साक्षीदार

9 प्रतिक्रिया

निवेदन: कथेतील पात्रं आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत. जर कोणाला कोणत्याही घटनेशी अथवा व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
(ह्या कथेतील छायाचित्र जालावरून साभार
.)

भाग १-

चानक सुरू झालेल्या पावसात मिस्टर वूड्स आडोसा शोधून उभे राहिले. आपली टोपी, पिशवी, कपडे यावर पडलेले पावसाचे थेंब झटकून त्यांनी बाजूलाच हाताशी पाहिले तर त्यांना कॅथी दिसलीच नाही. केवळ श्वेत वर्णाच्या अमेरिकन लोकांसाठी राखीव असलेल्या त्या शेड खाली काळी हॅट, गुडघ्यापर्यंतचा काळा कोट, काळी पॅंट गळ्यावर बो किंवा टाय असलेली अनेक अमेरिकन माणसे उभी होती. त्यांच्यातही कॅथी दिसली नाही. मिस्टर वूड्सच्या तोंडचे पाणीच पळाले.अमेरिकेतल्या दक्षिणेकडील राज्यात राहणारे मिस्टर वूड्स आपल्या फार्ममधे तयार होत आलेल्या कापसाच्या विक्रीची बोलणी करण्यासाठी तिथल्याच जरा लांबच्या मार्केटमधे पोचले होते. ते घरून निघताना कॅथी- त्यांची लहानगी लेक त्यांच्या सोबत फिरायला यायचा हट्ट करू लागली. जरा लांबचा प्रवास होता आणि किती वेळ लागेल हे माहित नव्हते. शिवाय पावसाची ही शक्यता होती.“यू विल गेट टायर्ड, स्विट हार्ट” असे म्हणून तिला घरीच सोडून मिस्टर वूड्स निघणार तोच कॅथीने मोठ्यांदा भोकाड पसरले आणि ती आपल्या वडीलांच्या गळ्यातच पडली. ते गोजरे हात मिस्टर वूड्स सोडवून घेऊ शकले नाहीत. त्यांनी तिला कडेवर उचलले. आपल्या पत्नीला म्हणजे मिसेस एलिझाबेथला “बाय” करून ते निघाले. घोडा ओढणा-या गाडीतून तासा - दिड तासाचा प्रवास करून ते मार्केटमधे पोचले होते. बराच वेळ झाला होता पण त्यांच्या मनासारखा सौदा होत नव्हता. त्यातच पावसाची मोठ्यांदा सर आली आणि कॅथी दिसेनाशी झाली होती.त्या मार्केटमधे गर्दी होती. बरेच गोरे अमेरिकन आपल्या वस्तूंची विक्री किंवा तंबाखू, साखर, कापूस, कॉफी यांसारख्या शेतकी उत्पादनाच्या विक्रीची बोलणी करण्यासाठी जमले होते. काही जण कपडे/भांडी/बूट असे तत्सम विकण्यासाठी आले होते तर काही लाकडी सामान मांडून बसले होते. काही आपली गुरे विकायला आले तर काही आपले गुलाम. आफ्रिका देशात पकडून मजूरी करण्यासाठी अमेरिकेत आणलेले अनेक कृष्ण वर्णाचे काळे गुलाम लोक ही तिथे जमा होते. हाती पायी धडधाकट असलेल्या गुलामांची कान, डोळे यांची व्यवस्थित तपासणी आणि चाचणी झाल्यावर त्यांना खरेदी करून काही गोरे मालक परतून निघतच होते. पण या अचानक सुरू झालेल्या पावसाने गोंधळ उडाला होता. त्या धावपळीत कॅथी हात सोडून कुठे गायब झाली काही कळलेच नाही म्हणून मिस्टर वूड्सच्या तोंडचे पाणी पळाले होते.ते जिवाच्या आकांताने कॅथीला हाका मारून इकडे तिकडे शोधू लागले.

त्यांचे लक्ष समोर असलेल्या काळ्या गुलामांच्या घोळक्याकडे गेले. लांब कळकट झगा घातलेल्या एका काळ्या बाईने मोठी टोपली उलटी करून कॅथीच्या डोक्यावर धरली होती. त्या टोपली खाली सोनेरी केसांची गोरीपान कॅथी खुशीत हसत होती. डोक्यावर उलट्या दिसणा-या टोपली वरून खाली पडणा-या पावसाच्या पाण्याच्या धारात आपल्या हातातले लाकडी खेळणे भिजवत होती. आणि ती काळी बाई ”प्लिज. टेक केअर ऑफ युवर सेल्फ, मॅडम” म्हणून तिला आवरत संभाळत होती.मिस्टर वूड्स जरा निश्चिंत झाले. ते कॅथीला हातवारे करून हाका मारू लागले. कॅथीचे लक्षच नव्हते. ती त्याच घोळक्यातील तिच्यापेक्षा तीन चार वर्षाने मोठ्या असलेल्या एका कुरळ्या केसांच्या काळ्या गुलाम मुलाकडे पाहून आपले खेळणे दाखवत काही तरी बोलत होती. मधेच त्यालाही त्या टोपली खाली खेचत होती. तो हलकेच हसून लाजत मानेने “नो, नो” म्हणत होता.काही वेळातच पाऊस थांबला. मिस्टर वूड्सनी लागलीच त्या गुलाम घोळक्याकडे धाव घेतली आणि कॅथीला आपल्या ताब्यात घेतले. कापसाच्या विक्रीचा सौदा न होऊनही आता त्यांना तात्काळ घरी निघावेसे वाटत होते. ते कॅथीला कडेवर उचलून भराभर निघालेही. पण का कोण जाणे? ते उलट फिरून पुन्हा त्या काळ्या गुलामांच्या घोळक्याकडे फिरले.


त्यांच्या मालकाला हुडकून काढून आपल्या लेकीच्या डोक्यावर टोपलीचे छत्र धरणा-या काळ्या बाईची खरेदीसाठी चौकशी करू लागले. तिचे नाव मिसेस फिल्डर असे कळले. ती प्रेमळ तर होतीच शिवाय विनम्रही दिसत होती. लहानग्या कॅथीला मायेने संभाळायला ती बाई अतिशय योग्य वाटली आणि घरकामात किंवा इतरत्र ही एलिझाबेथला हिचा उपयोग होईल अश्या विचाराने मिस्टर वूड्स यांचा तिला विकत घ्यायचा विचार होत होता. तिच्या मालकाशी बरासा सौदा ही झाला. ते निघणार तेवढ्यात मिसेस फिल्डरनी मिस्टर वूड्स समोर गुडघे टेकले आणि रडत रडत आपल्या मुलालाही तिच्या बरोबर विकत घेण्याची विनंती केली. तोच तो मुलगा... हलके हसणारा... लाजत “नो” म्हणणारा...कुणाच्या तरी पायाशी लोळण घेऊन आई का रडत होती याचा उलगडा न होऊन तो भांबावलेला दिसत होता. तिचा झगा एका हातच्या मुठीत घट्ट पकडून काळेभोर टपोरे डोळे तिच्यावर रोखून तो जवऴच उभा होता. तो मुलगा हाती पायी तरी सुदृढ दिसत होता. पण ह्या इतक्या लहान पोराचा काय उपयोग आपल्याला? कशाला विकत घ्या ह्याला? ह्या विचाराने ते त्याला तिथेच सोडून केवळ मिसेस फिल्डरसह निघणार होते. पण जरा वळून पाहिले तर कॅथी त्या मुलाच्या जवळ जाऊन त्याला तिच्या हातातले ते लाकडी खेळणे देऊ करत होती. त्या मुलाचे खेळण्याकडे लक्षच नव्हते. तो रडणा-या आईकडे एकटक पहात होता. कॅथी हिरमूसलेली दिसताच मिस्टर वूड्स नी त्या स्वस्त किंमतीच्या तिच्या मुलाची - जोसेफची ही खरेदी करून टाकली. तसे करताना ‘जोसेफ मोठा झाला की पाठवू फार्मवर कामाला.‘ असा विचार ही पक्का झाला.

ते चौघे घोडा ओढणा-या गाडीच्या स्टॉपपाशी आले. तिथे मिसेस फिल्डर, जोसेफ आणि इतर काळ्या गुलामांचे हात दोरखंडाने आवळून त्यांना घोड्याच्या गाडीला बांधण्यात आले. त्यांना तिथून पळून जायची सूतराम शक्यता ठेवली नव्हती. ऊन-पावसातील सर्व प्रवास त्यांना गाडी मागून काटया-कुपट्यातून चालत चालत करायचा होता. छोटी कॅथी आणि तिचे वडील मिस्टर वूड्स घोडा ओढणा-या गाडीत बसले. त्यात अजूनही काही श्वेत वर्णीय प्रवासी होते. तरीही खूप सारी गर्दी नसल्याने बसायला ब-याच जागा शिल्लक होत्या.


कॅथीने जोसेफला तिच्या तिथे बसायला बोलावले.


“ नो डार्लिंग. ही कांट सिट हिअर विथ अस” मिस्टर वूड्स ने सांगितले.


“ बट व्हाय?” ह्या तिच्या प्रश्नावर “ही इज वन ऑफ दोज स्लेव्हज” हे मिळालेले उत्तर तिला कळलेच नाही. ती अधिक विचार न करता खिडकीतून बाहेर मजा बघण्यात गढून गेली.त्या काळ्या बाईला आणि तिच्या लहान मुलाला गुलाम म्हणून बरोबर घेऊन परतलेल्या मिस्टर वूड्सनी वर्णन केलेली मार्केट मधली ती घटना ऐकून मिसेस एलिझाबेथ यांना ती खरेदी अत्यंत आवडली. त्यांनी त्यांच्या मालकीच्या घोड्यांच्या तबेल्या मागची खोली त्या माय- लेकाला रहायला देऊ केली. तेव्हा पासून हे दिड गुलाम वूड्सच्या घरीदारीच असायचे. मिसेस फिल्डर घरातले सर्व काम पहात असत आणि जोसेफ कॅथीला संभाळायला मदत करत असे. या दोघांची मिसेस एलिझाबेथ यांना खूपच मदत होत होती. आता त्यांना कापसाच्या फार्मकडे, तिथल्या मजूरांकडे लक्ष द्यायला फुरसत मिळत असे. मिसेस फिल्डर आणि त्यांचा मुलगा जोसेफ यांना त्यांची गुलामी मान्य होती. त्यामुळे सक्तिचे प्रयोग करून कामे करून घेण्याचा त्रास नव्हता. विनासायास दिलेली कामे पार पडत होती. ते दिड गुलाम वूड्स कुटूंबियांच्याकडे खुश असण्यापेक्षा सुरक्षित होते. सर्व कामे व्यवस्थित केली तर इथून हाकलले जाणार नाही याची खात्री वाटत असे. दूसरीकडे विकल्या गेलेल्या जोसेफच्या वडीलांचा काही पत्ता नव्हता. या जन्मात त्यांची पुन्हा भेट होईल अशी अंधुकशी आशा ही मिसेस फिल्डर यांना नव्हती. या जगातला एकमेव रक्ताचा/ प्रेमाचा माणूस म्हणजे जोसेफ. लवकरच हाताशी येणारा हा आपला लेक कुठल्याही कारणाने दूसरीकडे विकला जाऊन दूर होऊ नये म्हणून मिसेस फिल्डर ही नेहमी मालक वूड्स यांच्या घरच्या गुलामीचे फायदे त्याला पटवून देत असत. रेल्वे/रस्ता बांधणीसारखे सततचे कष्ट किंवा इतर गो-या अत्याचारी मालकांचा जुलूम, मारहाण वूड्स कुटूंबाकडे नाही याची मिसेस फिल्डर नेहमी जोसेफला जाणिव करून देत असत. त्यासाठी अदबशीर आणि आज्ञाधारक रहायलाच हवे यासाठी त्यांचा कटाक्ष असे. जोसेफही दिलेल्या शिकवणीनुसार त्याला नेमून दिलेले काम नेमाने आणि प्रेमाने करत होता.


लहानपणापासून जोसेफ कॅथीची खूप काळजी घ्यायचा. तिची खोली आवरणे, तिचे कपडे घडी करणे, तिच्याशी खेळणे अशी सोपी कामे करत तो लहानाचा मोठा होत होता.कॅथी जराशी मोठी झाल्यावरही जोसेफच तिला संगत करीत असे. ख्रिसमसमधल्या बर्फात स्नो मॅन करण्यापासून फॉल सिझनमधे रंगित पानांचा डोंगर करून त्यात लपून बसण्यापर्यंत तिच्या सोबत असायचा. रिमझिम पावसात धूसर आकाशातल्या सात रंगाचा वेध घेण्यापासून ते समरमधे रंगित फुलांच्या ताटव्यात फुलपाखरांबरोबर खेळा-बागडायला जोसेफनेच तिला शिकवले होते. भर दुपारच्या कडक उन्हात सावलीसारखा तर काळ्या मिट्ट अंधारात चंद्राच्या प्रकाशासारखा कॅथी जाईल तिथे तो हजर असायचा.


जोसेफ मोठा झाल्यावर कॅथीला मैत्रीणींकडे जाताना सोबत करणे, तिला घोडेस्वारी शिकवणे याबरोबरच घरातली डागडूजी, फार्मवरची कामे, बागकाम, समानाची ने-आण तो करू लागला होता. जोसेफची विनातक्रार गुलामी मिस्टर वूड्स यांनाही आवडायची. इतर काळ्या तरूण गूलामांनी केलेला प्रतिकार, अरेरावी यांसारखा त्रास जोसेफकडून कधीच झाला नव्हता. तो त्यांला दिली गेलेली कामे निमूटपणे करत असे. शिकारीला जाताना जोसेफला ते अवश्य आपल्या बरोबर नेत असत. त्यांच्या मोठ्या बंदूका न्यायची आणि मारलेले जनावर उचलू्न आणायची हमाली जोसेफच करत असे. जवळपासच्या कामाच्या ठिकाणी मिस्टर वूड्स यांना जोसेफच गाडी ओढून घेऊन जात/ येत असे. मालकाची मर्जी राखणारा जोसेफ मिसेस फिल्डरना ही काळजी रहित ठेवायचा. आपल्या स्वत:च्या मूलाबरोबर एका ठिकाणी कायमचे राहता यावे यापेक्षा जीवनाकडून त्यांना अजून कुठलीच अपेक्षा नव्हती. मालकाच्या मुलीबरोबर तो मित्र मैत्रिणीसारखा एकत्र खेळी-मेळीत असला तरी जोसेफ आपली गूलामी कधी ही विसरला नव्हता यातच त्याच्या आईला समाधान वाटायचे.


भाग २-


एकेदिवशी वरच्या मजल्यावरच्या आपल्या खोलीतून कॅथी बाहेरच्या बागेकडे सारखी पहात होती. पांढ-या रंगाचे जाळीदार पडदे वा-याने हलले की कॅथीच्या मनात चलबिचल होई. आणि ती पुन्हा पुन्हा खिडकीतून बाहेर डोकावून पाहे. चार पाच दिवस झाले तरी तिला जोसेफ दिसला नव्हता. आज आपल्याला तो नक्की भेटेल असे तिला वाटत होते. जोसेफला आज बागकाम करायला बोलावल्याचे कॅथीला माहित होते. मिसेस फिल्डर ने “ही विल कम एनी टाईम नाऊ” असे मॉमला सांगताना कॅथीच्या कानाने अचूक टिपले होते आणि म्हणूनच ती बागेकडे पुन्हा पुन्हा पहात होती.जोसेफ आपल्याला का टाळतो आहे याचा उलगडा तिला होत नव्हता. त्या दिवशी जे झाले ते तर दोघांच्या ही संमतीने झाले होते. मग त्यानंतर तो पुन्हा भेटायला का आला नाही याचा जवाब तिला हवा होता. एक-दोन वेळा ती घोड्यांच्या तबेल्याच्या मागे असलेल्या जोसेफच्या घरी सुध्दा जाऊन आली होती. पण जोसेफची भेट झाली नव्हती. तो कधी एकदा भेटतो आहे असे कॅथीला झाले होते. आता तर डोळ्यातून अश्रूधारा वहायच्याच बेतात होत्या. पण जोसेफचा काही पत्ताच नव्हता.


काही दिवसांपूर्वी कॅथीला हॉर्स रायडिंगचा सराव करून घरी घेऊन येताना नेहमीप्रमाणे जोसेफ सोबतीला होता. पण मधेच जोरदार पाऊस सुरू झाला. ते घराच्या रस्त्यावर पोचतच होते तेव्हा घोड्याचा मातीच्या रस्त्यावर एक पाय घसरला आणि त्यावर बेसावध बसलेल्या कॅथीचा तोल जाऊन ती खाली पडली. एक पाय दुमडला गेला आणि भिजलेल्या कपड्यांना, हाता पायाला चिखल लागला. घोड्याचा लगाम धरून खाली चालत असलेल्या जोसेफने कॅथीला उठायला मदत केली. पण तिला पायाला दुखापत होऊन मुरगळल्याचे कळल्यावर त्या पावसात पुन्हा घोड्यावर बसवून तिला तिच्या घरी नेणे त्याला अवघड वाटले. पाऊस थांबेपर्यंत काही वेळ जवळच्याच घोड्यांच्या तबेल्यात थांबण्याचे कॅथीने सुचवले आणि लंगडत्या कॅथीच्या दंडाला धरून हळू हळू दोघे ही तबेल्यात पोचले आणि तिथे घोडा बांधून पाऊस थांबायची वाट पाहू लागले. हातापायाला लागलेला चिखल हातानेच झटकून आपल्या भिजलेल्या लांबसर फ्रॉकच्या बाहीला तोंड पुसताना कॅथीला पाहून जोसेफ तिच्यावरून नजर हटवूच शकला नाही. तिच्या गो-या गुलाबी गालावर पाण्याचे थेंब ओघळत होते. सोनेरी आखूड केस ओले होऊन कानावरून चेह-यावर विसावले होते. तिचे निळे डोळे भिरभिरत मधेच पाणी ओतणा-या आकाशाकडे पहात होते. तेवढ्यात जोसेफच लक्ष तिच्या हाताच्या कोपराकडे गेलं. तिथून रक्त येत होते. ती जखम लगेच स्वच्छ करणे जरूरीचे होते. त्याने कॅथीला तबेल्याच्या कडेकडेने सवकाश चालत मागेच असलेल्या आपल्या खोलीवजा घरी नेले.घरात साठवलेल्या पाण्याने हात पाय पूसून दिले. तिची जखम हळूवार धुतली तरी सुध्दा “ आहS” करून कॅथी चित्कारली. जोसेफने मायेने तिच्या जखमेवर फुंकर घातली आणि कापडाची चिंधी त्या जखमेवर बांधली. त्याने थोडे पाणी गरम करून आणले. कॅथीला लाकडी खूर्चीवर बसवून जोसेफ खाली जमीनीवर बसला आणि त्या गरम पाण्यात जाडसर कपडा बुडवून तो पिळून पिळून कॅथीच्या मुरगळलेल्या पायाला शेकू लागला. कॅथीला जरा आराम पडू लागला. तिने कृतज्ञतेने जोसेफकडे पाहिले. तिला लहानपणापासून जोसेफचा असलेला सहवास आठवला. त्याने वेळोवेळी कॅथीचे केलेले संरक्षण आठवले. तिला जोसेफ बद्दल आदर वाटला. तिने त्याचा हात हातात घेतला आणि “ थॅक्यू “ म्हणण्यासाठी ओठ विलग केले. जोसेफने पुढे होऊन तिच्या ओठावर हाताचे बोट ठेवले. हळूच हसून कॅथी जोसेफला बिलगली. ओल्या शर्टाआडूनही जोसेफचा सुडौल आणि शक्तिवान बांधा खूप आकर्षक दिसत होता. त्याची तुकतुकीत काळ्या रंगाची कातडी पाण्याने स्वच्छ होऊन चमकत होती. त्याच्या काळ्या भोर दाट कुरळ्या केसात पाण्याचे मोती चमकत होते. कॅथीला त्याच्यापासून विलग राहणे अशक्यप्रय होऊन बसले होते. परंतु जोसेफने “ नो मॅडम. ईट्स रॉंग टू डू दिस विथ अ स्लेव्ह “ म्हणून कॅथीला दूर सारले. कॅथीने अधिक आवेगाने जोसेफला आपल्या बाहूपाशात घेतले. वातावरणात अजब नशा चढवून बाहेरचा जोरदार पाऊस त्यांच्या एकरूपतेला जणू पाठिंबाच देत होता.पावसाचा आवेग सरल्यावर जोसेफने कॅथीला घरी पोहोचवले होते आणि त्यानंतर एकदाही तो कॅथीला भेटला नव्हता म्हणूनच कॅथी पिसाटल्यासारखी झाली होती. तिने पुन्हा बाहेर पाहिले. जोसेफ बागेत काम करताना दिसला. ती धावत बागेत पोचली तेव्हा जोसेफ काहीही न बोलता तिथून निघून गेला. तीने जोसेफचा पाठलाग केला तेव्हा” सॉरी मॅडम. प्लीज एक्स्क्युज मी. ईट वॉज अ मिस्टेक.” असे म्हणून तो तिथून पळत निघून गेला.कॅथीने मिसेस फिल्डरला गाठले आणि त्यांना जोसेफ बद्दल विचारू लागली. आपल्या प्रेमाची कबूली द्यायचे कॅथीने जणू ठरवलेच होते. तिचे काही बोलणे एकून न घेता मिसेस फिल्डरनी “सॉरी मॅम. जोसेफ अ‍ॅंड मी बेग युअर मर्सी.” असे म्हणून तिथून काढता पाय घेतला.त्या दिवशी ओल्याचिंब कॅथीला घरी सोडून पळत सुटलेल्या जोसेफला पाहून मिसेस फिल्डरना काही वेगळीच शंका आली होती आणि घरी गेल्यावर पलंगावरची ती ओली चादर पाहून ती शंका दाट झाली होती. ती शंका नसून सत्य असल्याची जोसेफकडून खात्री केल्यानंतर त्यांना भविष्यात येणा-या धोक्याची सूचना आगाऊ मिळाल्यासारखे वाटले. मिसेस फिल्डरला आता रोजच काहीशी भिती वाटत होती. आणि म्हणूनच त्या माफीची याचना करत होत्या.मिसेस फिल्डर विचारात मग्न असून खाली मानेने काम करताना मिसेस एलिझाबेथ यांनी पुढल्या आठवड्याच्या शेवटी आयोजित केलेल्या पार्टीबद्दल सांगितले. तरूण कॅथीला आता जीवनातला साथीदार मिळावा या उद्देशाने तिच्या अनुरूप असे मुलगे असलेल्या कुटुंबांना आमंत्रित केले होते. त्या निमित्ताने ओळखी होतील आणि मैत्री होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध तयार होतील हा साधा हिशेब मिसेस एलिझाबेथ यांनी मोकळेपणाने सांगितला. पण मिसेस फिल्डर यांची चिंता अधिक वाढली. कारण पार्टीच्या आधी आणि दरम्यान कामाला जोसेफला ही बोलावले होते.काही ही करून जोसेफला दूरच ठेवावे असा मिसेस फिल्डर यांनी निश्चय केला.पार्टीच्या आधी रात्रं-दिवस राबून मिसेस फिल्डर यांनी स्वच्छता वगैरे करून तयारी केली, पण पार्टीच्या दिवशी फार्ममधे काम करणा-या जोसेफला मिस्टर वूड्सनी मदतीसाठी घरी पाठवले. आता त्याला काही ही पर्याय उरला नव्हता.तो घरी पोहोचताच रागावलेल्या कॅथीला पार्टीसाठी छानसे नटून तयार होण्यासाठी मनवण्याचे काम जोसेफवर सोपवण्यात आले. कॅथीला पार्टीचा हेतू नीटपणे सांगितला गेला होता आणि म्हणूनच तिने असहकार पुकारला होती. तिला जबरदस्ती केल्यास "घरातून पळून जाईन" असाही इशारा तिने दिला होता. वूड्स आईबाप काळजीतच होते. जोसेफ गुलाम असला तरी कॅथीला मनवण्यात तो यशस्वी होईल अशी त्यांना खात्री होती.जोसफ कॅथीच्या खोलीत जाताच कॅथी हरखून गेली. तिच्या डोळ्यात पाणी आले आणि ती जोसेफला बिलगली. “ टेक मी अवे फ्रॉम हिअर” असे सांगून हमसाहमशी रडू लागली.


“ मॅम, धिस इज नॉट पॉसिबल. आय एम युअर स्लेव्ह. देअर इज नो एस्केप ” जोसेफने समजूतदारपणे सांगितले.
कॅथीने ते मान्य न करता ”आय एम यूअर. ओनली यूअर” असे सांगून आपल्या प्रेमाची कबूली दिली.
जोसेफने कॅथीला ‘अशी अशक्य स्वप्न न पाहता एखाद्या अनुरूप गो-या तरूणाशी जीवनाची गाठ बांधायचा’ उपदेश केला. “आय विल बी ऑलवेज देअर विथ यू" असे पटवून देउन कॅथीला पार्टीसाठी तयार होण्यास समजावले.


मिस्टर वूड्सच्या घराचा बाहेरचा परिसर सजवला गेला होता. बागेत छानशी फुलझाडे लावली होती. छोटी झुडपे बागेतल्या पायवाटेच्या कडेने एका रेषेत शिस्तीत उभी होती. मऊ हिरव्या गवताचा गालिचा बागेभर एकसरखा पहुडला होता. घराचा हॉल आकर्षकरित्या नटवला होता. खिडक्यांनी रंगित पडदे ओढून घेतले होते. छताला टांगलेले मेणाचे दिवे असणारे काचेचे झुंबर संपूर्ण हॉल प्रकाशित करत होते. जमिनीवर रंगित गालिचे अंथरले गेले होते. शोभिवंत वस्तू काचेच्या दारातूनही लक्ष वेधून घेत होत्या. कोरीवकाम केलेल्या लाकडी नक्षीदार टेबलांवर काचेच्या प्लेट्सची चळत, काचेचे ग्लासेस, स्टीलचे चमकते काटे-चमचे वगैरे विशिष्ठ रितीने मांडून ठेवले होते. टेबलाच्या नक्षीला अनुरूप खूर्च्या पाहुण्यांची वाट पाहत होत्या. स्वयंपाकघरात विविध पदार्थ तयार होऊन आपल्यातच मुरत बसले होते. पार्टीची मनाजोगी सर्व तयारी झाली. शेवटी मिसेस फिल्डर आणि जोसेफला काही सूचना दिल्या गेल्या. कॅथी कशी बशी का होईना पण तयार झालेली पाहुन मिस्टर आणि मिसेस वूड्स यांनी हुश्श्य केले होते. ते ही तयार होऊन पाहुण्यांची वाट पाहू लागले.इतक्यात जोरदार पावसाला सुरवात झाली. सर्वच तयारी वाया जाते आहे की काय असे वाटू लागले. बोलावलेली सर्व मंडळी उशीरा का होईना पण आली. पेय पान, खाद्य पान सुरू झाले. गप्पा- गोष्टी सुरू झाल्या. तरूण मंडळींनी आपला वेगळा कंपू बनवला आणि त्यात चेष्टा मस्करी सुरू झाली. त्यांनी आपापल्यातच गाणी म्हणून नाच सुरू केले. त्या(Deletत) कंपूत मिस्टर वूड्सना कॅथी दिसलीच नाही. ती बराच वेळ आपल्यात नाही हे ही आत्ता त्यांच्या लक्षात आले. तसे त्यांनी मिसेस एलिझाबेथला हळूच सांगितले सुध्दा. मिसेस वूड्सची नजरही पाहुण्यांशी बोलाचाली करताना सर्व दिशेने कॅथीचा मागोवा घेत होती. दोघांनाही कळेना की अचानक कॅथी गेली तरी कुठे? ती ना तिच्या खोलीत होती ना इतरत्र कुठे. बाहेर बागेत वगैरे जायचा प्रश्नच नव्हता कारण पाऊस नुसता कोसळत होता. कॅथीच्या नाराजीचे काही कारणच कळत नव्हते म्हणून तिचे असे दृष्टीआड होणे चिंताकारक वाटू लागले.अमेरिकन शिष्टाचारानुसार मिस्टर वूड्स यांनी पाहुण्यांची क्षमा मागून काही काळासाठी रजा घेतली आणि ते चेह-यावरची चिंता लपवत कॅथीचा शोध घेऊ लागले. मिसेस फिल्डरनाही कॅथी दिसली नव्हती. त्यांना जोसेफही बरच वेळापासून आसपास न दिसल्याचे लक्षात आले आणि त्यांची चलबिचल वाढली. त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्या सर्व खोल्यातून पुन्हा पुन्हा पाहू लागल्या. मिस्टर वूड्स बाहेर पाहू लागले. रात्र होत होती. पावसाच्या जोराबरोबर हळूहळू काळोख झिरपत होता. मिस्टर वूड्स घराला वळसा घेऊन पुढे येऊ लागले तेव्हा त्यांना बाजूच्या दाराजवळ कॅथी जोसेफच्या बाहूपाशात उभी असलेली दिसली. ते दोघे ही आपल्याच धुंदीत होते. आजूबाजूची त्यांना शुध्द नव्हती. ते पाहून मिस्टर वूड्स संतापले आणि ताड ताड पाय आपटत घरात गेले. भिंतीवर लावलेल्या हरणाच्या शिंगाखालची लटकवलेली मोठी बंदूक काढून घेतली आणि “ यू ब्लॅक स्लेव्ह, यू नीड नॉट लिव्ह ऑन धिस अर्थ” असे जोराजोराने ओरडत पावसाची पर्वा न करता पुन्हा घराबाहेर पडले. घरी आलेले सर्व पाहुणे आणि मिसेस एलिझाबेथ मिस्टर वूड्स चा अवतार पाहून प्रश्नांकित झाले. ते ही भर पावसातून मिस्टर वूड्सच्या मागे मागे धावले. चिंताग्रस्त मिसेस फिल्डरचे काळीज धडधडू लागले. हातातले काम टाकून धडपडत त्या ही तिथे निघाल्या. मिस्टर वूड्स नी कॅथीचा हात धरून तिला जोसेफ पासून दूर केले. त्याच्या वर बंदूक रोखून धरली आणि कुणीही काही बोलायच्या आधी बंदूकीचा चाप दाबला. “ठो” करून एकच गोळी निघाली आणि जोसेफच्या छातीत घुसली. जोरदार धक्का बसून जोसेफ जमिनीवर कोसळला. मिसेस फिल्डर रक्तबंबाळ जोसेफपाशी धावत पोचल्या. पावसाच्या पाण्यातून त्याचे रक्त वाहू लागले होते. तो वाचायची कुठलीच शक्यता त्यांना तिथे दिसत नव्हती. एका काळ्या गुलामाला मरताना पाहून वाचवणारा कोण होता तिथे? सर्वच श्वेत वर्णीय...काळ्या गुलामांचे मालक. नाही म्हणायला कॅथी होती तिथे पण ती काय करू शकणार होती?ती तर जोसेफच्या निश्चल शरीराशेजारी उभी होती, धो धो पडणा-या पावसाकडे एकटक पहात... तिची आणि जोसेफची पहिली भेट घडवणारा आणि पुढे त्यांना एकजीव करणारा तो पाऊस त्यांच्या प्रेमाच्या अंताचा ही साक्षीदार ठरला होता. त्याचीच ती जणू जबानी घेत होती. कॅथी आणि जोसेफच्या प्रेमकथेचा तो साक्षीदार मात्र अबोल होऊन नुसता कोसळत होता.
लेखिका: मीनल गद्रे
http://myurmee.blogspot.com/
तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, इतरांनाही पाठवा!
Digg it StumbleUpon del.icio.us Google Yahoo! reddit

यावरच्या 9 प्रतिक्रिया

१७ जून, २०१०, १:२८:०० म.उ.

मन सुन्न करणारी कथा. कथा विस्तार चांगला झालाय.

१७ जून, २०१०, ४:५८:०० म.उ.

मस्त आहे कथा ! शेवटचा परिच्छेद जमलाय. आणि जसं पाऊस त्यांच्या भेटीच्या सुरुवातीचा आणि शेवटाचा साक्षीदार होता तर मि. वूड्स त्यांच्या पहिल्या आणि शेवटच्या भेटीचे कारण होते.

- ओंकार

१७ जून, २०१०, ७:५२:०० म.उ.

कथा चांगली जमली आहे.

१७ जून, २०१०, ७:५३:०० म.उ.

वाव, भेट काय घडवली, मारले काय अगदी विंग्रजी शिणेमाच की हो. छान, छान, हे छान मराठीतून लिखाणाबद्दल.

१७ जून, २०१०, ९:३३:०० म.उ.

खरंच अगदी इंग्रजी सिनेमा मराठीतू पहात असल्यासारखे वाटत होते. :-)

१७ जून, २०१०, १०:२०:०० म.उ.

ताई लेख मस्त लिहाला आहेस...

१८ जून, २०१०, २:०१:०० म.पू.

एक भावूक सिनेमा वाचला.....

१८ जून, २०१०, १२:०२:०० म.उ.

एक अप्रतिम हृदयस्पर्शी, नव्हे हादरवून टाकणारी कथा. कुठेंहि आक्रस्ताळेपणा न आणतां दलित साहित्य कसें असावें याचा वस्तुपाठच.

ली हार्पर या लेखिकेच्या पुलित्झर पारितोषिकप्राप्त ‘टु कील अ मॉकिंब बर्ड’ या कादंबरीत थोड्याफार फरकानें असेंच एक उपकथानक आहे. मायेला इवेल या वय वाढलेल्या गोर्‍या तरुणीच्या वासनेचा ‘टॉम रॉबिन्सन’ हा काळा तरूण बळी पडतो. गुलामगिरी संपल्यानंतर देखील.

सुधीर कांदळकर

१८ जून, २०१०, ५:५२:०० म.उ.

मी ना असा इंग्रजी सिनेमा पाहिलाय, ना पुस्तक वाचलय.
आमेरिकन सिव्हिल वॉरची चर्चा ऐकली आणि त्यात प्रेमकथा टाकावीशी वाटली.
तूम्हा सर्वांना धन्यवाद. कथा वाचल्या बद्दल आणि आपल्या प्रतिक्रियांबद्दल.