पूर्वगंध

17 प्रतिक्रिया
 पावसाची लक्षणे आहेत. बाहेरचे ताट आत आणून ठेवायला हवे' शक्य तितक्या लवकर अंगणात जात प्रमिलाबाई मनाशी पुटपुटत होत्या. खरं तर ही कामं उन्हाळ्यातली.. आज पंधरवडा उलटेल पाऊस सुरु होवून! तसं बाकी वाळवण, कुरडया, पापड सगळं करुन ठेवलंय.. पण सगळच कसं जमणार? अंगणातला ऐवज स्वयंपाकघरात नेवून ठेवेपर्यंतही त्यांची दमछाक झाली. तसं व्हायच काही कारण नव्हतं, हे अंतर तरी कितीसे होते? अंगण म्हणायचे खरे, पण तो होता काही फरशांचा छोटा आयतच! कोपर्‍यात रांगणार्‍या मुलाप्रमाणे दिसणारा छोटा तुळशीकट्टा.. प्रमिलाबाईंनी 'अंगणातून' काही आणायला सांगितले, की वसंतराव जोरात हसत असत.. पण प्रमिलाबाईंना ही जागा प्रिय होती. संध्याकाळच्या गप्पांसाठी दोन चार बायका दाटीवाटीने बसण्याइतकी जागा तरी नक्कीच होती. छोटा सोपा आणि त्याला लागूनच स्वयंपाकघर.. त्यांच कृष्णकुंज मोठ्ठं नसलं, तरी आरामदायक आणि खूप खूप प्रेमळ होतं. पुन्हा परतून दारात येताना त्यांना समोरुन सर्रकन दोन गाड्या पुढच्या आळीत जाताना दिसल्या. इथे कुणाकडे थांबणार त्या? आणि थांबल्या असल्याच, तर कळल्याशिवाय का रहाणार आहे? शेजारच्या मंदाचा विचार मनात येवून त्या हसल्या.. येईल ती इतक्यातच बातम्यांची पोतडी घेऊन!
चहाची वेळ झाली होती, नवरा घरी नव्हता तरी त्यांनी दोन कप चहा टाकला. तेही बरचं झालं म्हणा, कारण लगोलग मंदा जणू दवंडी पिटतच आली.

"काकू, ऐकलं का, आपल्या गल्लीत गाडीवाले पाहुणे आलेत"
आपले विश्वसनीय वार्तापत्र वेळेत आले तर! त्या परत हसल्या.
"अगं, आत तर येशिल? ये बाई, चहा पी थोडा"
"अय्या, करुन ठेवला होतात? ठ्यँक्यू हं काकू.. "
मंदा सुर्रसुर्र करुन चहा पित मोठाच विलंब लावत आहे असे प्रमिलाबाईंना वाटू लागले.
"कुणाकडे पाहुणे आलेत म्हणालीस?"
"अहो पाहुणे कुठले? ते तर त्यांच्याच घरी आलेत! इनामदारांची नातवंडे आली आहेत. बर्‍याच वर्षांनी भारतात, त्यांच मूळचं घरं पहायला आले आहेत. इतकी वर्षे बंद असलेलं घर तरी उघडलं जाईल! नाहीतर या आडगावात काय आहे?"
"वहिनी आणि त्यांचा मुलगा पण आलाय का? "
" त्या खूप आजारी असल्याच ऐकलं होतं, त्या नाही आल्या आणि मुलगा तरी कशाला येतोय? बाकी, इथे चक्र उलटेच आहे, सूनेलाच या घरचा ओढा ज्यास्त! आता या काळात मुलगा काय मुलगी काय एकच हो, दोघेही शिकतात, दूर जातात. तुमची एकुलती मुलगी नाही का गेली गुजरातमधे..."

तिचे पुढचे शब्द प्रमिलाबाईंना ऎकून येईनासे झाले. दुरवरचे उडत जाणारे पक्षी पहावेत तश्या त्या शब्दांकडे पहात राहिल्या. डोळ्यांसमोर फक्त इनामदारांचे घर पिंगा घालू लागले. काकूंकडून फारसा प्रतिसाद नाहिसे पाहून मंदाने कंटाळून काढता पाय घेतला. संध्याकाळ गडद होत गेली तशा प्रमिलाबाईंच्या मनात आठवणी गर्दी करु लागल्या. ते घर, प्रशस्त, ऐटबाज, श्रीमंती थाटाच्या मोठ्ठ्या दरवाज्याचं घर! आजूबाजूच्या वस्तीशी तुलना करता महालच म्हणायला हवा. आपण लग्न करुन आलो, तेव्हा त्यांच्या घरासमोरुन जाताना अनामिक ठेच लागून बिचकल्यासारखं व्हायचं.. आणि काही महिन्यातच त्या घरचं एका पूजेचं आमंत्रण मिळालं, सगळी गल्ली जाणारच होती, आपण मात्र उगाचच नर्व्हस होत होतो.
"अगं प्रमिला, माणसंच राहतात तिथे.. घाबरतेस काय?"

घाबरण्याचा प्रश्न नव्हता. पण बेगडी आणि खोट्या अहंकारी वातावरणात आपला जीव कसानुसा होते हे अमान्य करण्यात तरी काय अर्थ होता?
ह्याच मंदाच्या सासूबाईंच्या मागोमाग गेलो होतो आपण. गुलाबाचा वास बाहेरच्या दारापर्यंत येत होता. तर्‍हेतर्‍हेच्या फुलांच्या माळांनी आणि सुगंधानी घर भरुन गेलेलं! सुगंधाचा एक अतिशय तलम पडदाच जणू या घराच्या आणि बाहेरच्या जगाच्या मधे उभा होता. भल्या थोरल्या अंगणात कडेला कितीतरी नाजूक फुलझाडे, मधेच छोटी कारंजी मुद्दाम मागवलेले रंगित पक्षी अर्थात पिंजर्‍यातले..
"प्रमे चल ना पुढे, अशी मागेच थांबू नको.."

मंदाच्या सासूने आपल्याला पुढे दामटलेले होते. हॉलमध्ये पाय ठेवताना पांढर्‍या फरशीऐवजी चुकून आपण कुठल्याश्या उथळ श्वेतरंगी पाण्यातच पाय ठेवला की काय अशी त्यांना शंका आली. चांदीच्या चौरंगावर बाळभटांनी काय सुरेख पूजा बांधली होती. चारी बाजूंनी आजूबाजूच्या बायकांची गर्दी जाणवत होती. जरीच्या पदराच्या टोकाला अवघडून बसलेले नाणे गाठ सुटताच झगझगून उठले. समोरच्या थाळीत शंभरांच्या नोटांच्या भाऊगर्दीत नाणे टाकून कुंकवाच्या हातांनी नमस्कार करुन मागे वळाल्या तेव्हाच 'ती' दिसली होती.
"अग्गोबाई, काकू उशीर केलात! बाकी नव्या नवरीला घेऊन आलात ते बरे केलेत हो.."
"हो ना, हिचं नाव प्रमिला, आणि या इनामदार वहिनी. नमस्कार कर गं.."
नमस्कार करताना वाकलेल्या खांद्यांना वहिनींनी बरचेवर उचलले. तेव्हाच प्रमिलाबाईंना जाणवले हा नखरेल किंवा खोटा स्पर्श नाही. कौतुकाने वहिनींच्या नथीतले पाणीदार मोतीही मंद हेलकावे घेत होते.
"माहेर गं कुठलं तुझं?"

"नांदगाव, इथलंच जवळचं"

"अय्या हो? माझंही तेच!"
काळ्याभोर डोळ्यांतल्या बाहुल्या आणखीनच मोठ्या झाल्या. त्यांच्या पदरावरच्या एका मोराने शेजारच्या मोराकडे हसून पाहिल्यासारखे तिला वाटले.
"येत जा गं प्रमिला, आपण बोलू नंतर"
नाजूक किणकिणता निरोप घेऊन त्या कुठेतरी सुगंधाच्या पडद्याआड गेल्या होत्या. ही पहिली भेट विसरणार कशी?

भूतकाळातल्या लाटा अशा एकावर एक आदळतच राहिल्या असत्या, एवढ्यात दार वाजले. आत येत वसंतरावांनी विचारले, "अस्सा विचार करीत बसलीस ते? बरं नाही का वाटत?"
"नाही हो, पलिकडे इनामदारांकडे कुणीसे आले आहे"
"हं"
त्यांचा 'हं' म्हणजे संवाद संपल्याची खूण होती. रात्रीची वेळ तर आठवणींची आवडती वेळ! अंथरुणावर पडल्या पडल्या प्रमिलाबाईंचे मन पुन्हा जुन्या फुलांचा वास घेऊ का? म्हणून विचारत होते. दुसर्‍यांदा कधी गेलो होतो आपण? आठवत नाही, एक दोनदा गेलो आणि जातच राहिलो. कशी घट्ट वीण बसून गेली होती दोघींच्यात. आजूबाजूच्या बायका चिडवायच्या एकाच गावच माहेर आहे म्हणून एवढ मेतकूट! पण इतकच कारण नव्हतं. वयाने मोठ्या म्हणून वहिनी म्हणायचं, पण माझी सखीच होती ती! त्या घरातलं घुसमटलेपण, बोच सगळं मोकळ केलं होत तिने! त्यांच्या लग्नातला भर्जरी शालू एके दिवशी हातात ठेवला होता तेव्हा खुळ्यासारखे बघतच राहिलो होतो आपण! हिरवागार श्रीमंती शालू! उत्कृष्ट रेशमी कापड, सुरेख नाजूक नक्षी.. तडफदार सोनेरी काठांवरुन हात फिरवतांना चटकन बोट कापेलच की काय या भितीने आपण हात काढून घेतला होता तेव्हा टपटपून मोगर्‍याची फुले सांडत वहिनी हसल्या होत्या. तीच मोगर्‍याची फुले साडीभर चिकटून बसल्यासारखी वाटली तिला. वहिनींना खूप प्रिय होती ती साडी. आत्ता कुठे असतील त्या? या विचारांसरशी पुढच्या न उमटलेल्या प्रश्नाची त्यांना खूपच भिती वाटली. असतील ना त्या?
सकाळी सकाळी मंदा घरी येणे हे संकटापेक्षा कमी नव्हते. तिच्या बडबडीने पुढची कामे खोळंबून रहात पण आज आपणहून प्रमिलाबाईंनी तिला हाक मारली.

"अगं ए, येशील का माझ्याबरोबर तिकडे, त्यांच्या नातवंडांनाच विचारु वहिनींच्या तब्बेतीबद्दल.."
'वेळ नाही' म्हणावेसे वाटूनही मंदा मुकाट प्रमिलाबाईंबरोबर चालू लागली. इनामदारांच्या कुठल्याश्य़ा नातवाने पाच मिनिटे थांबण्यास सांगून त्या दोघींना खुर्चीवर बसण्यास सांगितले. जुन्या वैभवाच्या खुणा पहात त्या तिथे बसल्या. हॉलमध्येच बरेच सामान विखुरलेले होते. कपड्यांचे, उंची भांड्यांचे वेगळे ढीग ठेवलेले होते. 'हे घर लवकरच विकणार ते बहुदा!' मंदा प्रमिलाबाईंच्या कानात कुजबुजली. इतक्यात नातू परत बाहेर येवून सामानाची उचक पाचक करू लागला.

"ए ती, ती साडी बघू"

आतून आलेली एक मुलगी, बहुदा त्या नातवंडांपैकी सर्वात मोठी, त्याला हिरव्या रंगाचे टोक दाखवत होती. ओढून काढलेली साडी नक्की तीच साडी होती, त्या मुलीच्या सुंदर आजीच्या लग्नातला मखमली शालू.
"काय डिझाईन आहे, हिः हिः हिः केवढं गॉडी डिझाईन आहे, भडक रंग, लुक ऍट धिस बॉर्डर.."
"हो ना, एवढ्या वजनदार वस्तूला कपडा म्हणण्याचे डेअरिंग होत नाही, खीः खीः"

"माय गॉड, आजीची असेल ही साडी?"
"हो, तुझ्या आजीचीच आहे, अतिशय आवडती..! तिच्या लग्नातला शालू. असंख्य स्वप्ने लपेटलेला शालू!"

आपल्या प्रिय मैत्रिणीच्या आवडत्या गोष्टीची टिंगल सहन न होवून ताडताड बोलत प्रमिलाबाईं पायर्‍या कधी उतरु लागल्या त्यांना कळलच नाही. ज्या तुच्छतेला त्या घाबरत होत्या ती त्यांच्या मैत्रिणीच्याच वाट्याला आली होती..
कृष्णकुंजच्या खिडकीतून बाहेर बरसणारा पाऊस त्या पहात होत्या. विस्कटलेले मन जरा थार्‍यावर येईल म्हणून निळ्या करड्या आकाशतुकड्याला नजर भिडवू पहात होत्या. संपूर्ण आभाळ बघण्याच्या उर्मीने बाहेर येवून अंगणातल्या पायर्‍यांवर उभे रहात त्या पावसाच्या काचसरी निरखू लागल्या. इनामदार वहिनींच्या आठवणीने का कुणास ठाऊक त्यांना त्यांच्या अंगणातल्या रंगित पक्षांची आठवण झाली. आवडीची वस्तू बाळगण्याचीही परवानगी नसावी त्यांना? बाजूला वसंतराव उभे राहिल्याची जाणीव झाली. सकाळचा प्रकार त्यांना कळलाच असावा.
"असं बघ, जुन्या गोष्टींबद्दल आपल्या मनात जी जागा आहे, ती दुसर्‍याच्याही मनात असणारच असे गृहित धरण्यात अर्थ नाही. आपण त्यांच्या वैयक्तीक बाबीमधे न पडलेलंच बरं! तुम्हा दोघींची सुखदुःखाची पाच सहा वर्षे तुमच्यापासून कोण हिरावून घेणार? खंत बाळगू नकोस. राहता राहिला शालूचा प्रश्न तर, समोर बघ.. एकदा तूच म्हणाली होतीस नां? अगदी हा तर वहिनींचा दुसरा शालूच!"
समोरच्या डोंगरावर पाऊस कोसळताना चंदेरी वर्ख सांडत होता. हिरवाकंच रंग डोलत होता, थेट वहिनींच्या हिरव्या शालूसारखा! मधल्या पायवाटेच्या कडेने नाजूक फुलांची नक्षी उमललेली होती. अप्रतिम सुगंध दरवळत होता. पाण्याची सळसळ ओलेत्या गवतांच्या निर्‍यातून जाणवत होती. समाधानाने प्रमिलाबाई बघत राहिल्या. या भरजरी हिरव्या शालूला नावं ठेवायची कुणाचीच हिंमत नव्हती!!


लेखिका: मीनल वाशीकर
http://gazali.blogspot.com/
तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, इतरांनाही पाठवा!
Digg it StumbleUpon del.icio.us Google Yahoo! reddit

यावरच्या 17 प्रतिक्रिया

१७ जून, २०१०, १०:२५:०० AM

न्या गोष्टींबद्दल आपल्या मनात जी जागा आहे, ती दुसर्‍याच्याही मनात असणारच असे गृहित धरण्यात अर्थ नाही.


कथा आवडली.

१७ जून, २०१०, ११:३३:०० AM

खूप भावस्पर्शी कथा.

काही वस्तूंशी आपल्या आठवणी निगडीत असतात त्यामुळे आपल्याला त्यांची ओढ असतेच. त्या वस्तूंचं महत्त्व आपल्या लेखी मोठं असतं, तसं ते इतरांनाही असेल अशी अपेक्षा आपण ठेवू शकत नाही पण त्या वस्तूंची खिल्ली उडवली गेली तर काळजात कालवाकालव होते खरी.

१७ जून, २०१०, १:०१:०० PM

खरायं मीनल, आपल्याला महत्वाची वाटलेली एखादी गोष्ट समोरच्याला तितकीशी वाटत नाहीहे बर्‍याचदा आपण सहन नाही करू शकत.

१७ जून, २०१०, ७:१८:०० PM

सुरेख! अतिशय आवडली कथा.

१७ जून, २०१०, ८:०६:०० PM

लिखाणातून त्या जागेचे बारकावे, भावना व्यक्त कारण्याचे तंत्र आवडले.

१७ जून, २०१०, ८:४८:०० PM

छॊटी पण छान कथा. डोळ्यांसमोर चित्रं उभं राहीलं.

१७ जून, २०१०, १०:२१:०० PM

वरील सर्व जणांशी सहमत आहे.

१८ जून, २०१०, १:५९:०० AM

`त्यांच्या पदरावरच्या एका मोराने शेजारच्या मोराकडे हसून पाहिल्यासारखे तिला वाटले` हे आवडले.

अनामित
१८ जून, २०१०, २:५२:०० AM

नेहमीप्रमाणे छाऩच लिहल आहे..खरच आपल्याला एखादी गोष्ट आवडते किंवा दुसर्याला ती तेवढी मह्त्वाची वाटेलच अस नाही...

१८ जून, २०१०, ३:१५:०० AM

हृदयस्पर्शी कथा..सर्वांशी सहमत..

१८ जून, २०१०, ११:०३:०० AM

कॅनव्हास, कांचनताई, श्रेयाताई, क्रांती, रानडे काका, अपर्णा, अमेय, मीनलताई, दवबिंदू, मुक्तकलंदर आपल्या सर्वांना अनेक धन्यवाद!
कुणाला आवडेल का, कंटाळवाणे वाटेल का? (खरं म्हणजे कुणी वाचेल का?) या प्रश्नांसहितच देवकाकांना कथा पाठवली. (तशी,कथा नाकारण्याची त्यांना ओपन ऑफर होती..)
तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनासाठी खूप खूप आभार..

१८ जून, २०१०, १२:२९:०० PM

अतिशय सुंदर. साध्या घरगुती भाषेंतली वाचकांशी हितगुज करीत कथा मस्त पुढें जाते. प्रमिलाताईंचें घर आपलेंच वाटूं लागते. शेवटचे परिच्छेद: कृष्णकुंजच्या खिडकीतून दिसणार्‍या निसर्गाशीं प्रमिलाताईंच्या भावविश्वाशी जडलेलें नातें लाजबाब रंगवलें आहे.

अभिनंदन.

सुधीर कांदळकर

१९ जून, २०१०, १२:३५:०० AM

चांगले-वाईट, नवीन-जुने, आवडते-नावडते, आपले-परके सार्‍याच सापेक्ष भावना.. !!

आवडली कथा.. मस्त झालीये.

२१ जून, २०१०, ४:१३:०० PM

मीनल....नेहमीप्रमाणेच खूप सुंदर झाली आहे कथा...अप्रतिम!!!

२१ जून, २०१०, ६:१३:०० PM

खुप मस्त मीनल... मनातल्या भाव भावनांना योग्य शब्दात अतिशय सहजपणे पकडले आहे...

२२ जून, २०१०, ४:०४:०० AM

सुरेख जमलीय कथा .कधी कधी आपल्या मनाच्या एखाद्या कप्पयात दटलेल्या आठवणी असा बाहेर येतात.

२२ जून, २०१०, ११:५६:०० AM

सुधीरकाका, कृष्णकुंजचे घर मी खरोखर पाहिले होते.(बाहेरुन) त्या छोट्याश्या टुमदार घराने लक्ष वेधून घेतले. बाकी सर्व काल्पनिक.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.

हेरंब, योगेश, आनंद, आशाताई
तुमच्या प्रतिक्रियेसाठी, प्रोत्साहनासाठी खूप खूप आभार..