यावर उतरवलेला कॅनव्हास तर अप्रतिम.

१७ जून, २०१०, ३:३७:०० PM

निसर्गाचे हे छान तैलचित्र तितक्याच उत्कटपणे शब्दचित्रात उमटलयं.

१७ जून, २०१०, ६:०९:०० PM

तुम्हाला शब्द मांडणी चांगलीच जमली आहे. आधी वाटले त्या हवेत दोन घुटके घेत ते सौंदर्य एकट्याने प्यायलात की काय पण नाही आम्हाला पण त्या पिण्यात सहभागी केलेत.

१७ जून, २०१०, ८:५०:०० PM

लेख आणि फोटो दोन्हीही अप्रतिम!

१७ जून, २०१०, ९:४६:०० PM

चित्रण आणि लेख दोन्ही मनावर संमोहन करून गेले..

१७ जून, २०१०, ९:५७:०० PM

फोटो मस्तच टिपलाय तुम्ही... :)

अनामित
१८ जून, २०१०, २:१९:०० AM

सुंदर चित्र अन उत्कट शब्द...दोन्ही मस्तच...

१८ जून, २०१०, ६:१७:०० PM

चित्र जणू कॅन्हास सोडून शब्दात उतरले आहे.. रंगांसहीत...

२२ जून, २०१०, १२:५२:०० PM

मस्त! कास तलावाजवळ असे दॄश्य एकदा पाहिले होते, त्याची आठवण झाली.

४ ऑग, २०१०, १०:५२:०० PM

pharacha chhan lekh jamalay! photo aavadala.Tumachya shabadat jabaradast taakad aahe ase mala vatat.